Thursday, 19 April 2018

🌎 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🌎

 *पृथ्वीची निर्मिती (५)*

 आदिम अवस्थेतील माणूस 'निसर्गलीला' विस्मयचकित होऊन पाहत होता. कानठळ्या बसवणारा मेघांचा गडगडाट, थरकाप उडविणारा विजांचा चमचमाट, धुवाधार कोसळणारा पाऊस, जंगल बेचिराख करत जाणारे वणवे हे सारे आदिम मानवांच्या आकलनाच्या पलीकडे होते. म्हणून या सर्व निसर्गशक्तींना त्यांनी पंचमहाभूते अथवा महादेवता मानले. त्यांच्या कृपा प्रसादावर आपले जगणे अवलंबून आहे, असे त्यांना पदोपदी जाणवत होते आणि म्हणून स्वतःला सुचेल त्याप्रमाणे ते त्या शक्तींशी करुणा भाकत होते. त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होते. उत्क्रांतीमध्ये माणूस सगळ्यात अलीकडे व सर्वात दुबळा प्राणी म्हणून निर्माण झाला. माणूस माशाप्रमाणे सदैव पाण्यात राहू शकत नाही किंवा साध्या चिमणी प्रमाणे त्याला उडता येत नाही. हरणाचे पाय माणसापेक्षा कितीतरी बळकट आहेत आणि म्हणून हरीण माणसापेक्षा प्रचंड वेगाने पळते. गेंडा आणि हत्तीला निसर्गाने माणसाच्या तुलनेत प्रचंड ताकद दिली. वाघ आणि सिंह यांना निसर्गाकडून तीक्ष्ण नखे आणि दात यांची देणगी मिळाली. हिमप्रदेशात सुखाने जगणे अस्वलाला निसर्गाने दिलेल्या केसाळ कोटाच्या कातड्याने शक्य झाले. साधे मांजराचे पिल्लू अंधारात पाहू शकते. मात्र माणसाचे पाय अडखळतात. माकडाचे पिल्लू या झाडावरून त्या झाडावर सहज उडी मारते जे माणसाला शक्य होत नाही. जन्माला आल्यावर एका दिवसाच्या आत पाय झाडत वासरू उभे राहते पण माणसाच्या बाळाला मात्र मान धरावयास तीन महिने लागतात. इतका दुबळा असणारा हा माणूस प्राणी जगाचा स्वामी बनला ही किमया झाली तरी कशी ?
ज्ञान हे माणसाचे खास वैशिष्ट्य आहे. इतर प्राण्यांनी पर्यावरणाप्रमाणे स्वतःला जुळवुन घेतले. पर्यावरणसुसंगत बदल त्यांच्यात झाले. माणसाने मात्र स्वतःच पर्यावरणाला बदलले. पर्यावरणावर स्वामित्व मिळवले. सर्व प्राण्यात फक्त मनुष्यप्राण्याच्या हाताला बाकीच्या बोटावर टेकवता येणारा अंगठा लाभला. माणसाने प्रथम दहा बोटांचे अवजार केले आणि आजूबाजूच्या निसर्गावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. नंतर त्याने दगडाची अवजारे केली. पुढच्या टप्प्यावर दगडाला धार लावली. त्याला झाडाची फांदी जोडली आणि कुऱ्हाड तयार केली. मग धातूचा शोध लागला. धातूंच्या आधारे हत्यारे अथवा अवजारे यांची वैविध्यपूर्णता वाढली. या साऱ्या अवजारांच्या सहाय्याने आजूबाजूच्या निसर्गावर प्रक्रिया करता करता माणसाचा मेंदू विकसित झाला. माणसाला एक उत्क्रांत स्वरयंत्र व मूख पोकळी लाभली. त्या आधारे माणसाने 'भाषा' निर्माण केली, जोपासली, वाढवली. माणसाने केवळ ज्ञानार्जन केले नाही तर भाषेच्या आधारे ज्ञानसंक्रमण केले. एका अर्थाने प्राणीच असलेल्या मानवाचे 'ज्ञान आणि भाषा' हे अभूतपूर्व वैशिष्टय़ मानावे लागेल.

 *क्रमश :*

 *तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन

No comments:

Post a Comment