Thursday, 19 April 2018

🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔭
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*२१ व्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोन* (१)
_________________________________

१९ वे, २० वे शतक यांमध्ये भौतिक ज्ञानाच्या क्षेत्रात वैज्ञानिक  दृष्टिकोनाच्या सहाय्याने अभूतपूर्व विकास झाला. २१ व्या शतकात सामाजिक विज्ञान व मनोविज्ञान या क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभावी कामगिरी बजावेल अशी अपेक्षा आहे. १९५३ साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाचे विज्ञानविषयक धोरण लोकसभेत मांडले. त्यावेळेला वैज्ञानिक दृष्टिकोनाचे अनन्य साधारण महत्त्व सांगत असताना त्यांचे उद्गार आहेत -
*"scientific temperament is a process of thinking, method of action, search of truth, way of life, spirit of a free man."*

*वैज्ञानिक दृष्टिकोन ही विचार व कृती करण्याची पद्धत आहे, सत्यशोधनाचा मार्ग आहे. जीवनाचे दिशादर्शन वैज्ञानिक दृष्टिकोनानेच होते आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने व्यक्तीला जाणिवांचे स्वातंत्र्य प्राप्त होते.*

यापैकी वैज्ञानिक दृष्टिकोन हा विचार व कृती करण्याचा मार्ग आहे याबाबत सविस्तर विवेचन आधी केलेच आहे. परंतु सत्य शोधणे व जीवनाचा मार्ग ठरवणे यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन परिणामकारक कसा ठरतो हे समजून घ्यावयास हवे. आजच्या गतिमान समाजात 'वेळ' या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. हे महत्त्व पैशापेक्षाही अधिक आहे असे मानले जाते, ते बरोबरच आहे. अशा समाजात आजही मृत व्यक्तीच्या निधनानंतर १० व्या दिवशी पिंडदानाचा कार्यक्रम होतो. शेकडो लोक त्यासाठी स्वतःच्या घरून स्मशानात येणे व जाणे यासाठी असंख्य तास वाया घालवतात. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे स्मशानात पिंडाला कावळा कधी शिवेल यांची वाट पाहत तासनतास समुदाय खोळंबून राहतो.
*आता पिंडाला कावळा शिवणे या रूढीचा तपास घेतला तर कोणते सत्य आढळते ?*
ते सत्य असे असे मानण्यात येते की, मृत व्यक्तीचा आत्मा १० व्या दिवशी पिंडदानाच्या वेळी स्मशानात पिंडाच्या बाजूला येतो. कावळ्याला हा आत्मा दिसतो. एवढेच नव्हे तर त्या आत्म्यामार्फत मृत व्यक्तीचा त्याला चेहरा दिसतो. त्यावरून आत्मा सुखी आहे का दु:खी आहे हे का कावळ्याला कळते. आत्मा सुखी असल्यास कावळा पटकन पिंडाला शिवतो. मात्र आत्मा दुःखी दिसल्यास कावळा पिंडाला स्पर्श करणे टाळतो. त्याद्वारे मृताच्या नातेवाईकांना असा संकेत प्राप्त होतो की, मृत व्यक्तीचा आत्मा काळजात आहे; दुःखी आहे. नातेवाईक आपल्या समजुतीनुसार त्या दुःखाचे कारण शोधून काढतात. मग त्या कारणाचे निराकरण करणारे संकल्प उच्चारतात. उदा. लग्नाला आलेल्या मुलीचे लग्न करून देऊ, बेकार मुलाला नोकरी लावून देऊ. ही मानवी भाषा आत्म्याला समजते. त्याचा चेहरा आनंदी होतो. तो आनंदी चेहरा कावळ्याला दिसतो. मग कावळा पिंडाला शिवतो. मगच स्मशानात आलेले मृताचे नातेवाईक समाधानाने परत फिरतात. आता या सर्व कथनात सत्यशोधनाचा मागमूसही नाही. पिंडाला कावळा शिवणे यांचा साधा संबंध स्मशानातील कावळ्याचे पोट भरलेले आहे की नाही याच्याशी आहे, याची जाणीवही नाही. सत्य मानली गेलेली बाब ही बहुधा धार्मिकदृष्ट्या सत्यच आहे असे मानलेले असते. स्वाभाविकच त्याबाबतच्या व्यक्तीच्या, समूहाच्या भावना संवेदनशील व तीव्र असतात. म्हणूनच त्या सत्याबाबतचे वास्तव तपासणे टाळले जाते.

*क्रमश:*

*तिमिरातुनि तेजाकडे* या पुस्तकातुन


No comments:

Post a Comment