Thursday, 19 April 2018

🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔬
""""""""""""""""""""""""""""""""""""

 🌎 *पृथ्वीची निर्मिती (६)* 🌎

 इंग्रजीमधील 'सायन्स' या शब्दाला मराठी प्रतिशब्द 'विज्ञान' असा आहे. 'सायन्स' हा शब्द लॅटिन भाषेतील 'सायेन्सिया' या शब्दापासून तयार झाला आहे. 'सायेन्सिया' या शब्दाचा अर्थ 'ज्ञान' असा आहे. ज्ञानाबद्दल अगदी शुद्ध स्वरूपात कुतूहल (खरे तर प्रेम) हीच विज्ञानाची प्रेरक शक्ती आहे. सृष्टीबद्दल कधीही न संपणाऱ्या कुतुहलातून विज्ञानाचा जन्म झाला. फुलपाखरांच्या अंगावर इतके रंग कुठून येतात ? नुसत्या डोळ्यांनी आकाशातील किती तारे मोजता येतील ? सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी सूर्यबिंब इतर वेळेपेक्षा मोठे का दिसते ? डास का गुणगुणतात ? असे अगणित प्रश्न माणसाच्या मनात सतत उभे राहतात. विश्वातील या नाना क्रिया, त्यांचे आविष्कार, यांचा पाठपुरावा करण्याची अंगभूत जिज्ञासा माणसाला असते. ती तृप्त होताच त्याला मनस्वी आनंद होतो. आनंदप्राप्तीसाठीची धडपड ही माणसाची एक सहज प्रवृत्ती असते. ज्ञानाच्या क्षेत्रात त्याचा पाठपुरावा झाल्याने विज्ञानाची वाटचाल होते. विज्ञानाचे मूळ ऐतिहासिकदृष्ट्या माणसाला लाभलेली भौतिक देणगी व मनुष्याच्या अंगातील पारंपरिक कारागिरी किंवा कौशल्य यांमध्ये स्पष्ट होते. हा व्यावहारिक अनुभव व निसर्गदत्त कसब यांची साठवण एका पिढीतून दुसऱ्या पीढीत होत असते आणि त्यांचा विकासही होत असतो. ही सारी माणसाची कमाई आधुनिक विज्ञानाचा उदय होण्यापूर्वीची आहे. आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनात निरीक्षण तर्कशुद्ध विचार व प्रयोग यांचा समावेश असतो. या आधुनिक दृष्टिकोनाचा वापर होण्यासाठी सुरुवातीच्या काळात दोन प्रमुख अडथळे होते. पहिली अडचण अशी की कुशल कारागीर असलेल्या व्यक्तींमध्येही तर्कशुद्ध विचार व त्यासाठीची सम्यक दृष्टी यांचा अभाव होता. दुसरी अधिक महत्त्वाची अडचण म्हणजे नैसर्गिक घटनांबद्दलच्या माणसांच्या कल्पना त्या काळात बहुधा स्पष्ट होत्या किंवा पूर्व ग्रह दूषित तरी होत्या. विज्ञानाची रचना बुद्धिगम्य असते त्याचा गाभा इंद्रियांद्वारे येणारी वस्तुनिष्ठ प्रचिती हा असतो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात व त्याआधी (म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती होण्याआधी) युरोपात राजा व धर्म यांना संमत असणाऱ्या मतावर सत्य असत्य ठरवले जात होते. यामुळे विज्ञानाची प्रगती खुंटली होती. निसर्गाबद्दल कित्तेक चुकीच्या कल्पना समाजात रूढ झाल्या होत्या. उदाहरणार्थ पृथ्वी ही विश्वाच्या मध्यभागी आहे, देवाकडून मानवाची निर्मिती झाली इत्यादी. त्या काळातले विज्ञान हे श्रद्धाधिष्ठित होते. विज्ञानाचा समन्वय एका बाजूला चर्चची मान्यता असलेले बायबलमधील ज्ञान आणि दुसरीकडे सर्वश्रेष्ठ ज्ञानी म्हणून गौरविलेल्या ॲरिस्टॉटलचे मत याद्वारे केले जाई, त्यामुळे विज्ञानाला काहीसे बाैद्धिक कसरतीचे स्वरूप प्राप्त झाले होते. उदा. ॲरिस्टॉटलच्या मताप्रमाणे एखाद्या नैसर्गिक आविष्कारामागे दोन महत्त्वाची कारणे असतात. एकाचे नाव कार्यक्षम कारण (एफिशियंट काॅज) दुसरे अखेरचे कारण (फायनल काॅज). कार्यक्षम कारण म्हणजे ज्याला आपण कार्यकारणभाव म्हणतो त्यांच्याशी सुसंगत असण्याचा प्रयत्न आणि अखेरचे कारण म्हणजे त्या मागचा 'हेतू'. हा हेतू धर्मग्रंथांच्या मांडणीशी सुसंगत असावा, अशी दक्षता घेतली जात असे.

 जगातील देशांचा इतिहास हेच दाखवतो की, स्वतंत्र चिंतन अवलोकन अनुभूती व त्याआधारे ज्ञान यांना ज्या प्रमाणात ज्या क्षेत्रात अवसर मिळतो; त्या प्रमाणात त्या क्षेत्रात समाजाचा उत्कर्ष होतो. हे स्वतंत्र चिंतन, संशोधन थबकलेला काळ हे तमोयुग असते. चौथ्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत युरोपमध्ये ही स्थिती होती.

 *क्रमश:*

 *तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन


No comments:

Post a Comment