Thursday, 19 April 2018

📙 *बारकोड काय करतं ?* 📙
******************************

विक्रीसाठी असलेल्या कोणत्याही वस्तूंची किंमत त्या वस्तूवरच छापण्याचं बंधन आता कायद्यानंच उत्पादकांवर घातलेलं आहे. त्यामुळे पॅक केलेल्या प्रत्येक पदार्थांवर त्याची किंमत छापलेली असते. ग्राहकाच्या हिताच्या दृष्टीने हे योग्य असंच पाऊल आहे. तरीही छापलेल्या किमतीवर वेगळंच लेबल चिटकवून ग्राहकाला जास्त किंमत द्यावी लागण्याची फसवणूकही केली जाते. त्यामुळेच आता बहुतांश पदार्थांवर काळ्या पांढऱ्या उभ्या रेषा असलेलं एक चित्र छापलेलं असतं. त्यालाच बारकोड म्हणतात. हे बारकोड म्हणजे त्या पदार्थाची निर्विवाद ओळख पटवणारी सांकेतिक भाषाच असते. जसा एखाद्या व्यक्तीचा पासपोर्ट किंवा काही दिवसांनी प्रत्येकाला मिळणारा नॅशनल युनिक आयडेन्टिफिकेशन नंबर त्याची आणि त्याचीच निर्विवाद ओळख पटवतो, तसाच बारकोड त्या पदार्थाची निर्विवाद ओळख पटवतो. त्या पदार्थाची सर्व माहिती संगणकात साठवलेली असते. त्यामुळे एकदा का त्या पदार्थाची ओळख पटली, की त्या माहितीचा उपयोग करून त्याची निर्धारित केलेली किंमतही समजते आणि तीही संगणकामार्फत तयार होणाऱ्या बिलात समाविष्ट केली जाते. किंवा संगणकाच्या पडद्यावर वाचता येते. ही ओळख पटवणारं बारकोड उत्पादक कंपनीनंच तयार केलेलं असल्यामुळे त्यात हेराफेरी करण्याची शक्यता नगण्यच असते.

बारकोडमध्ये उभ्या काळ्या आणि पांढऱ्या रेषा तसंच काही आकडे असतात. या रेषांची जाडी व लांबी यावरून सांकेतिक भाषेत त्या पदार्थाची ओळख पटवणारं कोडं तयार होतं. त्यात त्या आकड्यांचाही सहभाग असतो. ते कोडं वाचण्यासाठीही खास रिडरचा वापर करावा लागतो. लेझर प्रकाशाचा वापर करणाऱ्या या रीडरमधून प्रकाशाचा एक ठिपका या रेषांवरून फिरवला जातो. तो त्या रेषांची लांबी, जाडी आणि त्यांच्यामधलं अंतर वगैरे सर्वांची नोंद करून ती संगणकाकडे पाठवतो. त्याबरोबर संगणकाकडून त्या पदार्थाची माहिती व किंमत पडद्यावर दाखवली जाते. एकाच वेळी अनेक पदार्थ विकत घेतले गेले असतील, तर तयार केल्या जाणाऱ्या बिलावर त्या किंमतीची नोंद होते. केवळ खाद्यपदार्थांसाठीच नाही तर औषधं, साबू, टूथपेस्ट यासारख्या नेहमीच्या उपयोगातील वस्तूंसाठी आता बारकोडचा वापर केला जातो. पुस्तकांसाठीही तो केला जातो. त्यामुळे पुस्तकाच्या मलपृष्ठांवर आता किमतीऐवजी त्या पुस्तकाची ओळख पटवणारा बारकोड छापलेला असतो. भाज्या, फळफळावळ, मांस, मासे यासारख्या ताज्या पदार्थांसाठी त्याचा वापर होत नाही. पण हेच पदार्थ जर वजन करून प्लास्टिकच्या पिशव्यांत पॅक केलेले असतील, तर त्यांच्यावरही बारकोड छापलेला आढळतो.

बारकोड निर्माण करणाऱ्या दोनशे प्रणाली आज उपलब्ध आहेत. त्यातल्या दोन तीनचाच वापर जास्त होतो. या प्रणालीतील सॉफ्टवेअरचा वापर करू बारकोड तयार केला जातो. बारकोड तयार करणाऱ्या सॉफ्टवेअरमध्येच त्याची छपाई करणाऱ्या सॉफ्टवेअरचा समावेश असतो. त्यामुळे सहजगत्या त्याची निर्मिती आणि छपाई करणं शक्य झालं आहे. ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार जवळजवळ टाळले गेले आहेत.

*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*


No comments:

Post a Comment