Thursday, 19 April 2018

📙 *सूर्यास्ताचा रंग लाल शेंदरी का असतो ?* 📙

चौपाटीच्या वाळूत मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून प्रेमाच्या आणाभाका घेण्याचा आपल्या कथा कादंबरीतील नायक नायिकांचा प्रघात आहे. अशा वेळी त्यासंध्यासमयीचा लालिमा आपल्या प्रेयसीच्या गालावर पसरलेला नायकानं पाहिला, असंही ललितलेखक आपल्याला सांगत असतात. यातल्या संध्यासमयीच्या लालिम्याचं त्यांचं वर्णन शंभर टक्के सत्य असतं, यात शंका नाही. आपणही मावळत्या सूर्याकडे पाहत असताना आकाश लाल, शेंदरी, पिवळ्या रंगाने उजळून गेलेलं पाहतो. सूर्योदयाच्या वेळीही असेच रंग दिसत असतात.

हे असंच का समजून घ्यायचं तर, इतर वेळी आकाश निळं दिसतं, याचा विचार करायला हवा. त्याचं उत्तर नोबेल पुरस्कारविजेते सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी देऊन ठेवलेलं आहे. त्यांच्या भाषेत सांगायचं तर याला 'रॅले स्कॅटरिंग' हा नैसर्गिक आविष्कार कारणीभूत आहे.

आपल्या धरतीच्या वातावरणात अनेक वायू आहेत. त्या वायूंचे रेणू प्रकाशकिरणांना विखुरत असतात. कारण जेव्हा प्रकाशकिरण हा या रेणूंवर पडतात तेव्हा त्यांच्यातील काही ऊर्जा या रेणुंकडुन शोषली जाते. त्यामुळे ते रेनो उत्तेजित होतात; पण काही काळ गेला की ते रेणू ती वाढीव ऊर्जा बाहेर फेकून परत मूळपदावर येतात. तसं करताना ते परत प्रकाशकिरणच बाहेर टाकत असतात. मात्र या किरणांची ऊर्जा मूळ ऊर्जेपेक्षा कमी असते. कारण मूळ ऊर्जेतल्या काहीचं उष्णतेत रूपांतर झालेलं असतं. हे होताना अर्थात ते प्रकाशकिरण मूळ दिशेपेक्षा वेगळ्याच दिशेला फेकले जातात. ते विखुरले जातात.

सूर्यप्रकाशात सात निरनिराळ्या रंगांचा प्रकाश असतो. त्यातल्या जांभळ्या किंवा निळ्या रंगाच्या प्रकाशात जास्त उष्णता असते. साहजिकच जास्त ऊर्जा असलेले किरण जास्त प्रमाणात विखुरले जातात. त्यामुळे आकाश निळं दिसतं. पण इतर रंगांचे किरणही विखुरले जात असतात, फक्त त्यांचं प्रमाण कमी असतं. ज्यावेळी सूर्य आपल्या डोक्यावर असतो तेव्हा त्याला वातावरणातून धरतीपर्यंतचा प्रवास करताना कमी अंतर पार करावं लागतं. त्यामुळे निळ्या रंगाचे किरणच जास्त विखुरलेले दिसतात; पण सूर्यास्ताच्या किंवा सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणांना वातावरणातून अधिक अंतर पार करावं लागतं. साहजिकच ते अंतर पार करेपर्यंत निळ्या किंवा हिरव्या रंगाचे किरण विखरून गेलेले असतात. लाल किंवा शेंदरी रंगाच्या किरणांचं विखुरणंच जास्त दिसतं. आकाश त्याच रंगांनी न्हाऊन निघतं.

*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*


No comments:

Post a Comment