Thursday, 19 April 2018

📙 *पेसमेकर काय करतो ?* 📙
*******************************

खरं तर हा प्रश्न कृत्रिम किंवा यांत्रिक पेसमेकर काय करतो ? असा विचारायला हवा. कारण आपल्या शरीरात एक नैसर्गिक पेसमेकरही असतो. तो हृदयाचा ताल नियंत्रित ठेवतो. हृदयाचा हा तब्बलजी सायनो अॅंट्रियल नोड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पेशींच्या एका गुच्छात असतो. जेव्हा हृदयाचा ठोका पडतो तेव्हा या पेशी एक विद्युतस्पंद म्हणजेच विजेचा लोळ हृदयाच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकाकडे पाठवतात. जसजसा हा विद्युतस्पंद हृदयाच्या निरनिराळ्या भागांवरून प्रवास करतो तसतसा तो त्या भागाचं आकुंचन आणि प्रसरण नियंत्रित करतो. प्रथम हृदयाचे दोन्ही वरचे कप्पे आकुंचन पावतात. ते जेव्हा प्रसरण पावतात त्या वेळी त्या कप्प्यांमधील रक्त खालच्या कप्प्यांमध्ये उतरतं आणि जेव्हा ते खालचे कप्पे प्रसरण पावतात तेव्हा ते रक्त शरीरभर जोरानं पाठवलं जातं. परत एकदा हृदयाच्या वरच्या भागात विद्युतस्पंद उभा राहतो आणि हे चक्र अविरत चालू राहतं. हृदय नियमित वेगानं आणि इमानेइतबारे आकुंचन प्रसरण पावत रक्त शुद्ध करून घेत ते शरीरभर खेळवत राहील अशी योजना राबवत राहतं.

पण काही जणांच्या हृदयाचा हा ताल बिघडतो. ते हृदय एकदम जलद गतीने तरी धडधडू लागतं. या अवस्थेला टॅकीकार्डिया म्हणतात. किंवा उलट ते मंदगतीने दुडक्या चालीने चालत राहतं. या स्थितीला ब्रॅडीकार्डिया म्हणतात. किंवा अशा कोणत्याही नियमांनं न चालता ते अनियमितरित्या धडधडतं. अशावेळी नैसर्गिक पेसमेकरच्या मदतीला किंवा त्याचं काम करण्यासाठी बदली म्हणून पेसमेकर नावाचं यंत्र पोटाच्या किंवा छातीच्या पोकळीत बसवलं जातं. या यंत्रात विद्युतस्पंद तयार करणारा एक जनरेटर असतो; आणि हा जनरेटर हृदयाच्या कप्प्यांना जोडणाऱ्या तारा असतात. या तारा निलेमधून नेऊन थेट हृदयाच्या कप्प्यात सोडलेल्या असतात. साधारण अधेलीच्या आकाराचा हा पेसमेकर टायटॅनियम या धातूचा बनवलेला असतो. त्याच्यावर शरीरातील द्रवांचा कोणताही परिणाम होत नाही. तीच बाब तो पेसमेकर हृदयाच्या कप्प्यांना जोडणाऱ्या तारांची. पेसमेकरमधला जनरेटर चालविण्यासाठी दीर्घकाळ चालू राहणाऱ्या आण्विक बॅटरी वापरतात. त्यामुळे वरचेवर बॅटरी बदलण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागत नाही. हा पेसमेकर विवक्षित तालावर विद्युतस्पंदानं हृदयाला टोचणी देत त्याला आपला ताल नियमित राखायला मदत करतो. त्यामुळं मग त्या रुग्णाला सर्वसामान्य निरोगी जीवनशैली अंगीकारणे सोपं जातं.

*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*


No comments:

Post a Comment