Thursday, 19 April 2018

📙 *'इ' जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घ्याव्या का ?* 📙

अशक्तपणात वाटतो या कारणासाठी अनेक लोक टॉनिकच्या बाटल्या फस्त करत असतात. बी कॉम्प्लेक्सची इंजेक्शने, तर खेडय़ापाडय़ातील प्रशिक्षण न झालेल्या गावठी डॉक्टरांकडेही असतात. टॉनिक, व्हिटॅमिन्स घेण्याचे हे वेड शहरी भागातील सुशिक्षित लोकांमध्येही आढळते. मागणी तसा पुरवठा हे जरी खरे असले तरी बर्‍याचदा फायदा उकळणारी मंडळी इतरांची दिशाभूल करून निरुपयोगी असे पदार्थ बाजारात आणतात व त्याची गरजही निर्माण करतात. लोकांचे अज्ञान डॉक्टरांची धंदेवाईक वृत्ती व औषधी कंपन्यांनी अधिक नफा मिळवण्याची वृत्ती या सर्वांमुळे टॉनिकचा खप वाढतोच आहे.
या व्हिटॅमिन्स / टॉनिकच्या स्पर्धेत गेल्या काही वर्षांत 'इ' जीवनसत्त्वाचा प्रवेश झाला आहे. अनेक जाहिरातीत जीवनसत्त्व 'इ' दररोज वापरल्याने सुदृढपणा येतो शक्ती येते. असे लिहिलेले असते. हे खरे आहे काय ते आता पाहू.
जीवनसत्त्व 'इ' म्हणजेच टोकोफेराॅल, वनस्पतीज तेले, सरकी, सूर्यफुलाच्या बिया, अंड्याचे बलक तसेच लोणी या पदार्थांमध्ये जीवनसत्त्व 'इ' विपुल प्रमाणात आढळते. प्रौढ व्यक्तीला दर दिवशी दहा मिलिग्रॅम इतके जीवनसत्त्व 'इ' लागते. प्रत्येकाला जीवनसत्त्व 'इ' ची नितांत गरज असते हे जरी खरे असले तरी या जीवनसत्त्वाची कमतरता कोणाच्याही शरीरात निर्माण झाल्याचा पुरावा आजतागायत आढळलेला नाही. त्यामुळे जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घेण्याची काही गरज नाही असे म्हणता येते. शिवाय जीवनसत्त्व 'इ' चे प्रमाण खूप जास्त झाल्यास मानवी लिम्फोसाइट या पांढर्‍या रक्तपेशींवर विपरीत परिणाम होतो असे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये सिद्ध झालेले अाहे. या सर्व बाबींचा विचार करता इ जीवनसत्व दररोज घेऊ नये, हे तुम्हाला पटलेच असेल.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून

No comments:

Post a Comment