Thursday, 19 April 2018

🍀 *मानव - कोण, केंव्हा, कसा आला ? व तो करतो काय ?* 🍀

 *१) माकडापासून माणूस ?*

 *प्रश्न* - तुम्ही म्हणता की माकडाची उत्पत्ती देवाने केलेली नसून तो कुठल्यातरी बीनशेपटीच्या माकडापासून उत्क्रांत झालेला आहे. परंतु हे कसे पटावे ? कारण आमच्या मते माकडाचे पिल्लू माकडच होईल. ते माणूस कसे होईल ? आणि माकडाचे पिल्लू माणूस झाले याला पुरावा तरी काय ?
समजा उत्क्रांतीने माकडाचा माणूस बनत असेल तर आज ते का घडत नाही ? आपण एखाद्या जंगलाजवळ उभे असताना एखाद्या माकडाचा माणूस बनला व तो जंगलातून बाहेर पडून आपल्या गावात आला असे का होत नाही ?

*उत्तर* - उत्क्रांती समजून घ्यायचीच नाही असा हट्ट केल्यावर वरील सारखे प्रश्न विचारले जातात. शंभर वर्षांचे आयुष्य असलेला मनुष्य हजार, लाख नव्हे तर कोटी वर्षे जंगलाबाहेर उभा कसा राहणार ? ज्या कुणा सस्तन प्राणी वर्गातील पुच्छविहीन मर्कट जातीपासून मानव उत्क्रांत झाला तो चार कोटी वर्षांपासून भूतलावर वावरत असावा. त्याचे वास्तव्य जंगलांमध्ये वृक्षांवर होते. कारण त्याचे अन्न, निवारा व स्वसंरक्षण यासाठी ते सोयीस्कर होते. तेव्हातरी बहुधा दोन अडीच कोटी वर्षांपूर्वी तो मागचे दोन पाय चालण्यासाठी व पुढचे दोन पाय हातासारखे वापरण्याचा प्रयत्न करू लागला असावा.
उत्क्रांतीच्या पुढील पायरीचा प्रत्यक्ष (भूस्तरीय) पुरावा 'रामपिथेकस' नाव दिलेल्या भारत व पूर्व आफ्रिकेत सापडलेल्या जिवाश्मांच्या रुपाने उपलब्ध आहे. हा थोडा उत्क्रांत पुच्छहीन वानर जरा वाकून पण दोन पायांवर चालू शकत होता. हा पुरावा एक कोटी वीस लक्ष वर्षांपूर्वीचा आहे. त्यानंतर म्हणजे सुमारे सत्तर लक्ष वर्षांपूर्वी गोरिला, चिंपांझी व माणूस (म्हणजे माणसासारखा वानर-पूर्वज) ह्या एकमेकांशी साम्य असलेल्या परन्तु वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या. अनुवंशशास्त्राने असे दाखवून दिले आहे की आजच्या ह्या तीन जाती वरीलसारख्या (म्हणजे रामपिथेकससारख्या) एकाच मर्कट जातीपासून निर्माण झाल्या आहेत.
मानव चिंपांझी व गोरिला ह्या तिघांच्या शरीरातील प्रोटिन्स हिमोग्लोबिन्स आणि डी.एन.ए. यात कमालीचे साम्य आहे. त्यात गोरिलांचे पूर्वज अगोदर आणि चिंपांझीचे पूर्वज नंतर वेगळे झाले असावेत असे दिसते. सारांश माणूस देवापासून नव्हे तर पुच्छविहीन माकडांपासून निर्माण झालेला आहे.
माणूस आणि सर्व प्रकारची वानरे हे प्रायमेट वर्गातील प्राणी आहेत. प्रयमेट वर्गातल्या प्राण्यांच्या डोळ्यांची ठेवण व हातांच्या बोटांची रचना ही वैशिष्ट्ये इतर वर्गातील प्राण्यांपेक्षा वेगळी असतात. ह्या वर्गातील वनरांच्याही पूर्वीचे पहिले प्राणी फक्त घुशीएवढ्या लहान आकाराचे होते, त्यांच्यातही हि वैशिष्ट्ये होती, ते झाडांवरच राहत होते आणि त्यांचा काळ सहा सात कोटी वर्षांपूर्वीचा असावा. त्यांची उत्क्रांती होऊन चार कोटी वर्षांपूर्वी 'वानर' दीड कोटी वर्षांपूर्वी 'पुच्छहीन वानर' (रामपिथेकस) सत्तर लाख वर्षांपूर्वी ऑसट्रेलीपिथेकस (चाळीस लाख वर्षांपूर्वी त्याच जातीचा दाक्षिणात्य वानर), पंधरा वीस लाख वर्षांपूर्वी हातमानव (होमो हॅबिलीस) नंतर दहा लाख वर्षांपूर्वी आदिमानव (होमो इरेक्टस) व शेवटी दीड लाख वर्षांपूर्वी आधुनिक मानव जात (शहाणा मानव उर्फ होमो सॅपियन) अशी मानवाची उत्क्रांती झाली आहे.

 - *शरद बेडेकर*


No comments:

Post a Comment