Thursday, 19 April 2018

🌎 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🌎

*पृथ्वीची निर्मिती* (२)

पृथ्वी निर्माण झाली त्यावेळी त्यावर जीवनाचे अस्तित्व नव्हते. नंतर केव्हातरी त्याची उत्पत्ती झाली. जिवाची ही जन्मकथा थोडक्यात समजून घ्यावयास हवी. पृथ्वीवर एका पेशीचे जंतू ते झाडे, जनावरे, माणसे असे असंख्य जीव आहेत. या सर्व सजीव पेशींचे मूलभूत जीवनद्रव्य एकच आहे व ते म्हणजे प्रोटीन. प्रोटीन हे अतिशय गुंतागुंतीचे संमिश्र द्रव्य आहे. पाणी हे हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा एक अणू यांच्या संयोगातून बनलेले मिश्र द्रव्य आहे. सोडियमचा एक अणू व क्लोरिनचा एक अणू यांच्या संयोगाने मिठाचा रेणू बनतो. पण प्रोटीनच्या एका रेणूत हजारो लाखो अणूंची गुंतागुंत आहे. हे सर्व अणू नियमबद्ध रितीने एकमेकांशी संलग्न आहेत. प्रोटीन मधील अणूंत प्रामुख्याने कार्बन, हायड्रोजन, आॅक्सिजन आणि नायट्रोजन या मूलद्रव्यांचे अणूच मोठ्या संख्येने असतात. सजीव प्रोटीनचा खास गुणधर्म असा आहे की ते कधीही एका स्थितीत स्थिर नसतात. त्यांची चळवळ अखंड चालते. या जीवनाच्या क्रियेत सजीव प्रोटीनचा काही भाग निकामी होऊन बाहेर फेकला जातो. त्याच बरोबर बाहेरच्या परिसरातून ते सजीव प्रोटीन पोषक द्रव्य शोषून घेते व त्यांना आपल्या शरीरात आत्मसात करते. म्हणजे शरीरात नको त्या गोष्टी बाहेर टाकणे, अन्न मिळवणे या आधारे पुनर्घटन करणे अशी ही विघटन पुनर्घटनाची क्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या रासायनिक प्रक्रियेतून होते. या क्रियेतून सजीव शरीराचे अस्तित्व टिकून राहते. याचा अर्थ जीवन हा प्रोटीन द्रव्याच्या अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार आहे. विघटन पुनर्घटनाच्या क्रियेत बाहेरील निसर्गाशी अखंड देवघेव करणे हे त्याचे मुख्य लक्षण आहे आणि ही क्रिया थांबताच जीवनाचा अंत होऊन प्रोटीनचा नाश होतो. अलीकडच्या काळातील जीवशास्त्र व रसायनशास्त्र यातील प्रगती असे सांगते की जीवाचे पुनरुत्पादन, अनुवांशिक लक्षणांचे सातत्य आणि शरीरातील विभिन्न प्रोटिनची निर्मिती याबाबत मुख्य भूमिका न्यूक्लिक अॅसिड द्रव्याची आहे. त्यामुळे 'जीवन हा न्यूक्लिक अॅसिड आणि प्रोटीन द्रव्याच्या अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार आहे', असे म्हणता येईल.
जीवसृष्टीच्या निर्मितीत प्रथमतः कार्बन, हायड्रोजन यांचे साधे मिश्र द्रव्य (हायड्रो कार्बन) आणि पाणी निर्माण झाले. पुढे या हायड्रो कार्बन द्रव्याचा नायट्रोजन ऑक्सिजन आणि पाणी यांच्याशी संयोग होऊन चार मुलद्रव्यांची साधी मिश्रद्रव्ये तयार झाली. तिसर्‍या टप्प्यात त्यामधून न्यूक्लिक अॅसिड, प्रोटीन यासारखी संमिश्र द्रव्ये तयार झाली. चौथ्या पायरीत या द्रव्यांचा विकास होऊन त्यांच्या ठायी आधी उल्लेख केलेली विघटन पुनर्घटनाची विशेष लक्षणे आली आणि अखेरच्या पायरीत प्राथमिक सजीव द्रव्याचा विकास होऊन पहिले जीव अस्तित्वात आले. याच्या पुढचा इतिहास हा उत्क्रांतीचा इतिहास आहे.

 *तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन

No comments:

Post a Comment