Thursday, 19 April 2018

☀ *उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहिल्यास काय होईल ?* ☀
***********************************

थोडक्यात सांगायचं तर, ते डोळे कायमचे मिटतील. कारण सूर्यकिरणांची तीव्रता इतकी असते, की त्यापायी डोळ्यांच्या पडद्याला कायमस्वरूपी इजा होऊ शकते. त्यांची तशी कारणंही आहेत. सामान्यत: अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून दिवसाच्या तळपत्या सूर्याकडे पाहवणार नाही आशीच योजना निसर्गानं करून ठेवली आहे. त्यापायी सूर्याकडे नजर वळवली की त्याचं तेज डोळ्यांना सहन न होऊन ते टाळण्यासाठी डोळ्यातली बाहुली कमालीची आकुंचन पावते. ते करण्यासाठी डोळ्यांभोवती स्नायूंना कमाल क्षमतेबाहेर काम करावं लागतं. सहाजिकच त्याचा ताण पडून स्नायु दुखू लागतात. ती वेदना सहन न झाल्यामुळेच मग नजर आपोआप सूर्यापासून दूर वळते.

 पण सूर्यग्रहणाच्या वेळेस चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य काजळल्यासारखा दिसतो. सहाजिकच त्याच्या किरणांची तीव्रता कमी झाल्याची भावना होते. पण ही चुकीची कल्पना असते. साधारणपणे सूर्यकिरणांमध्ये जंबुपार विकीरणांपासून ते रेडिओलहरीपर्यंतची प्रारणं अस्तित्वात असतात. यापैकी जंबुपार किरणं जास्त धोकादायक असतात. शिवाय डोळ्यातील भिंग या किरणांचं डोळ्याच्या पडद्याच्या पेशींवर केंद्रीकरण करतं. या पेशी दोन प्रकारच्या असतात. दंडपेशी आणि शंकूपेशी. यांच्यावर प्रकाश पडताच तो शोषला जातो व विशिष्ट रासायनिक अभिक्रिया होऊन एक विद्युतरासायनिक संदेश मेंदूकडे पाठवला जातो. आपण एखाद्या वस्तूकडे पाहातो तेव्हा त्या वस्तूवरुन परावर्तित झालेला सूर्याचा प्रकाश या पेशींवर पडतो. तो सौम्य असतो. शिवाय या रासायनिक अभिक्रियेचा प्रभाव कायमस्वरूपी नसतो. त्यामुळं या पेशी पूर्वपदावर येतात. पण जेव्हा आपण थेट सूर्याकडे पाहतो तेव्हा त्या प्रखरता कितीतरी पट अधिक असते. त्यामुळे होणारी रासायनिक अभिक्रिया अपरिवर्तनीय स्वरूपाची ठरून पेशी कायमच्या निकामी होण्याची शक्यता असते.

जेव्हा आपण एखाद्या भिंगातून सूर्यकिरण कागदावर केंद्रीत करतो तेव्हा काही वेळाने तो कागद जळू लागतो. आपल्या डोळ्यातल्या भिंगातून केंद्रीकरण झालेले सूर्याचे प्रखर किरणही अशाच तर्‍हेने या पडद्याच्या पेशी जाळून टाकू शकतात. त्यामुळे पडद्याचा तेवढा भाग जळून जातो. असे अनेक ठिपके पडद्यावर जमा झाल्यास संपूर्ण पडदाही जळून जाऊन कायमस्वरूपाचं आंधळेपण येऊ शकतं.

 खंडग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्याची लहानशी कोर जरी दिसत राहिली, तरी तिची प्रखरताही अशा प्रकारचं अंशिक किंवा संपूर्ण आंधळेपण आणण्यास पुरेसं ठरतं. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेसही संपूर्ण खग्रास अवस्था काही सेकंद किंवा मिनिटंच राहते. त्या वेळी कदाचित सूर्याकडे पाहणे शक्य होतं. पण या खग्रास अवस्थेच्या अलीकडच्या पलीकडच्या स्थितीतली सूर्यकोरही दाहक ठरू शकते. म्हणूनच कोणत्याही सूर्यग्रहणाच्या वेळेस डोळ्यांवर काळ्या काचेचं किंवा खास चष्म्याचं संरक्षण असल्याशिवाय सूर्याकडे पाहणे अतिशय धोकादायक असतं.

*बाळ फोंडके यांचा 'काय ?' या पुस्तकातून*


No comments:

Post a Comment