Thursday, 19 April 2018

🔬 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔭
""""""""""""""""""""""""""""""""""""""
🌎 *पृथ्वीची निर्मिती (७)* 🌎
_________________________

*गॅलिलिओच्या शोधामुळे, संशोधनामुळे आणि त्याला रोकडा आधार देणाऱ्या, त्याने शोधून काढलेल्या दुर्बिणीमुळे युरोपचे विचारविश्व आवर्तात सापडले. गॅलिलिओ कोपर्निकसच्या मतांना सज्जड पुष्टी देत होता. धर्मग्रंथांचे प्रामाण्य प्रश्नचिन्हांकित करत होता. अॅरिस्टॉटलचे सांगणे प्रयोगाच्या कसोटीवर तपासून पाहत होता. दुर्बिणीचा शोध लावून त्याने जणू उत्पातच घडवला होता. शुक्राला चंद्रासारख्या कला असतात, ही गोष्ट आपल्या सिद्धांताच्या सत्यतेसाठी आवश्यक आहे, हे कोपर्निकसला माहित होते. ते सिद्ध करता न आल्याने युक्तिवाद त्याच्या विरोधी जात होता. गॅलिलियोने दुर्बिणीनेच हे दाखवून दिले. चंद्रावर पर्वत आणि सूर्यावर डाग असल्याचे दाखवले. लोकांना हे धक्कादायक वाटू लागले आणि धर्ममार्तंडांच्या छातीत धडकी भरली. हे मान्य करणे म्हणजे जगन्नियंत्याच्या कार्यात दोष आहे असा अर्थ होऊ लागला. कॅथाॅलिक विद्यापीठातील शिक्षकांना सूर्यावरील डागांचा उल्लेख करण्यास बंदी घालण्यात आली. ही बंदी काही विद्यापीठांत कित्येक शतके चालू होती. 'भूमिती' हे सैतानाचे शास्त्र आहे आणि गणित शास्त्रज्ञ हे सर्व प्रकारच्या पाखंडी मताचे प्रणेते असल्याने त्यांना हद्दपार केले पाहिजे, असे उद्गार काढणार्‍या धर्मोपदेशकाला बढती देण्यात आली होती. शेवटी निर्णय करण्यासाठी ख्रिस्ती धर्माच्या न्यायसभेने खगोलशास्त्र हा विषय चर्चेला घेतला आणि बायबलमधील काही वचनांच्या आधारे अनुमान पद्धतीने दोन महत्त्वाचे निष्कर्ष काढले.*

*'सूर्य हा अगदी मध्यावर असून तो पृथ्वीभोवती फिरत नाही' हा शास्त्रज्ञांचा पहिला सिद्धांत मूर्खपणाचा, अविचाराचा, धर्मशास्त्राच्या दृष्टीने खोटा आणि पाखंडी मताचा आहे, कारण तो पवित्र धर्मशास्त्राच्या उघड उघड विरुद्ध आहे. 'पृथ्वी मध्यावर नसून ती सूर्याभोवती फिरते' हा दुसरा सिद्धांत तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने खोटा आणि धर्मश्रद्धेच्या विरुद्ध आहे.*

*त्यानंतर पोपने गॅलिलिओला धार्मिक न्यायसभेसमोर हजर राहण्याची आज्ञा केली. न्याय सभेने त्याला त्याने केलेल्या प्रमादाचा त्याग करण्याचा आदेश दिला. इ.स. २६ फेब्रुवारी १६१६ रोजी गॅलिलियोने 'कोपर्निकसची मते स्वीकारणार नाही, त्याचा लेखी व तोंडी प्रचार करणार नाही', असे शपथपूर्वक सांगून सुटका करून घेतली.*

*त्यानंतर पोपच्या आदेशाने 'पृथ्वी फिरते' असे सांगणारी सर्व पुस्तके 'निषिद्ध' ग्रंथांच्या यादीत टाकण्यात आली.*

*तरीही गॅलिलिओ आशावादी होता. १६२३ साली त्याचा मित्र कार्डिनल बेबेरीनी हा 'आठवा अर्बन' ही बिरुदावली धारण करून पोप पदावर आरूढ झाला. त्यामुळे थोडी सुरक्षितता वाढून 'जगातील दोन महान सिद्धांतांवर चर्चा' हे पुस्तक गॅलिलिओने लिहले. तो उत्कृष्ट ग्रंथ युरोपमध्ये मोठय़ा औत्सुक्याने वाचला गेला.*

*धर्ममार्तंड पुन्हा खळवळले. गॅलिलिअोवर सक्तीचे मौन लादले गेले. "पृथ्वी फिरत असल्याचे मत हे सर्व प्रकारच्या पाखंडी मतांत अत्यंत तिरस्करणीय, अत्यंत दुष्टप्रवृत्त आणि गर्हणीय आहे. पृथ्वीच्या अचलत्वाची कल्पना तिप्पट पवित्र आहे. एकवेळ आत्म्याच्या अमरत्वाविरुद्ध, परमेश्वराच्या अस्तित्वाविरुद्ध व त्याच्या मानवी अवताराविरुद्ध केलेले युक्तिवाद क्षम्य ठरतील; पण पृथ्वी फिरते हे सिद्ध करणारा युक्तिवाद क्षम्य ठरणार नाही." अशी जोरदार मोहीम गॅलिलिओच्या प्रतिपादनाविरोधात उघडली गेली.*

*क्रमश:*

*तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन


No comments:

Post a Comment