Thursday, 19 April 2018

⭐ *तारे कसे जन्माला येतात ?* ⭐
***********************************

जो जन्माला आला त्याचा मृत्यू अटळ आहे आणि त्याच्या कलेवरातून पुनर्वापराच्या तत्त्वानुसार नवीन चीजेची निर्मितीही अटळ आहे.

हे विश्व जन्माला आलं ते एका शून्यातून. बिंदूमात्र असलेल्या त्या शून्याशिवाय त्या वेळी काहीही अस्तित्वात नव्हतं. त्या शून्याचा महाविस्फोट झाला आणि त्यातून हायड्रोजन व हेलियम या दोन सर्वात हलक्या वायूंचे ढग रोंरावत बाहेर पडले व त्यांच्याबरोबर प्रचंड प्रमाणातली ऊर्जा, उष्णता व विविध प्रारणे यांच्या स्वरूपात बाहेर पडली.

या वायूंच्या रेणूंच्या अंगी ही प्रचंड प्रमाणातली ऊर्जा होती. त्यामुळे ते वेगानं इतस्तत: धावत होते. त्यांचा असा वेडावाकडा धुमाकूळ चाललेला असताना त्यांच्या आपापसात टकरीही होत होत्या. अशी टक्कर झाली की त्यांच्यामधील काही ऊर्जा निघून जात असे व त्यांचा वेग मंदावे. अशा मंदावलेल्या रेणूची परत टक्कर झाली की तो इतका गलितगात्र झालेला असे, की त्या दुसऱ्या रेणूला घट्ट धरूनच तो राही. त्यामुळे हळूहळू हे रेणू एकेकटे न राहता त्यांचे जुडगे व्हायला सुरुवात झाली. शिवाय प्रत्येक रेणूच्या अंगची गुरुत्वाकर्षणाची ओढ इतर रेणूंना आपल्याकडे खेचत होती. त्यातूनही काही जुडगे तयार झाले. हे जुडगे आकारमानानं एकेकट्या रेणुंपेक्षा मोठे होते. त्यांचं वस्तुमानही जास्त होतं. त्यामुळे त्यांच्या गुरुत्वाकर्षणाची ओढही तीव्र होती. ते मग इतर रेणूंना आपल्याकडे अधिक खेचू लागले. अशा तर्‍हेनं या वायूंचे गोळे तयार होत गेले.

त्यांच्या वाढत्या वस्तुमानापोटी त्यांच्यामधली गुरुत्वाकर्षणाची ओढही वाढत गेली. त्या गोळ्यातल्या बाहेरच्या भागातले रेणू मध्यावरील केंद्राकडे जोरानं खेचले जाऊ लागले. परिणामी तो गोळा आतल्या दिशेनं दाबला जाऊ लागला. त्याची घनता वाढत गेली व तो तापातही गेला. अशा प्रकारे तापमान वाढत वाढत अशा एका अवस्थेला पोचलं की त्यातल्या हायड्रोजन अणूंचं मीलन होऊन त्यातून हेलियमच्या अणूंची निर्मिती होऊ लागली. त्या प्रक्रियेत हायड्रोजन अणूंच्या एकत्रित वस्तुमानापेक्षा हेलियमचं वस्तुमान कमी असल्यामुळे त्यातल्या काही वस्तुमानाचं ऊर्जेत रूपांतर होऊन त्यातून प्रकाशाच्या रूपात ऊर्जा बाहेर टाकली जाऊ लागली. १००० टन हायड्रोजनपासून तयार झालेल्या हेलियमचं वजन ९९३ टनच भरलं. म्हणजेच उरलेल्या सात टन वस्तुमानाचं ऊर्जेत रूपांतर झालं. अशा या अणुभट्ट्या धडधडायला लागल्या, त्यातून प्रकाशाचं उत्सर्जन व्हायला लागलं आणि तारा जन्माला आला.

आपल्या सूर्याचा जन्मही अशाच तर्‍हेनं झालेला आहे, मात्र त्याच्या जन्माला उपयोगी पडलेली साधनसामग्री दुसऱ्या एका तार्याच्या मृत्यूनंतर बाहेर पडलेली असल्यामुळे सूर्य हा दुसऱ्या पिढीचा तारा आहे असं म्हटलं जातं.

*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532

No comments:

Post a Comment