Tuesday, 24 April 2018

🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔬
""""""""""""""""""""""""""""""""""""""

🌎 *पृथ्वीची निर्मिती* 🌎 (९)
___________________________

 आज पर्यंत असे सांगण्यात येत होते की मानवी जीवनात जे काही घडते त्यामागे देव आहे अथवा दैव आहे. नशीब, प्राक्तन, प्रारब्ध, संचित, नियती ही सारी याच दैवी शक्तीची नावे होती. हे कमी म्हणून की काय भारतात या सर्वाला तत्त्वज्ञानाच्या एका सिद्धांताचे रूप देण्यात आले, त्याचे नाव कर्मविपाकाचा सिद्धांत. म्हणजे व्यक्ती जसे कर्म करतो तसे त्याला फळ मिळते. व्यक्तीने निखाऱ्यावर बोट ठेवण्याचे कर्म केले तर चटका बसण्याचे फळ त्याला मिळणारच. फुल होण्याचे कर्म केले तर सुगंधी सुवासाचे फळ त्याला मिळणारच. याचाच अर्थ असा की व्यक्ती त्याच्या जीवनात सध्या जे काही सोसत आहे किंवा फळ भोगत आहे त्याचे कर्मही त्या व्यक्तीने केले असणारच; परंतु तसे दिसत तर नव्हते. या जन्मी व्यक्त अडाणी राहात होती, गरिबीत पिचत होती; पण हे फळ त्याला मिळावे असे कोणतेच चुकीचे कर्म त्या व्यक्तीने सध्याच्या जन्मात केलेले नव्हते. मग तरीही त्या व्यक्तीला हे दुःखाचे फळ का बरे मिळत होते ? त्याचे उत्तर वैदिक तत्त्वज्ञानाने असे दिले की हे त्या व्यक्तीला सोसावे लागते कारण त्याने मागच्या जन्मी केलेल्या वाईट कर्माचे फळ या जन्मी अज्ञान व गरिबी या रूपाने व्यक्ती सोसत आहे. म्हणजे कर्मविपाकाच्या सिद्धांताने माणसाला एका झटक्यात परतंत्र करून टाकले. 'या जन्मात जे जे दैन्य, दारिद्रय़ सोसावे लागते, ते माझ्या मागच्या जन्मातील मी केलेल्या चुकीमुळे, कर्मामुळे; आणि या जन्मी मी जी काही कर्मे करीन त्यामुळे पुढच्या जन्मी मला त्याचे चांगले फळ मिळेल' - हा आहे या देशाच्या मानसिकतेत हजारो वर्षे असलेला कर्मविपाकाचा सिद्धांत. तो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा असलेल्या कार्यकारणभावाच्या थेट विरोधी जातो. या जन्मी मला जे काही सोसावे लागते त्यामागे देव नाही, दैव नाही, नियती नाही, माझ्या जन्माची वेळ नाही किंवा मागच्या जन्मीचे पाप नाही; तर या शोषणाच्या कार्यामागे काही ना काही कारण आहे आणि ते मला शोधता येते व बदलता येते. असा आत्मविश्वास वैज्ञानिक दृष्टिकोनाने मानवी इतिहासात प्रथमच दिला. त्यामुळे दैववादी विचारातून तोपर्यंत परतंत्र असलेला माणूस स्वतंत्र झाला. पराधीन मानव स्वाधीन झाला. आणखी काही गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनाने दिल्या. एक गोष्ट अशी की कार्यकारणभावाचे हे ज्ञान किंवा खरेतर कुठलेही ज्ञान शिकण्याची परवानगी भारतात महिलांना नव्हती, दलितांना नव्हती. आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाने असे सांगितले की कार्यकारणभाव कोणतीही व्यक्ती शोधू शकते. ती कोणत्याही जातीची, धर्माची, वंशाची, लिंगाची असो तिला जगाचा कार्यकारणभाव समजू शकतो. त्यामुळे मूठभरांच्यात बंद असलेले ज्ञान सर्वांना तात्त्विक पातळीवर तरी खुले झाले. शिक्षण घेणे हा प्रत्येकाचा अधिकार मानला गेला.

लोक जणू काही बिनतोड प्रश्न समजून विचारतात, विज्ञानाला समजते का हो सगळे ? सांगा बघू कॅन्सर कसा होतो ? एड्स कसा बरा होईल ? वैज्ञानिक दृष्टिकोन असा दावा करत नाही, की त्याला सर्व बाबी समजलेल्या आहेत. २०० वर्षांपूर्वी प्लेग आणि कॉलरा कसा होतो हे विज्ञानाला माहीत नव्हते. आज कॅन्सर कसा होतो हे माहित नाही. परंतु ज्याप्रमाणे कॉलरा कसा होतो हे वैज्ञानिक दृष्टिकोनाने समजले, त्याचप्रमाणे कॅन्सर कसा होतो हे देखील वैज्ञानिक दृष्टिकोनानेच समजेल.
 *आज सर्वच गोष्टी विज्ञानाला ज्ञात नाहीत. मात्र ज्यावेळी ज्ञात होतील त्यावेळी वैज्ञानिक दृष्टिकोनानेच होतील.*

 *क्रमश:*

 *तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन

No comments:

Post a Comment