Tuesday, 24 April 2018

📙 *जीवाचा अंत केव्हा होतो ?* 📙
************************************

पूर्वी कसं सगळं साधं सोपं होतं. एखाद्या व्यक्तीला अखेरची घरघर लागली आणि त्यानं मान टाकली की नाकापुढे सूत धरलं जायचं. त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी. आणि तो चालू नसला तर त्यानं अखेरचा श्वास घेतल्याचं जाहीर व्हायचं. किंवा नाडी तपासली जायची. त्यावरून हृदयाची धडधड तपासली जायची. स्टेथस्कोप आल्यानंतर त्याच्या मदतीने हृदयाचे ठोके मोजले जायचे. आणि ते बंद पडले आहेत अशी का खात्री झाली की व्यक्ती मृत झाल्याचं डॉक्टर घोषित करायचे.

पण वैद्यकीय तंत्रज्ञानांनं एकदम झेप घेतली आणि सारंच बदलून गेलं. श्वासोच्छ्वास बंद पडल्यानंतर, हृदयाच्या तबलजीनं हात आखडता घेतल्यानंतरही कृत्रिम मार्गांनं त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास परत चालू करणं शक्य झालं. हृदयाला विजेचे झटके देऊन हृदयाला नाठाळ घोड्यासारखं मारून परत दौडवता येणं शक्य झालं. आणि जीवाचा अंत केव्हा होतो हा प्रश्न परत ऐरणीवर आला.

 त्यात भर घातली ती *ख्रिश्चियान बर्नार्ड* यांनी. त्यांनी तर थेट हृदयरोपणाची शस्त्रक्रियाच यशस्वी करून दाखवली. मृत म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीच्या शरीरातलं हृदय काढून घेऊन ते दुसऱ्याच एखाद्याच्या शरीरात स्थापन करून त्या व्यक्तीला दुसरं आयुष्य देण्याची किमया त्यांनी साध्य केली. त्याच वेळी हा सवाल उपस्थित केला गेला होता. जर ते बंद पडलेले हृदय दुसर्‍या व्यक्तीच्या शरीरात बिनबोभाट काम करू शकतं तर मग त्या मृत म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीलाच ते चालू करून जीवनदान का दिलं जाऊ नये ? ते हृदय जर असं दुसरीकडे व्यवस्थित चालू होतं तर मग तेच बंद पडल्याच्या निकषावर पहिल्याला मृत म्हणून घोषित करणं कितपत योग्य आहे ? या परिस्थितीचा गैरफायदा कोणी धनदांडगा कशावरून घेणार नाही ?

 सहाजिकच मृत्यूची, जीवाच्या अंताची व्याख्याच परत नव्याने करण्याची गरज भासू लागली. त्या वेळेस मग ब्रेन डेथची संकल्पना पुढे आली. रक्ताभिसरण म्हणजेच हृदयाची धडधड, श्वासोच्छ्वास यासकट इतर साऱ्या अनैच्छिक क्रिया सरतेशेवटी मेंदूच्या नियंत्रणाखाली चालू असतात. तो परिस्थितीवर सतत लक्ष्य ठेवून  निरनिराळय़ा अवयवांना त्यांना नेमून दिलेलं काम त्यांनी योग्यरित्या करावं म्हणून सतत संदेश पाठवत असतो आणि त्याचं स्वतःचं काम सुरळीत चालू आहे याची ग्वाहीही तो आपल्या विद्युतलहरींच्या मार्फत देत असतो. म्हणूनच हृदयाचं काम कसं चाललं आहे याची तपासणी करण्यासाठी जसा ईसीजी कामाला येतो तसाच मेंदूच्या कामाचा लेखाजोगा ईईजीच्या मार्फत मिळू शकतो. तेव्हा त्या लहरींच्या मदतीने जेव्हा मेंदूचं कामच थंडावलं असल्याचं स्पष्ट होईल तेव्हाच जीवाचा अंत झाला असं घोषित करावं असं ठरलं. यालाच ब्रेन डेथ असं म्हणतात. आता न्यायालयातही जीवाच्या अंताच्या याच व्याख्येला प्रमाण मानलं जातं.

*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*


No comments:

Post a Comment