Thursday, 19 April 2018

💊 *अँटीबायोटिक्स म्हणजे काय ?* 💊

अँटिबायोटिक्स अर्थात प्रतिजैविकांचे आजकालच्या औषध उपचारात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कोणताही डॉक्टर प्रतिजैविकांचा उपयोग केल्याखेरीज वैद्यक व्यवसाय करू शकणार नाही. अशी आजची परिस्थिती आहे.

*अलेक्झांडर फ्लेमिंगने* अपघाताने पेनिसिलीनचा शोध लावला व तेव्हापासून आजतागायत अनेक प्रतिजैविके विकसित करण्यात आली आहेत. बुरशीपासून ही प्रतिजैविके मिळतात. काही प्रतिजैविकांचे कृत्रिमरित्या तयार होणारे पर्यायही उपलब्ध झाले आहेत. प्रतिजैविके विविध मार्गांनी जंतूंचा नायनाट करतात. काही वेळा ती जीवाणूंचे पोषण त्याला मिळू देत नाहीत, कधी त्याच्या पेशीतील केंद्रकावर हल्ला चढवतात, तर कधी त्याला हानिकारक ठरणारे पदार्थ निर्माण करतात.

जिवाणूही हुशार असतात. प्रतिजैविक योग्य प्रमाणात दिले नाही वा कमी दिवस दिले तर जीवाणूंमध्ये त्या प्रतिजैविकांविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होते. ही प्रतिकारशक्ती त्यांच्या पुढील पिढय़ांनाही आपोआप मिळू शकते. त्यामुळे त्या प्रतिजैविकांचा उपयोग त्या जीवाणूला मारण्यासाठी करता येत नाही. असे होऊ नये यासाठी प्रतिजैविके पुरेशा डोसमध्ये निदान ५ दिवस तरी द्यायला हवे. पेनिसिलिन, अॅंपीसिलीन, स्ट्रेप्टोमायसिन, निअोमायसीन, सेफॅलोस्पोरीन अशी प्रतिजैविके आजकाल औषध उपचारात वापरली जातात. रोगी अत्यवस्थ असेल तर वा पचनसंस्थेतून प्रतिजैविकांचे शोषण होत नसेल तर ही प्रतिजैविके शिरेतून वा स्नायूमध्येही देता येतात. अशावेळी वावडे वा अॅलर्जीची विशेष काळजी घ्यावी लागते.

प्रतिजैविके म्हणजे रुग्णांसाठी जणू वरदानच होय. क्षयरोग, कुष्ठरोग यांसारख्या असाध्य समजल्या जाणाऱ्या रोगांपासून कॉलरा, विषमज्वर, घटसर्प, डांग्या खोकला, अशा सर्वच रोगांवर प्रतिजैविकांमुळे हुकुमी उपचार करता येतात.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०

No comments:

Post a Comment