Thursday, 19 April 2018

🌎 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🌎

 *पृथ्वीची निर्मिती* (४)

 अत्यंत प्राथमिक स्वरूपातील जीव सुमारे चारशे कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले असावेत. आज बॅक्टेरिया सारखे जे अनेक अतिसूक्ष्म एकपेशी जीव अस्तित्वात आहेत, त्यांच्या मानाने हे पहिले जीव पुष्कळच साधे होते. त्यांना 'सजीव पदार्थ' असेही म्हणता येईल. हे प्राथमिक जीव जलाशयातील पाणी व त्यात विरघळलेली कार्बनची साधी मिश्र द्रव्य यांवर जगत होते. पण जलाशयात या मिश्र द्रव्यांचा साठा मर्यादित होता. शिवाय सूक्ष्म जीवांच्या जगण्यामुळे या मिश्र द्रव्यातील कार्बनचे रूपांतर कार्बनडायऑक्साईड वायू होत होते. म्हणजे अन्नाचा पुरवठा कमी होत होता आणि वातावरणात कार्बनडायऑक्साईडचा भरणा मात्र होत होता. परिस्थिती अशीच राहिली असती तर जीवनाचा विकासच खुंटला असता. परंतु कालांतराने काही जीवांमध्ये एका नव्या शक्तीचा विकास झाला. प्रकाशाच्या लहरींचा उपयोग करून त्यायोगे कार्बनडायऑक्साईड मधील कार्बनचे रूपांतर ते स्वत:ला हव्या त्या अन्नकणात करू लागले. वनस्पतींच्या अंगी ही शक्ती आहे. त्या हवेतून कार्बनडायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. प्रकाशाच्या सहाय्याने आपले अन्न तयार करण्याची ही शक्ती जीवन विकासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर जीवन सृष्टी दोनशे कोटी वर्षांपूर्वी पोचली असावी. जे जुन्या पद्धतीने आपला निर्वाह करू लागले त्यांचा अंतर्भाव वनस्पतीत होतो, जे जीव भोवतालचे अन्नकण घेण्याच्या पद्धतीला धरून राहिले ते प्राणी होत. वनस्पतींनी बाहेर टाकलेला ऑक्सिजन जीवनक्रियेला उपयोगी पडू लागला. पृथ्वीच्या वातावरणात प्रथमत: शुद्ध ऑक्सिजन मुळीच नव्हता. कारण ऑक्सिजन हे अत्यंत क्रियाशील मूलद्रव्य आहे. ते लगेच इतर पदार्थांशी संयोग पावते आणि म्हणून शुद्ध स्थितीत राहत नाही. आपल्या वातावरणात शुद्ध ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असतो याचे संपूर्ण श्रेय वनस्पतींना आहे. या सर्व घटनाक्रमानंतर प्राथमिक जीवांचा पुढचा विकास होत गेला. एक पेशी जीवातून बहुपेशी जीव निर्माण झाले त्यांचा नानाविध विकास होत अखेर मानव निर्माण झाला.

 *क्रमश:*

 *तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन

No comments:

Post a Comment