Tuesday, 24 April 2018

✨ *विश्व प्रसरण पावतं याचा अर्थ काय होतो ?* ✨
*********************************

समजा, तुम्ही बेदाणे घातलेला एक केक बनवता आहात. तर त्या केकसाठी लागणाऱ्या पिठाच्या गोळ्यात तुम्ही ते बेदाणे पेरता. त्यावेळी ते बेदाणे एकमेकांपासून काही अंतरावर असतात. आता तो पीठाचा गोळा भट्टीमध्ये किंवा ओव्हनमध्ये टाकून शिजवायला घेतला की त्या गोळ्यात असलेल्या यिस्टच्या किंवा बेकिंग पावडरच्या प्रभावाखाली तो गोळा फुगायला लागतो. केक शिजून तयार होतो तोवर तो चांगलाच फुगलेला असतो. आता त्या बेदाण्यांमधलं अंतर मोजलं तर आधी होतं त्याच्यापेक्षा ते चांगलंच वाढलेलं दिसून येतं. म्हणजेच ते बेदाणे एकमेकांपासून दूर गेलेले असतात; आणि तरीही ते त्या केकपासून दूर जात नाहीत. ते त्या केकमध्येच अडकून पडलेले असतात.

आपल्या विश्वाचीही अशीच परिस्थिती आहे. साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या महाविस्फोटात त्याचा जन्म झाला तेव्हापासून ते असंच त्या फुगणाऱ्या केकसारखं वाढत चाललं आहे. आपली पृथ्वी या दीर्घिकेत (galaxy) वावरते आहे त्या दिर्घिकेपासुन बघितलं तर इतर साऱ्या दीर्घिका आपल्यापासून दूरदूर पळत असलेल्या दिसतात. इतर दिर्घिकांवर जाऊन तिथून निरीक्षण केलं तर तरी अशीच परिस्थिती आढळते. विश्वाच्या अगदी टोकाला असलेल्या दीर्घिका आणखीच दूरवर जाताना दिसतात. आणि जितकी एखादी दीर्घिका दूर तितका तिचा दूर जाण्याचा वेगही जास्त. म्हणजे दीर्घिकेचा दूर जाण्याचा वेग तिच्या आपल्यापासून असलेल्या अंतराच्या प्रमाणात असतो. यालाच आता हबलचा सिद्धांत म्हणतात.

याचं तसंच कारणही आहे. एडविन हबल यानं १९२१ मध्ये आपलं विश्व असं प्रसरण पावत असल्याचं शोधून काढलं. त्याला असं दिसलं की दूरवरच्या दीर्घिकांकडुन येणाऱ्या प्रकाशाची तरंगलांबी वाढते आहे. आपल्या नजरेला दिसू शकणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या पट्टय़ात जांभळ्या प्रकाशाची तरंगलांबी सर्वात कमी आहे, तर तांबड्या प्रकाशाची तरंगलांबी सर्वात जास्त आहे. हबलला असं दिसून आलं की कोणत्याही दीर्घिकेपासून येणाऱ्या प्रकाशाची तरंगलांबी वाढते आहे म्हणजेच तो प्रकाश तांबड्या रंगाच्या दिशेनं झुकतो आहे. याचा अर्थ ती दीर्घिका आपल्यापासून दूर जात आहे. आपण जेव्हा स्टेशनवर उभे असतो तेव्हा आपल्या जवळ येणाऱ्या इंजिनाची शिट्टी वरच्या पट्टीत जाते, कारण त्या शिट्टीपासून निघणाऱ्या लहरी दाबल्या जाऊन त्यांची तरंगलांबी कमी होते. उलट आपल्यापासून दूर जाणाऱ्या इंजिनाची शिट्टी खालच्या पट्टीत जाते, कारण तिच्यापासून निघणाऱ्या ध्वनीलहरींची तरंगलांबी वाढत जाते. यालाच डॉप्लर परिणाम म्हणतात. दीर्घिकांपासून निघणाऱ्या प्रकाशाच्या बाबतीतही अशाच डॉप्लर परिणामापोटी त्याची तरंगलांबी तांबड्या रंगाच्या दिशेनं झुकते. म्हणजेच ती दीर्घिका आपल्यापासून दूर जाते.

*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

No comments:

Post a Comment