Tuesday, 24 April 2018

🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔬
""""""""""""""""""""""""""""""""""""""

🌎 *पृथ्वीची निर्मिती (१०)* 🌎
_________________________

जगात आज तरी यथार्थ ज्ञानप्राप्तीचा सर्वात खात्रीचा मार्ग वैज्ञानिक दृष्टिकोन हाच आहे. ग्रंथप्रामाण्य (ग्रंथात सांगितले आहे म्हणून ते खरे मानणे), शब्दप्रामाण्य (बोलणारी व्यक्ती अधिकारी आहे म्हणून तिचा शब्द न तपासता मानावा ही वृत्ती), साक्षात्कार (अचानकपणे दिव्य शक्तीमुळे विश्वाचे ज्ञान होणे), संक्रमण (विश्वाचे ज्ञान झालेल्या गुरुच्या स्पर्शाने त्या ज्ञानाचे संक्रमण शिष्यांमध्ये होणे) हे सर्व ज्ञानाचे पारंपारिक व बहुतांशी धार्मिक मार्ग वैज्ञानिक दृष्टिकोन ठामपणे नाकारतो.
 कार्यकारणभावाबरोबरच 'निसर्गसमरूपता' हाही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मूलभूत भाग आहे याचा अर्थ असा की, विश्वात कुठेही जा, तेथे घडणाऱ्या घटना सारख्याच नियमानुसार घडत असतात. निसर्गात कितीही वैविध्य असले तरी त्या वैविध्याला एका सूत्रात गुंफणारे नियम मात्र समान असतात. उदा. विषुववृत्तावर सहसा बर्फ सापडणार नाही, पण धृव प्रदेशात सगळीकडे बर्फच बर्फ आढळेल. मात्र या दोन्हींच्या मुळाशी असलेला, कोणत्या तापमानाला पाण्याचे बर्फ होते ते सांगणारा नियम एकच आहे. विषुववृत्तावर एक नियम, दक्षिण ध्रुवावर दुसरा आणि उत्तर ध्रुवावर तिसरा असे होत नाही. स्थळभिन्नतेमुळे जसा नियमात फरक पडत नाही, तसाच काळभिन्नतेमुळेही फरक पडत नाही. पाण्याचे बर्फ कधी होते, हे ठरविणारा नियम अतिप्राचीन काळात जो होता तोच आहे व भविष्यातही तोच असेल. स्थलकालपरत्वे वस्तूंचे स्वभाव बदलत नाहीत, त्यांचे वर्तन बदलल्यासारखे दिसले तरी ते वर्तन ज्या नियमांप्रमाणे घडते ते नियम तेच असतात.

 *क्रमश:*

 *तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन


No comments:

Post a Comment