Tuesday, 24 April 2018

🌎 *पृथ्वीवर सजीवसृष्टी केव्हा अवतरली ?* 🌎
***********************************

जेम्स अश्शर या आयरिश धर्मगुरूने बायबलचा हवाला देत असा दावा केला होता की हे सारं जग त्यातल्या सजिवांच्या तसंच निर्जीवांच्या वैविध्यासह इसवी सनापूर्वीच्या ४००४ या वर्षी २६ ऑक्टोबरपासूनच्या सहा दिवसांत अस्तित्वात आलं. पण पृथ्वीवरच्या अनेक खडकांचंच वय किमान साडेतीन अब्ज वर्ष असल्याचं सिद्ध झालं आहे. तसंच निरनिराळ्या उत्खननातून सापडलेल्या अनेक जीवाश्मांचं वयही कोट्यवधी वर्ष असल्याचा निर्णायक पुरावा मिळालेला आहे. तेव्हा आपलं जग किंवा आपली सजीवसृष्टी ही केवळ सहा हजार वर्षांपूर्वीच अवतरली हा दावा पोकळ ठरतो.

 जगाच्या किंवा सजीवसृष्टीच्या उत्पत्तीसंबंधीचे असे सिद्धांत जवळजवळ प्रत्येक धर्माच्या धुरीणांकडून मांडले गेले आहेत. त्यापाठी निसर्गाच्या अनेक गुढांसंबंधीचं त्या त्या वेळचं तुटपुंजं ज्ञान कारणीभूत होतं यात शंका नाही. शिवाय सजीवसृष्टीचा विचार करताना आपण आज आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या सजीवसृष्टीला प्रमाण मानून आपले आडाखे बांधत असतो. पण मानवप्राण्यापेक्षा इतर अनेक प्राणी कितीतरी आधी उदयाला आले आहेत. वनस्पती तर त्याहूनही पुरातन आहेत. शिवाय या वन्य वनस्पती किंवा प्राणी यांचे कित्येक पूर्वसुरी आता नष्टही झाले आहेत. डायनासोर या धरतीवर तब्बल साडेसोळा कोटी वर्षांचा अंमल गाजवून साडेसहा कोटी वर्षांपूर्वी विनाश पावले. सर्वात प्राथमिक अवस्थेतले सजीव म्हणजे एकपेशीय सूक्ष्मजीव. त्यांचं अस्तित्व तर कितीतरी पुरातन आहे.

 तेव्हा सजीवसृष्टीच्या उदयाचा विचार करताना आपल्याला या प्राथमिक स्वरूपाच्या सजीवांकडे लक्ष वळवायला हवं. थोडक्यात ज्यांच्या ठायी स्वतःचं पुनरुत्पादन स्वतःच्याच बळावर करण्याची क्षमता आहे अशा काही सेंद्रिय रेणूंचा विचार करायला हवा. या दृष्टीने नोबेल पोलिस पुरस्कारविजेते हॅरॉल्ड युरे आणि त्यांचा विद्यार्थी स्टॅनले मिलर यांनी केलेल्या एका क्रांतिकारी आणि विलक्षण प्रयोगाकडे लक्ष द्यायला हवं. पृथ्वी जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा तिच्या वातावरणात ऑक्सिजनचा संपूर्ण अभाव होता.

तेव्हा मिलर यानं त्या वेळच्या मिथेन, कार्बन डाय अाॅक्साईड, वाफ वगैरेंचं मिश्रण असलेल्या वातावरणाचं एक प्रारूप प्रयोगशाळेत तयार केलं. तसंच त्या वेळी धरतीवर असणाऱ्या उबदार सागरांचं, सतत कोसळणाऱ्या वादळी पावसाचं आणि कडाडणाऱ्या विजांचंही प्रारूप बनवलं. त्या उबदार सागरांमध्ये त्यांनी काही असेंद्रिय रसायनांचं मिश्रणही ठेवलं. आदिधरतीच्या त्या अवस्थेत ती प्रयोगशाळा आठ दिवस राहिल्यानंतर मिलर यांनी शांतता प्रस्थापित केली. तेव्हा त्यांना निर्जीव अशा असेंद्रिय रसायनांपासून सजीवांचा कळीचा गाभा असलेल्या सेंद्रिय रसायनांची व खासकरून प्रथिनांचे घटक असणाऱ्या काही अमिनो आम्लांची निर्मिती झाल्याचं दिसून आलं. त्याचा मागोवा घेऊन त्यांनी धरतीवरची सजीवसृष्टी तशाच प्रकार साधारण ३.६ अब्ज वर्षांपूर्वी अवतरली असं अनुमान काढलं. त्याला नंतरच्या अनेक वैज्ञानिक प्रयोगांमधून तसंच सर्वेक्षणांमधून बळकटी मिळालेली आहे.

*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*
*मॅक्स प्लांक*

*जर्मन भौतिकीविज्ञ, पुंज सिद्धांताचे जनक*

*जन्मदिन - २३ एप्रिल १८५८*

जर्मन भौतिकीविज्ञ. सुप्रसिद्ध ⇨ पुंज सिद्धांताचे जनक व १९१८ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म कील येथे झाला. म्यूनिक व बर्लिन येथील विद्यापीठांत गुस्टाफ किरखोफ व हेर्मान फोन हेल्महोल्ट्स या नामवंत शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण झाले. ⇨ऊष्मागतिकीच्या दुसऱ्या नियमावर प्रबंध लिहून त्यांनी १८७९ मध्ये म्यूनिक विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळविल्यानंतर त्याच विद्यापीठात (१८८०-८५) व नंतर कील (१८८५-८९) येथे ते भौतिकीचे प्राध्यापक होते. १८८९ मध्ये बर्लिन विद्यापीठात किरखोफ यांच्या जागेवर प्लांक यांची नेमणूक झाली व तेथेच १९२६ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर शास्त्रीय संशोधनाकरिता खास स्थापन करण्यात आलेल्या कैसर व्हिल्हेल्म सोसायटीचे ते १९३०-३७ मध्ये अध्यक्ष होते. याच संस्थेचे पुढे माक्स प्लांक सोसायटी असे नामांतरण करण्यात आले.
किरखोफ यांच्या मार्गदर्शनाखाली प्लांक यांनी सुरूवातीला ऊष्मागतिकीसंबंधी संशोधन केले. ⇨एंट्रॉपी, ऊष्माविद्युत् (उष्णतेचे सरळ विद्युत् ऊर्जेत होणारे रूपांतर) व विरल विद्रावांचा सिद्धांत याविषयी त्यांचे निबंध त्या वेळी प्रसिद्ध झाले. प्लांक यांचे प्रमुख कार्य कृष्ण पदार्थाच्या (सर्वच्या सर्व आपाती प्रारण-पडणारी तरंगरूपी ऊर्जा-शोषून घेणाऱ्या व तापविला असता संपूर्ण प्रारण उत्सर्जित करणाऱ्या आदर्श व काल्पनिक पदार्थाच्या) प्रारणासंबंधीचे आहे [⟶ उष्णताप्रारण]. कृष्ण पदार्थाने उत्सर्जित केलेल्या ऊर्जेच्या तरंगलांबीचे वितरण आणि त्याचे तापमान यांतील संबंधाचे प्रत्यक्ष प्रयोगाने केलेले निरीक्षण आणि लॉर्ड रॅली इत्यादींनी मांडलेली सूत्रे यांत तफावत असल्याचे आढळून आले होते. प्लांक यांनी ऊर्जा व प्रारणाची कंप्रता (एका सेकंदात होणाऱ्या कंपनांची संख्या) यांतील संबंध शोधून काढला आणि तो प्रस्थापित करण्यासाठी प्रारण ऊर्जा ही फक्त पृथक् मूल्ये घेते किंवा पुंजांच्या (क्वांटाच्या) स्वरूपात उत्सर्जित होते, या क्रांतिकारक गृहीतकाचा आधार घेतला. v कंप्रतेच्या अनुस्पंदकाची [विशिष्ट कंप्रतेला अनुस्पंदन दर्शविणाऱ्या प्रयुक्तीची; ⟶ अनुस्पंदन] ऊर्जा hv असते, येथे ℎ हा स्थिरांक असून त्याला आता प्लांक स्थिरांक असे नाव प्राप्त झाले आहे. प्लांक यांनी १९०० साली मांडलेली पुंजाची कल्पना ही भौतिकीच्या विकासातील एक अतिशय महत्त्वाची पायरी ठरलेली आहे. सुरूवातीला प्लांक यांच्या शोधाचे महत्त्व व अभिजात भौतिकीवर त्याचे होणारे परिणाम यांचे योग्य मूल्यमापन झाले नाही. तथापि ⇨प्रकाशविद्युत् परिणामाचे अॅल्बर्ट आइन्स्टाइन यांनी केलेले स्पष्टीकरण आणि यासारखेच अभिजात सिद्धांत व प्रत्यक्ष निरीक्षित घटना यांतील फरकांचे स्पष्टीकरण करणे पुंज सिद्धांतामुळेच शक्य झाले.


🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔬
""""""""""""""""""""""""""""""""""""""

🌎 *पृथ्वीची निर्मिती (१०)* 🌎
_________________________

जगात आज तरी यथार्थ ज्ञानप्राप्तीचा सर्वात खात्रीचा मार्ग वैज्ञानिक दृष्टिकोन हाच आहे. ग्रंथप्रामाण्य (ग्रंथात सांगितले आहे म्हणून ते खरे मानणे), शब्दप्रामाण्य (बोलणारी व्यक्ती अधिकारी आहे म्हणून तिचा शब्द न तपासता मानावा ही वृत्ती), साक्षात्कार (अचानकपणे दिव्य शक्तीमुळे विश्वाचे ज्ञान होणे), संक्रमण (विश्वाचे ज्ञान झालेल्या गुरुच्या स्पर्शाने त्या ज्ञानाचे संक्रमण शिष्यांमध्ये होणे) हे सर्व ज्ञानाचे पारंपारिक व बहुतांशी धार्मिक मार्ग वैज्ञानिक दृष्टिकोन ठामपणे नाकारतो.
 कार्यकारणभावाबरोबरच 'निसर्गसमरूपता' हाही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मूलभूत भाग आहे याचा अर्थ असा की, विश्वात कुठेही जा, तेथे घडणाऱ्या घटना सारख्याच नियमानुसार घडत असतात. निसर्गात कितीही वैविध्य असले तरी त्या वैविध्याला एका सूत्रात गुंफणारे नियम मात्र समान असतात. उदा. विषुववृत्तावर सहसा बर्फ सापडणार नाही, पण धृव प्रदेशात सगळीकडे बर्फच बर्फ आढळेल. मात्र या दोन्हींच्या मुळाशी असलेला, कोणत्या तापमानाला पाण्याचे बर्फ होते ते सांगणारा नियम एकच आहे. विषुववृत्तावर एक नियम, दक्षिण ध्रुवावर दुसरा आणि उत्तर ध्रुवावर तिसरा असे होत नाही. स्थळभिन्नतेमुळे जसा नियमात फरक पडत नाही, तसाच काळभिन्नतेमुळेही फरक पडत नाही. पाण्याचे बर्फ कधी होते, हे ठरविणारा नियम अतिप्राचीन काळात जो होता तोच आहे व भविष्यातही तोच असेल. स्थलकालपरत्वे वस्तूंचे स्वभाव बदलत नाहीत, त्यांचे वर्तन बदलल्यासारखे दिसले तरी ते वर्तन ज्या नियमांप्रमाणे घडते ते नियम तेच असतात.

 *क्रमश:*

 *तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन


📙 *जीवाचा अंत केव्हा होतो ?* 📙
************************************

पूर्वी कसं सगळं साधं सोपं होतं. एखाद्या व्यक्तीला अखेरची घरघर लागली आणि त्यानं मान टाकली की नाकापुढे सूत धरलं जायचं. त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी. आणि तो चालू नसला तर त्यानं अखेरचा श्वास घेतल्याचं जाहीर व्हायचं. किंवा नाडी तपासली जायची. त्यावरून हृदयाची धडधड तपासली जायची. स्टेथस्कोप आल्यानंतर त्याच्या मदतीने हृदयाचे ठोके मोजले जायचे. आणि ते बंद पडले आहेत अशी का खात्री झाली की व्यक्ती मृत झाल्याचं डॉक्टर घोषित करायचे.

पण वैद्यकीय तंत्रज्ञानांनं एकदम झेप घेतली आणि सारंच बदलून गेलं. श्वासोच्छ्वास बंद पडल्यानंतर, हृदयाच्या तबलजीनं हात आखडता घेतल्यानंतरही कृत्रिम मार्गांनं त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास परत चालू करणं शक्य झालं. हृदयाला विजेचे झटके देऊन हृदयाला नाठाळ घोड्यासारखं मारून परत दौडवता येणं शक्य झालं. आणि जीवाचा अंत केव्हा होतो हा प्रश्न परत ऐरणीवर आला.

 त्यात भर घातली ती *ख्रिश्चियान बर्नार्ड* यांनी. त्यांनी तर थेट हृदयरोपणाची शस्त्रक्रियाच यशस्वी करून दाखवली. मृत म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीच्या शरीरातलं हृदय काढून घेऊन ते दुसऱ्याच एखाद्याच्या शरीरात स्थापन करून त्या व्यक्तीला दुसरं आयुष्य देण्याची किमया त्यांनी साध्य केली. त्याच वेळी हा सवाल उपस्थित केला गेला होता. जर ते बंद पडलेले हृदय दुसर्‍या व्यक्तीच्या शरीरात बिनबोभाट काम करू शकतं तर मग त्या मृत म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीलाच ते चालू करून जीवनदान का दिलं जाऊ नये ? ते हृदय जर असं दुसरीकडे व्यवस्थित चालू होतं तर मग तेच बंद पडल्याच्या निकषावर पहिल्याला मृत म्हणून घोषित करणं कितपत योग्य आहे ? या परिस्थितीचा गैरफायदा कोणी धनदांडगा कशावरून घेणार नाही ?

 सहाजिकच मृत्यूची, जीवाच्या अंताची व्याख्याच परत नव्याने करण्याची गरज भासू लागली. त्या वेळेस मग ब्रेन डेथची संकल्पना पुढे आली. रक्ताभिसरण म्हणजेच हृदयाची धडधड, श्वासोच्छ्वास यासकट इतर साऱ्या अनैच्छिक क्रिया सरतेशेवटी मेंदूच्या नियंत्रणाखाली चालू असतात. तो परिस्थितीवर सतत लक्ष्य ठेवून  निरनिराळय़ा अवयवांना त्यांना नेमून दिलेलं काम त्यांनी योग्यरित्या करावं म्हणून सतत संदेश पाठवत असतो आणि त्याचं स्वतःचं काम सुरळीत चालू आहे याची ग्वाहीही तो आपल्या विद्युतलहरींच्या मार्फत देत असतो. म्हणूनच हृदयाचं काम कसं चाललं आहे याची तपासणी करण्यासाठी जसा ईसीजी कामाला येतो तसाच मेंदूच्या कामाचा लेखाजोगा ईईजीच्या मार्फत मिळू शकतो. तेव्हा त्या लहरींच्या मदतीने जेव्हा मेंदूचं कामच थंडावलं असल्याचं स्पष्ट होईल तेव्हाच जीवाचा अंत झाला असं घोषित करावं असं ठरलं. यालाच ब्रेन डेथ असं म्हणतात. आता न्यायालयातही जीवाच्या अंताच्या याच व्याख्येला प्रमाण मानलं जातं.

*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*


🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔬
""""""""""""""""""""""""""""""""""""""

🌎 *पृथ्वीची निर्मिती* 🌎 (९)
___________________________

 आज पर्यंत असे सांगण्यात येत होते की मानवी जीवनात जे काही घडते त्यामागे देव आहे अथवा दैव आहे. नशीब, प्राक्तन, प्रारब्ध, संचित, नियती ही सारी याच दैवी शक्तीची नावे होती. हे कमी म्हणून की काय भारतात या सर्वाला तत्त्वज्ञानाच्या एका सिद्धांताचे रूप देण्यात आले, त्याचे नाव कर्मविपाकाचा सिद्धांत. म्हणजे व्यक्ती जसे कर्म करतो तसे त्याला फळ मिळते. व्यक्तीने निखाऱ्यावर बोट ठेवण्याचे कर्म केले तर चटका बसण्याचे फळ त्याला मिळणारच. फुल होण्याचे कर्म केले तर सुगंधी सुवासाचे फळ त्याला मिळणारच. याचाच अर्थ असा की व्यक्ती त्याच्या जीवनात सध्या जे काही सोसत आहे किंवा फळ भोगत आहे त्याचे कर्मही त्या व्यक्तीने केले असणारच; परंतु तसे दिसत तर नव्हते. या जन्मी व्यक्त अडाणी राहात होती, गरिबीत पिचत होती; पण हे फळ त्याला मिळावे असे कोणतेच चुकीचे कर्म त्या व्यक्तीने सध्याच्या जन्मात केलेले नव्हते. मग तरीही त्या व्यक्तीला हे दुःखाचे फळ का बरे मिळत होते ? त्याचे उत्तर वैदिक तत्त्वज्ञानाने असे दिले की हे त्या व्यक्तीला सोसावे लागते कारण त्याने मागच्या जन्मी केलेल्या वाईट कर्माचे फळ या जन्मी अज्ञान व गरिबी या रूपाने व्यक्ती सोसत आहे. म्हणजे कर्मविपाकाच्या सिद्धांताने माणसाला एका झटक्यात परतंत्र करून टाकले. 'या जन्मात जे जे दैन्य, दारिद्रय़ सोसावे लागते, ते माझ्या मागच्या जन्मातील मी केलेल्या चुकीमुळे, कर्मामुळे; आणि या जन्मी मी जी काही कर्मे करीन त्यामुळे पुढच्या जन्मी मला त्याचे चांगले फळ मिळेल' - हा आहे या देशाच्या मानसिकतेत हजारो वर्षे असलेला कर्मविपाकाचा सिद्धांत. तो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा असलेल्या कार्यकारणभावाच्या थेट विरोधी जातो. या जन्मी मला जे काही सोसावे लागते त्यामागे देव नाही, दैव नाही, नियती नाही, माझ्या जन्माची वेळ नाही किंवा मागच्या जन्मीचे पाप नाही; तर या शोषणाच्या कार्यामागे काही ना काही कारण आहे आणि ते मला शोधता येते व बदलता येते. असा आत्मविश्वास वैज्ञानिक दृष्टिकोनाने मानवी इतिहासात प्रथमच दिला. त्यामुळे दैववादी विचारातून तोपर्यंत परतंत्र असलेला माणूस स्वतंत्र झाला. पराधीन मानव स्वाधीन झाला. आणखी काही गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनाने दिल्या. एक गोष्ट अशी की कार्यकारणभावाचे हे ज्ञान किंवा खरेतर कुठलेही ज्ञान शिकण्याची परवानगी भारतात महिलांना नव्हती, दलितांना नव्हती. आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाने असे सांगितले की कार्यकारणभाव कोणतीही व्यक्ती शोधू शकते. ती कोणत्याही जातीची, धर्माची, वंशाची, लिंगाची असो तिला जगाचा कार्यकारणभाव समजू शकतो. त्यामुळे मूठभरांच्यात बंद असलेले ज्ञान सर्वांना तात्त्विक पातळीवर तरी खुले झाले. शिक्षण घेणे हा प्रत्येकाचा अधिकार मानला गेला.

लोक जणू काही बिनतोड प्रश्न समजून विचारतात, विज्ञानाला समजते का हो सगळे ? सांगा बघू कॅन्सर कसा होतो ? एड्स कसा बरा होईल ? वैज्ञानिक दृष्टिकोन असा दावा करत नाही, की त्याला सर्व बाबी समजलेल्या आहेत. २०० वर्षांपूर्वी प्लेग आणि कॉलरा कसा होतो हे विज्ञानाला माहीत नव्हते. आज कॅन्सर कसा होतो हे माहित नाही. परंतु ज्याप्रमाणे कॉलरा कसा होतो हे वैज्ञानिक दृष्टिकोनाने समजले, त्याचप्रमाणे कॅन्सर कसा होतो हे देखील वैज्ञानिक दृष्टिकोनानेच समजेल.
 *आज सर्वच गोष्टी विज्ञानाला ज्ञात नाहीत. मात्र ज्यावेळी ज्ञात होतील त्यावेळी वैज्ञानिक दृष्टिकोनानेच होतील.*

 *क्रमश:*

 *तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन

*शकुन्तला देवी*

*गणितज्ञ*

*स्मृतिदिन - २१ एप्रिल २०१३*

शकुंतला देवी (४ नोव्हेंबर, १९२९ - एप्रिल २१, २०१३), सामान्यतः "मानवी संगणक" या नावाने ओळखल्या जात असे. त्या लहानपणापासून अलौकिक व मानसशास्त्रज्ञ (गणितज्ञ) होत्या. त्यांची प्रतिभा पाहता, त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये १९८२ मध्ये समाविष्ट होते.

शकुंतला देवींचा जन्म बंगलोर शहरात झाला.
नोव्हेंबर २०१३ रोजी, आपल्या ८४ व्या वाढदिवसाच्या दिवशी, Google ने त्यांच्या सन्मानार्थ त्यांना Google डूडल समर्पित केले.


🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔬
**************************

      *पृथ्वीची निर्मिती (८)*
_________________________

गॅलिलिओला रोमच्या धार्मिक न्यायसभेसमोर हजर राहण्याचा पुन्हा एकवार हुकूम सुटला. आजारपणामुळे फलारेन्झापासून रोमपर्यंतचा प्रवास झेपणार नाही ही गॅलिलिओची नम्र विनंती नाकारण्यात आली. मित्र असलेल्या पोपने आरोपीची प्रकृती तपासण्याकरता स्वतःचा वैद्य पाठविण्याची व त्याचा आजार बळावला असल्याचे सिद्ध न झाल्यास त्याला साखळदंडांने जेरबंद करून आणण्याची धमकी दिली. गॅलिलिओ स्वतःच रोमला पोहोचला. तेथे न्यायसभेच्या बंदीशाळेत त्याची रवानगी करण्यात आली. खरे तर देहांत प्रायश्चित्त मिळावयाचे; पण दयाळूपणा सुनावण्यात आले, 'तू चुका कबूल केल्यास आणि पश्चाताप पावल्यास तुला आमच्या मर्जीस येईल तोपर्यंत पवित्र न्यायसभेच्या तुरुंगात दिवस काढण्याची सौम्य शिक्षा फर्मावण्यात येईल आणि एक हितकारक देहदंड म्हणून पुढील तीन वर्षे धर्मग्रंथांतील सात पश्चात्तापनिदर्शक प्रार्थना दर आठवड्यास पठण करण्याची आज्ञा देण्यात येईल.'
चुका कबूल केल्या तरच ही सौम्य शिक्षा अमलात येणार असल्याने गॅलिलिओने जमिनीवर गुडघे टेकून न्यायसभेने तयार केलेली लांबलचक जंत्री जाहीर रित्या म्हणून दाखवली आणि म्हणाला, "मी या चुकांचा व पाखंडी मतांचा त्याग करतो, ती तिरस्करणीय मानतो आणि अशी शपथ घेतो की, मी यानंतर माझ्याविषयी शंका निर्माण होईल असे काहीही लेखन करणार नाही वा वक्तव्य करणार नाही अथवा ठामपणे मांडणार नाही. पृथ्वी फिरते आहे या मताचा पुरस्कार करणारा कोणी पाखंडी भेटल्यास मी त्याचा न्यायसभेसमोर निषेध करीन." स्वतःच्या विचारांचा त्याग केल्याची शपथ बायबलवर हात ठेवून त्याने घेतली. नंतर उदार न्यायसभेने त्याला उरलेले आयुष्य तुरुंगात न काढता एकांतवासात व मौनव्रतात काढण्याची परवानगी दिली. गॅलिलिओच्या सर्व हालचालींवर निर्बंध घालण्यात आले. त्याची त्याच्या कुटुंबीयांशी व मित्रांची भेट होऊ दिली नाही. तो १६३७ साली आंधळा झाला आणि १६४२ साली मरण पावला.
 आता प्रश्न असा उपस्थित होतो की गॅलिलियो ने असा गंभीर गुन्हा तरी कोणता केला होता ? जी गोष्ट आज प्राथमिक शाळेतील पोराला शिकवली जाते आणि निश्चित स्वरूपात माहित असते, अशी बाब सप्रयोग सिद्ध करूनही बिनशर्त माफी मागण्याची वेळ गॅलेलीओवर का आली ? ती आली याचे कारणे गॅलिलिओ हा या विश्वातील एका रचनेचा वेगळा कार्यकारणभाव लोकांना स्पष्ट करून सांगत होता. सूर्य चंद्राच्या अस्तित्वाचा, ते प्रकाशण्याचा आणि मावळण्याचा बायबल मधला कार्यकारणभाव होता, आकाशातील बाप्पाची म्हणजे परमेश्वराची इच्छा. गॅलीलिओ सांगत होता अगदीच वेगळा कार्यकारणभाव. संपूर्ण विश्व कसे चालते याबाबतच्या शिकवणुकीचा केंद्रबिंदू कोपर्निकसने बदलला, गॅलेलियोने त्यावर मोहर उठवली आणि जगाचा अर्थ लावण्याची एक नवीन रीत मानवी इतिहासात सिद्ध झाली. ती रीत अशी-
 *१) प्रत्येक कार्यामागे कोणते ना कोणते कारण असतेच.*
 *२) ते कारण मानवी बुद्धीला समजू शकते.*
 *३) सर्वच गोष्टींची कारणे समजतात असे नाही; परंतु ज्यावेळी समजतील त्या वेळी कशा प्रकारे समजतील ते नक्की समजते.*
 *४) यथार्थ ज्ञानप्राप्तीचा आज तरी माणसाला लाभलेला हा सर्वात खात्रीचा मार्ग आहे.*
 यामुळे जगाकडे बघण्याची एक आरपार वेगळी दृष्टी मानवाला प्राप्त झाली.

 *क्रमश:*

*तिमिरातून तेजाकडे* या पुस्तकातुन
*२० एप्रिल १८६२*

*लुई पाश्चर व क्लॉड बर्नार्डने पाश्चरायझेशनचा प्रयोग केला*

*पाश्चराइज्ड दूध म्हणजे काय ?*

आपण पिशव्यांचे दूध जेव्हा अाणतो तेव्हा त्यावर पाश्चराईझड् मि्क असे लिहिलेले असते. पाश्चराइज्ड म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला सतावत असेल. लुईस पाश्चर या शास्त्रज्ञाच्या नावावरून हे नाव दिले गेले आहे. या फ्रेंच शास्त्रज्ञाने दूध निर्जंतुक करण्याची जी पद्धत शोधून काढली त्याला पाश्चरायझेशन असे म्हणतात.
 आपल्या घरी दूध खराब होऊन नासू नये म्हणून एक तर आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो वा उकळून थंड करून फ्रिजमध्ये ठेवतो. दूध आणून जर तसेच ठेवले तर काही वेळाने ते नासते. उन्हाळ्यात तर असे फार लवकर होऊ शकते मग दुधाचे एवढे टँकर लाखो लिटर दुधाच्या डेअरीमध्ये दूध टिकावे म्हणून काय करत असतील, हा प्रश्न अनेकांना पडला असेल.
 यासाठी काय करतात ते आपण पाहू. दूध योग्य त्या तापल्या पानांपर्यंत योग्य त्या काळासाठी गरम करून त्यातील सर्व रोगकारक जंतू नष्ट करण्याच्या प्रक्रियेला पाश्चरायझेशन असे म्हणतात. या प्रक्रियेत दुधातील घटक, त्याचा रंग, वास, पोषणमूल्य इत्यादींमध्ये कोणताही बदल होत नाही. पाश्चरायझेशनच्या अनेक पद्धती असल्या तरी त्यातील एक पद्धत सामान्यतः वापरली जाते. या पद्धतीत दूध अत्यंत वेगाने खूप कमी वेळात ७२ डिग्री से. पर्यंत गरम करतात. त्या तापमानाला किमान १५ सेकंद ठेवून नंतर अत्यंत वेगाने ४ सेंटिग्रेड इतके थंड करतात. या पद्धतीत खूप मोठ्या प्रमाणातील दुधाचे पाश्चरायझेशन दर तासाला होऊ शकते. त्यामुळे डेअरीमध्ये ही पद्धत वापरतात. पाश्चरायझेशनमुळे आपल्याला सुरक्षित दूध मिळते. पाश्चरायझेशनमुळे ९० % जंतू मरतात. म्हणून घरी आणल्यानंतर जर ते तसेच ठेवले तर खोलीतल्या तापमानामुळे या जीवाणूंची वाढ होऊ शकते. पाश्चराईज्ड केलेले दूध खराब होऊ नये म्हणून आणल्यावर एकतर ते उकळून घ्यावे किंवा फ्रीजमध्ये ठेवावे.

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/


🔬 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔭
""""""""""""""""""""""""""""""""""""""

🌎 *पृथ्वीची निर्मिती (७)* 🌎
_________________________

 गॅलिलिओच्या शोधामुळे, संशोधनामुळे आणि त्याला रोकडा आधार देणाऱ्या, त्याने शोधून काढलेल्या दुर्बिणीमुळे युरोपचे विचारविश्व आवर्तात सापडले. गॅलिलिओ कोपर्निकसच्या मतांना सज्जड पुष्टी देत होता. धर्मग्रंथांचे प्रामाण्य प्रश्नचिन्हांकित करत होता. अॅरिस्टॉटलचे सांगणे प्रयोगाच्या कसोटीवर तपासून पाहत होता. दुर्बिणीचा शोध लावून त्याने जणू उत्पातच घडवला होता. शुक्राला चंद्रासारख्या कला असतात, ही गोष्ट आपल्या सिद्धांताच्या सत्यतेसाठी आवश्यक आहे, हे कोपर्निकसला माहित होते. ते सिद्ध करता न आल्याने युक्तिवाद त्याच्या विरोधी जात होता. गॅलिलियोने दुर्बिणीनेच हे दाखवून दिले. चंद्रावर पर्वत आणि सूर्यावर डाग असल्याचे दाखवले. लोकांना हे धक्कादायक वाटू लागले आणि धर्ममार्तंडांच्या छातीत धडकी भरली. हे मान्य करणे म्हणजे जगन्नियंत्याच्या कार्यात दोष आहे असा अर्थ होऊ लागला. कॅथाॅलिक विद्यापीठातील शिक्षकांना सूर्यावरील डागांचा उल्लेख करण्यास बंदी घालण्यात आली. ही बंदी काही विद्यापीठांत कित्येक शतके चालू होती. 'भूमिती' हे सैतानाचे शास्त्र आहे आणि गणित शास्त्रज्ञ हे सर्व प्रकारच्या पाखंडी मताचे प्रणेते असल्याने त्यांना हद्दपार केले पाहिजे, असे उद्गार काढणार्‍या धर्मोपदेशकाला बढती देण्यात आली होती. शेवटी निर्णय करण्यासाठी ख्रिस्ती धर्माच्या न्यायसभेने खगोलशास्त्र हा विषय चर्चेला घेतला आणि बायबलमधील काही वचनांच्या आधारे अनुमान पद्धतीने दोन महत्त्वाचे निष्कर्ष काढले.
 'सूर्य हा अगदी मध्यावर असून तो पृथ्वीभोवती फिरत नाही' हा शास्त्रज्ञांचा पहिला सिद्धांत मूर्खपणाचा, अविचाराचा, धर्मशास्त्राच्या दृष्टीने खोटा आणि पाखंडी मताचा आहे, कारण तो पवित्र धर्मशास्त्राच्या उघड उघड विरुद्ध आहे. 'पृथ्वी मध्यावर नसून ती सूर्याभोवती फिरते' हा दुसरा सिद्धांत तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने खोटा आणि धर्मश्रद्धेच्या विरुद्ध आहे.
 त्यानंतर पोपने गॅलिलिओला धार्मिक न्यायसभेसमोर हजर राहण्याची आज्ञा केली. न्याय सभेने त्याला त्याने केलेल्या प्रमादाचा त्याग करण्याचा आदेश दिला. इ.स. २६ फेब्रुवारी १६१६ रोजी गॅलिलियोने 'कोपर्निकसची मते स्वीकारणार नाही, त्याचा लेखी व तोंडी प्रचार करणार नाही', असे शपथपूर्वक सांगून सुटका करून घेतली.
त्यानंतर पोपच्या आदेशाने 'पृथ्वी फिरते' असे सांगणारी सर्व पुस्तके 'निषिद्ध' ग्रंथांच्या यादीत टाकण्यात आली.
 तरीही गॅलिलिओ आशावादी होता. १६२३ साली त्याचा मित्र कार्डिनल बेबेरीनी हा 'आठवा अर्बन' ही बिरुदावली धारण करून पोप पदावर आरूढ झाला. त्यामुळे थोडी सुरक्षितता वाढून 'जगातील दोन महान सिद्धांतांवर चर्चा' हे पुस्तक गॅलिलिओने लिहले. तो उत्कृष्ट ग्रंथ युरोपमध्ये मोठय़ा औत्सुक्याने वाचला गेला.
  धर्ममार्तंड पुन्हा खळवळले. गॅलिलिअोवर सक्तीचे मौन लादले गेले. "पृथ्वी फिरत असल्याचे मत हे सर्व प्रकारच्या पाखंडी मतांत अत्यंत तिरस्करणीय, अत्यंत दुष्टप्रवृत्त आणि गर्हणीय आहे. पृथ्वीच्या अचलत्वाची कल्पना तिप्पट पवित्र आहे. एकवेळ आत्म्याच्या अमरत्वाविरुद्ध, परमेश्वराच्या अस्तित्वाविरुद्ध व त्याच्या मानवी अवताराविरुद्ध केलेले युक्तिवाद क्षम्य ठरतील; पण पृथ्वी फिरते हे सिद्ध करणारा युक्तिवाद क्षम्य ठरणार नाही." अशी जोरदार मोहीम गॅलिलिओच्या प्रतिपादनाविरोधात उघडली गेली.

*तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन

🌎 *उत्क्रांती* 🌎
*****************

*प्रास्ताविक (३)*

नवीन शोध लागले, तरी या निर्मितीवादाने युरोपमध्ये चांगलेच मूळ धरले होते. जैवविज्ञानाप्रमाणेच भौतिकीविज्ञानातही बायबलमध्ये सांगितलेल्या कल्पना प्रमाणभूत मानण्याची युरोपमध्ये प्रथा होती. जग पृथ्वीकेंद्रित आहे, असे बायबलमध्ये सांगितले होते; परंतु हा विचार चुकीचा आहे, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे, असे कोपर्निकसने सांगितले. इटलीमध्ये गॅलिलिओने कोपर्निकसचे म्हणणे बरोबर आहे असे ठासून सांगितले. धर्माच्या विरुद्ध भाष्य केल्यामुळे गॅलिलिओला नजरकैदेत राहण्याची शिक्षा भोगावी लागली. इतर ग्रहांवरही सजीवसृष्टी असण्याची शक्यता आहे, असे म्हणणाऱ्या ब्रुनोला जाळण्यात आले. धार्मिक विचारांविरुद्ध मत मांडले, तर ते ऐकून घेण्याची सोशिकता तत्कालीन समाजामध्ये अजिबात नव्हती - हे उदाहरणांवरून स्पष्ट होते. डार्विनचे उत्क्रांतीचे विचारही धार्मिक विचारांच्या विरोधात जाणारे होते. आपण हे विचार प्रकट केले; तर तत्कालीन धर्ममार्तंडांच्या आणि समाजाच्या रागाला सामोरे जावे लागेल, आपले विचार वाचल्यावर समाजाच्या त्यावरील प्रतिक्रिया तीव्र स्वरुपाच्या असतील, धर्माविरुद्ध पवित्रा घेतल्यामुळे कदाचित अमानूष शिक्षाही सोसावी लागेल - अशी डार्विनला भीती वाटत होती. म्हणून तर कितीतरी वर्षे डार्विनने आपले विचार भाषणात गुंडाळून ठेवले होते.

*क्रमशः*

*उत्क्रांती* या पुस्तकातून

- *सुमती जोशी*

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/


✨ *विश्व प्रसरण पावतं याचा अर्थ काय होतो ?* ✨
*********************************

समजा, तुम्ही बेदाणे घातलेला एक केक बनवता आहात. तर त्या केकसाठी लागणाऱ्या पिठाच्या गोळ्यात तुम्ही ते बेदाणे पेरता. त्यावेळी ते बेदाणे एकमेकांपासून काही अंतरावर असतात. आता तो पीठाचा गोळा भट्टीमध्ये किंवा ओव्हनमध्ये टाकून शिजवायला घेतला की त्या गोळ्यात असलेल्या यिस्टच्या किंवा बेकिंग पावडरच्या प्रभावाखाली तो गोळा फुगायला लागतो. केक शिजून तयार होतो तोवर तो चांगलाच फुगलेला असतो. आता त्या बेदाण्यांमधलं अंतर मोजलं तर आधी होतं त्याच्यापेक्षा ते चांगलंच वाढलेलं दिसून येतं. म्हणजेच ते बेदाणे एकमेकांपासून दूर गेलेले असतात; आणि तरीही ते त्या केकपासून दूर जात नाहीत. ते त्या केकमध्येच अडकून पडलेले असतात.

आपल्या विश्वाचीही अशीच परिस्थिती आहे. साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या महाविस्फोटात त्याचा जन्म झाला तेव्हापासून ते असंच त्या फुगणाऱ्या केकसारखं वाढत चाललं आहे. आपली पृथ्वी या दीर्घिकेत (galaxy) वावरते आहे त्या दिर्घिकेपासुन बघितलं तर इतर साऱ्या दीर्घिका आपल्यापासून दूरदूर पळत असलेल्या दिसतात. इतर दिर्घिकांवर जाऊन तिथून निरीक्षण केलं तर तरी अशीच परिस्थिती आढळते. विश्वाच्या अगदी टोकाला असलेल्या दीर्घिका आणखीच दूरवर जाताना दिसतात. आणि जितकी एखादी दीर्घिका दूर तितका तिचा दूर जाण्याचा वेगही जास्त. म्हणजे दीर्घिकेचा दूर जाण्याचा वेग तिच्या आपल्यापासून असलेल्या अंतराच्या प्रमाणात असतो. यालाच आता हबलचा सिद्धांत म्हणतात.

याचं तसंच कारणही आहे. एडविन हबल यानं १९२१ मध्ये आपलं विश्व असं प्रसरण पावत असल्याचं शोधून काढलं. त्याला असं दिसलं की दूरवरच्या दीर्घिकांकडुन येणाऱ्या प्रकाशाची तरंगलांबी वाढते आहे. आपल्या नजरेला दिसू शकणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या पट्टय़ात जांभळ्या प्रकाशाची तरंगलांबी सर्वात कमी आहे, तर तांबड्या प्रकाशाची तरंगलांबी सर्वात जास्त आहे. हबलला असं दिसून आलं की कोणत्याही दीर्घिकेपासून येणाऱ्या प्रकाशाची तरंगलांबी वाढते आहे म्हणजेच तो प्रकाश तांबड्या रंगाच्या दिशेनं झुकतो आहे. याचा अर्थ ती दीर्घिका आपल्यापासून दूर जात आहे. आपण जेव्हा स्टेशनवर उभे असतो तेव्हा आपल्या जवळ येणाऱ्या इंजिनाची शिट्टी वरच्या पट्टीत जाते, कारण त्या शिट्टीपासून निघणाऱ्या लहरी दाबल्या जाऊन त्यांची तरंगलांबी कमी होते. उलट आपल्यापासून दूर जाणाऱ्या इंजिनाची शिट्टी खालच्या पट्टीत जाते, कारण तिच्यापासून निघणाऱ्या ध्वनीलहरींची तरंगलांबी वाढत जाते. यालाच डॉप्लर परिणाम म्हणतात. दीर्घिकांपासून निघणाऱ्या प्रकाशाच्या बाबतीतही अशाच डॉप्लर परिणामापोटी त्याची तरंगलांबी तांबड्या रंगाच्या दिशेनं झुकते. म्हणजेच ती दीर्घिका आपल्यापासून दूर जाते.

*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

*१ एप्रिल २००४*

*गूगलने जीमेल (GMAIL) ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.*

जीमेल एक विनामूल्य, गुगल द्वारे विकसित जाहिरात-समर्थित ईमेल सेवा आहे. वापरकर्ते वेबवर जीमेल आणि तिसरे-पक्षीय प्रोग्राम्स वापरून जे पीओपी किंवा IMAP प्रोटोकॉलद्वारे ईमेल सामग्री समक्रमित करू शकतात. जीमेल १ एप्रिल २००४ रोजी मर्यादित बीटा रिलिझच्या रूपात प्रारंभ झाला आणि ७ जुलै २००९ रोजी त्याचे चाचणी टप्प्यात संपले.

प्रारंभी, जीमेलमध्ये प्रति उपयोगकर्ता एक गिगाबाइटचा प्रारंभिक संचयन क्षमता आहे, त्या वेळी दिले जाणाऱ्या प्रतिसादापेक्षा ती एक उच्च रकमेची रक्कम आज, सेवा १५ गीगाबाइट स्टोरेजसह आहे. उपयोजक ५० मेगाबाइट पर्यंतच्या इमेजेस संलग्नकांमधुन मिळवू शकतात, जेव्हा ते २५ मेगाबाइटपर्यंत ईमेल पाठवू शकतात. मोठ्या फायली पाठविण्यासाठी, वापरकर्ते गुगल ड्राइव्हवरून संदेशात फायली समाविष्ट करु शकतात. जीमेल मध्ये इंटरनेट-मार्केप्रमाणे शोध-निर्देशित इंटरफेस आणि एक "संभाषण दृश्य" आहे. एजेएक्सच्या सुरुवातीस प्रारंभ करण्यासाठी ही वेबसाइट डेव्हलपर्सच्या अंतर्गत प्रसिद्ध आहे.

गुगलचे मेल सर्व्हर स्वयंचलित स्पॅम आणि मॉलवेअर फिल्टरसह, एकाधिक हेतूंकरिता ईमेल स्कॅन करतात आणि ईमेलच्या पुढे संदर्भ-संवेदनशील जाहिराती जोडण्यासाठी अमर्यादित डेटा धारणा, विविध पक्षांच्या निरीक्षणामुळे सहजतेने, जीमेल पत्त्यांवर ईमेल पाठवून धोरण मान्य न झाल्यास आणि गुगलला बदलण्याची संभाव्यता यामुळे प्रायव्हसीच्या वकिलांनी या जाहिरात पद्धतीची टीका केली आहे. अन्य गुगल डेटा वापरणासह माहिती एकत्र करून गोपनीयता अधिक कमी करण्यासाठी त्याची धोरणे कंपनी समस्यांशी संबंधित खटल्यांचा विषय आहे. गुगलने असे सुचवले आहे की ईमेल वापरकर्त्यांनी त्यांचे ईमेल स्वयंचलित प्रक्रियेच्या अधीन असण्याची अनिवार्यपणे अपेक्षा करणे आवश्यक आहे आणि दावा करते की सेवा संभाव्य संवेदनशील संदेशांव्यतिरिक्त जाहिराती प्रदर्शित करण्यापासून परावृत्त करते, जसे की वंश, धर्म, लैंगिक अभिमुखता, आरोग्य किंवा आर्थिक उल्लेख स्टेटमेन्ट जून २०१७ मध्ये, गुगलने जाहिरातींच्या उद्देशासाठी संदर्भीत जीमेल सामग्रीचा वापर करण्याच्या आगामी अखेरीस घोषणा केली, त्याऐवजी त्याच्या इतर सेवांच्या उपयोगावरून गोळा केलेल्या डेटावर अवलंबून रहावे.

जुलै २०१७ मध्ये, जगभरात जीमेल चे १.२ अब्ज सक्रिय वापरकर्ते आहेत, आणि अँड्रॉइड डिव्हाइसेसवर एक अब्ज संस्थांना मारण्यासाठी गुगल प्ले स्टोर वर पहिले अॅप्स होते. २०१४ च्या अंदाजानुसार, ६०% मध्य आकाराच्या अमेरिकन कंपन्या आणि ९०.२% प्रारंभी जीमेल वापरत होते.

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान

Thursday, 19 April 2018

*२९ मार्च १९७४*

*मरिनर १० हे यान बुध ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचले*

२९ मार्च १९७४ व २१ सप्टेंबर १९७४ रोजी मरिनर-१० यानाने बुधाच्या जवळजवळ निम्म्या भागाची छायाचित्रे घेतली;तसेच वेधही घेतले. त्यांवरून बुधाच्या पृष्ठभागाची तपशीलवार माहिती आता उपलब्ध झाली आहे.

बुध चंद्रापेक्षा थोडा मोठा असून उभयतांच्या पृष्ठांवरील स्वरूपांमध्ये खूपच साम्य असल्याचे आढळले आहे; तसेच बुधाचे कवच वरवर पाहता पृथ्वी, मंगळ आणि चंद्र यांच्या कवचाप्रमाणे आहे. मरिनर-१० यानाने अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) प्रारणाच्या साहाय्याने केलेल्या तापमापनाद्वारे कवच हे चांगले उष्णतानिरोधक असल्याचे आढळले. यावरून ते सच्छिद्र मृदेचे अथवा चंद्रावरील आवरणशिलेसारख्या (आधारशैलांना झाकणाऱ्या पदार्थांच्या राशीसारख्या) खडकांच्या चुऱ्याचे (केवळ खडकाचे नव्हे) बनवलेले असावे. बुधाचा ⇨ प्रतिक्षेप ०.०६ आहे म्हणजे त्याच्या पृष्ठावर पडलेल्या सूर्यप्रकाशापैकी ६ टक्के प्रकाशाचे परावर्तन होते, तर चंद्राचा प्रतिक्षेप ७ आहे. यावरून बुधाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे खडबडीत व गडद रंगाच्या खडकांचा बनला असावा, असा अंदाज होता. मरिनर-१० ने केलेल्या निरीक्षणांनी हा अंदाज खरा ठरला असून बुधाचे पृष्ठ सिलिकेटी खडकांचे बनले आहे व त्यावर सिलिकेटी खनिजांची धूळ पसरलेली आहे. बुधाच्या पृष्ठावर ४ अब्ज वर्षांहून जास्त काळ अशनींचे (बाहेरून येऊन पडणाऱ्या खडकांचे) आघात होऊन खाचखळगे निर्माण झाले आहेत. तेथे वातावरण जवळजवळ नसल्याने ही भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये बहुतांशी जशीच्या तशी टिकून राहिली आहेत. लहानमोठी विवरे, मैदाने, उंचवटे, कडे, द्रोण्या इ. येथील प्रमुख पृष्ठीय स्वरूपे आहेत.

*रडारने घेतलेले वेध आणि मरिनर-१० या अवकाशयानाने घेतलेली छायाचित्रे यांच्यावरून बुधाचा अक्षीय भ्रमणकाळ ५८.६५६ दिवस  असल्याचे सिद्ध झाले म्हणजे बुधाच्या सूर्याभोवती दोन प्रदक्षिणा होतात तेव्हा स्वतःभोवती तीन फेऱ्या पूर्ण होतात.*

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान
🇵 🇦 🇷 🇦 🇲
🇨 ⭕ 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷
______________________________
          *🖥परम महासंगणक🖥*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*🖥२८ मार्च १९९८ रोजी  भारतीय कंपनी सी-डॅकने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.*
      🌹🌹🌹🌹
_______________________________
*☢अमेरिकेतील क्लिंटन प्रशासनाने भारताला महासंगणक  देण्यास नकार दिला त्यावेळी माहिती तंत्रज्ञानात आपली पीछेहाट होणार अशी चिन्हे असताना डॉ. विजय भटकर यांच्या प्रयत्नांमुळे ‘परम’ महासंगणक तयार झाला.*
*🖥भारताने हा महासंगणक रशिया, सिंगापूर, जर्मनी व कॅनडा यासारख्या प्रगत देशांना निर्यातही केला, त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची स्वयंपूर्णता सिद्ध झाली.*
 *🖥भटकर यांनी १९९०च्या दशकात सी-डॅक या संस्थेतर्फे ‘परम’ तयार करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले परम ८००० व परम १०००० असे दोन प्रगत महासंगणक त्यांच्या प्रयत्नातून साकार झाले.*
 *🖥आज आपण बहुभाषिक संगणक हवे आहेत असे म्हणतो, पण ‘सी-डॅक’च्या  ‘जिस्ट’ या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दहा लिप्यांमधील १६ प्रमुख भाषा संगणकावर आणून ज्ञानकोषीय तूट भटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भरून काढली होती.*
*🖥सी-डॅकच्या माध्यमातून त्यांनी पाच हजाराहून अधिक सॉफ्टवेअर व्यावसायिक घडवले. आय स्क्वेअर आयटी, एमकेसीएल या संस्थांच्या पायाभरणीतही त्यांनी मोठी भूमिका पार पाडली.*
*🖥भारतातील सर्वोत्तम मानले जाणारे केरळ इन्फोटेक पार्क (त्रिवेंद्रम) उभे करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ‘एज्युकेशन टू होम’ हा कार्यक्रमही त्यांनी प्रभावीपणे राबवला.*

         _🔅परमचे जनक🔅_
*🔅गेल्या पंचवीस वर्षांत ज्यांनी भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाला आकार दिला त्यात डॉ. भटकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.* *विचारवंत, नेतृत्वगुण असलेला वैज्ञानिक, संशोधक, शिक्षणतज्ञ, लेखक, धोरणकर्ते म्हणून ते देशाला परिचित आहेत.*
 *🔅भटकर यांचा जन्म अकोल्यातील मुरांबा या गावी ११ ऑक्टोबर १९४६ रोजी झाला.*
*👑नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली व नंतर बडोद्याच्या एम.एस. विद्यापीठातून त्यांनी अभियांत्रिकीत पदव्युत्तर पदवी घेतली.*
 *दिल्ली आयआयटी या संस्थेचे ते डॉक्टरेट आहेत.*
*🖥संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावर त्यांची अनेक पुस्तके व शोधनिबंध प्रसिद्ध आहेत.*
 *🥇पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, प्रियदर्शिनी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार असे असंख्य पुरस्कार त्यांना लाभले*
_______________________________
               *©व्ही. सुनिलकुमार*
                       _बीड_
                  *@जय विज्ञान📡*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*२८ मार्च १९९२*

*भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे.आर.डी. टाटा यांना भारतरत्‍न हा सर्वोच्च भारतीय सन्मान*

जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे.आर.डी. टाटा हे भारतीय उद्योजक होते. ते पहिले भारतीय वैमानिक असून, भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात.

इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. इ.स. १९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. इ.स. १९३२ साली त्यांनी टाटा एरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे इ.स. १९४६साली तिचे नाव बदलून एर इंडिया ठेवले गेले.

वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे इ.स. १९३८ साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेले आणि तंत्रज्ञान अश्या नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. टाटांच्या पुढाकाराने इ.स. १९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.

टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी इ.स. १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय इ.स. १९४१ साली मुंबईत सुरू केले.

टाटांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाली. भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना इ.स. १९५७ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले, तर इ.स. १९९२ साली त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले.

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

👆🏼या पेजला लाईक करा आणि मिळवा रोजच्या रोज दिनविशेष आणि विज्ञानविषयक माहिती.

whatsapp वर रोजच्या रोज माहिती मिळविण्यासाठी 9049491631 या नंबरवर 'Request' टाइप करुन (whatsapp वर) पाठवा.501443670043532
⭐ *तारे कसे जन्माला येतात ?* ⭐
***********************************

जो जन्माला आला त्याचा मृत्यू अटळ आहे आणि त्याच्या कलेवरातून पुनर्वापराच्या तत्त्वानुसार नवीन चीजेची निर्मितीही अटळ आहे.

हे विश्व जन्माला आलं ते एका शून्यातून. बिंदूमात्र असलेल्या त्या शून्याशिवाय त्या वेळी काहीही अस्तित्वात नव्हतं. त्या शून्याचा महाविस्फोट झाला आणि त्यातून हायड्रोजन व हेलियम या दोन सर्वात हलक्या वायूंचे ढग रोंरावत बाहेर पडले व त्यांच्याबरोबर प्रचंड प्रमाणातली ऊर्जा, उष्णता व विविध प्रारणे यांच्या स्वरूपात बाहेर पडली.

या वायूंच्या रेणूंच्या अंगी ही प्रचंड प्रमाणातली ऊर्जा होती. त्यामुळे ते वेगानं इतस्तत: धावत होते. त्यांचा असा वेडावाकडा धुमाकूळ चाललेला असताना त्यांच्या आपापसात टकरीही होत होत्या. अशी टक्कर झाली की त्यांच्यामधील काही ऊर्जा निघून जात असे व त्यांचा वेग मंदावे. अशा मंदावलेल्या रेणूची परत टक्कर झाली की तो इतका गलितगात्र झालेला असे, की त्या दुसऱ्या रेणूला घट्ट धरूनच तो राही. त्यामुळे हळूहळू हे रेणू एकेकटे न राहता त्यांचे जुडगे व्हायला सुरुवात झाली. शिवाय प्रत्येक रेणूच्या अंगची गुरुत्वाकर्षणाची ओढ इतर रेणूंना आपल्याकडे खेचत होती. त्यातूनही काही जुडगे तयार झाले. हे जुडगे आकारमानानं एकेकट्या रेणुंपेक्षा मोठे होते. त्यांचं वस्तुमानही जास्त होतं. त्यामुळे त्यांच्या गुरुत्वाकर्षणाची ओढही तीव्र होती. ते मग इतर रेणूंना आपल्याकडे अधिक खेचू लागले. अशा तर्‍हेनं या वायूंचे गोळे तयार होत गेले.

त्यांच्या वाढत्या वस्तुमानापोटी त्यांच्यामधली गुरुत्वाकर्षणाची ओढही वाढत गेली. त्या गोळ्यातल्या बाहेरच्या भागातले रेणू मध्यावरील केंद्राकडे जोरानं खेचले जाऊ लागले. परिणामी तो गोळा आतल्या दिशेनं दाबला जाऊ लागला. त्याची घनता वाढत गेली व तो तापातही गेला. अशा प्रकारे तापमान वाढत वाढत अशा एका अवस्थेला पोचलं की त्यातल्या हायड्रोजन अणूंचं मीलन होऊन त्यातून हेलियमच्या अणूंची निर्मिती होऊ लागली. त्या प्रक्रियेत हायड्रोजन अणूंच्या एकत्रित वस्तुमानापेक्षा हेलियमचं वस्तुमान कमी असल्यामुळे त्यातल्या काही वस्तुमानाचं ऊर्जेत रूपांतर होऊन त्यातून प्रकाशाच्या रूपात ऊर्जा बाहेर टाकली जाऊ लागली. १००० टन हायड्रोजनपासून तयार झालेल्या हेलियमचं वजन ९९३ टनच भरलं. म्हणजेच उरलेल्या सात टन वस्तुमानाचं ऊर्जेत रूपांतर झालं. अशा या अणुभट्ट्या धडधडायला लागल्या, त्यातून प्रकाशाचं उत्सर्जन व्हायला लागलं आणि तारा जन्माला आला.

आपल्या सूर्याचा जन्मही अशाच तर्‍हेनं झालेला आहे, मात्र त्याच्या जन्माला उपयोगी पडलेली साधनसामग्री दुसऱ्या एका तार्याच्या मृत्यूनंतर बाहेर पडलेली असल्यामुळे सूर्य हा दुसऱ्या पिढीचा तारा आहे असं म्हटलं जातं.

*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532
*होमी भाभा*

*भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ*

*स्मृतिदिन - जानेवारी २४, इ.स. १९६६*

होमी भाभा (इ.स. १९०९ - इ.स. १९६६) भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते.
जीवन
भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा हे बॅरीस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तीमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम वक्ताही होते.
त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रातच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरींगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रीज विद्यापिठातून इ.स. १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली.
इ.स. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टी ची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.
संयुक्त राष्ट्रच्या सभेला जातांना २४ जानेवारी, इ.स. १९६६ या दिवशी फ्रान्सच्या हद्दीत असतांना त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यु नंतर ट्रॉम्बे येथील अणु संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले.

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-
🍀 *मानव - कोण, केंव्हा, कसा आला ? व तो करतो काय ?* 🍀

 *१) माकडापासून माणूस ?*

 *प्रश्न* - तुम्ही म्हणता की माकडाची उत्पत्ती देवाने केलेली नसून तो कुठल्यातरी बीनशेपटीच्या माकडापासून उत्क्रांत झालेला आहे. परंतु हे कसे पटावे ? कारण आमच्या मते माकडाचे पिल्लू माकडच होईल. ते माणूस कसे होईल ? आणि माकडाचे पिल्लू माणूस झाले याला पुरावा तरी काय ?
समजा उत्क्रांतीने माकडाचा माणूस बनत असेल तर आज ते का घडत नाही ? आपण एखाद्या जंगलाजवळ उभे असताना एखाद्या माकडाचा माणूस बनला व तो जंगलातून बाहेर पडून आपल्या गावात आला असे का होत नाही ?

*उत्तर* - उत्क्रांती समजून घ्यायचीच नाही असा हट्ट केल्यावर वरील सारखे प्रश्न विचारले जातात. शंभर वर्षांचे आयुष्य असलेला मनुष्य हजार, लाख नव्हे तर कोटी वर्षे जंगलाबाहेर उभा कसा राहणार ? ज्या कुणा सस्तन प्राणी वर्गातील पुच्छविहीन मर्कट जातीपासून मानव उत्क्रांत झाला तो चार कोटी वर्षांपासून भूतलावर वावरत असावा. त्याचे वास्तव्य जंगलांमध्ये वृक्षांवर होते. कारण त्याचे अन्न, निवारा व स्वसंरक्षण यासाठी ते सोयीस्कर होते. तेव्हातरी बहुधा दोन अडीच कोटी वर्षांपूर्वी तो मागचे दोन पाय चालण्यासाठी व पुढचे दोन पाय हातासारखे वापरण्याचा प्रयत्न करू लागला असावा.
उत्क्रांतीच्या पुढील पायरीचा प्रत्यक्ष (भूस्तरीय) पुरावा 'रामपिथेकस' नाव दिलेल्या भारत व पूर्व आफ्रिकेत सापडलेल्या जिवाश्मांच्या रुपाने उपलब्ध आहे. हा थोडा उत्क्रांत पुच्छहीन वानर जरा वाकून पण दोन पायांवर चालू शकत होता. हा पुरावा एक कोटी वीस लक्ष वर्षांपूर्वीचा आहे. त्यानंतर म्हणजे सुमारे सत्तर लक्ष वर्षांपूर्वी गोरिला, चिंपांझी व माणूस (म्हणजे माणसासारखा वानर-पूर्वज) ह्या एकमेकांशी साम्य असलेल्या परन्तु वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या. अनुवंशशास्त्राने असे दाखवून दिले आहे की आजच्या ह्या तीन जाती वरीलसारख्या (म्हणजे रामपिथेकससारख्या) एकाच मर्कट जातीपासून निर्माण झाल्या आहेत.
मानव चिंपांझी व गोरिला ह्या तिघांच्या शरीरातील प्रोटिन्स हिमोग्लोबिन्स आणि डी.एन.ए. यात कमालीचे साम्य आहे. त्यात गोरिलांचे पूर्वज अगोदर आणि चिंपांझीचे पूर्वज नंतर वेगळे झाले असावेत असे दिसते. सारांश माणूस देवापासून नव्हे तर पुच्छविहीन माकडांपासून निर्माण झालेला आहे.
माणूस आणि सर्व प्रकारची वानरे हे प्रायमेट वर्गातील प्राणी आहेत. प्रयमेट वर्गातल्या प्राण्यांच्या डोळ्यांची ठेवण व हातांच्या बोटांची रचना ही वैशिष्ट्ये इतर वर्गातील प्राण्यांपेक्षा वेगळी असतात. ह्या वर्गातील वनरांच्याही पूर्वीचे पहिले प्राणी फक्त घुशीएवढ्या लहान आकाराचे होते, त्यांच्यातही हि वैशिष्ट्ये होती, ते झाडांवरच राहत होते आणि त्यांचा काळ सहा सात कोटी वर्षांपूर्वीचा असावा. त्यांची उत्क्रांती होऊन चार कोटी वर्षांपूर्वी 'वानर' दीड कोटी वर्षांपूर्वी 'पुच्छहीन वानर' (रामपिथेकस) सत्तर लाख वर्षांपूर्वी ऑसट्रेलीपिथेकस (चाळीस लाख वर्षांपूर्वी त्याच जातीचा दाक्षिणात्य वानर), पंधरा वीस लाख वर्षांपूर्वी हातमानव (होमो हॅबिलीस) नंतर दहा लाख वर्षांपूर्वी आदिमानव (होमो इरेक्टस) व शेवटी दीड लाख वर्षांपूर्वी आधुनिक मानव जात (शहाणा मानव उर्फ होमो सॅपियन) अशी मानवाची उत्क्रांती झाली आहे.

 - *शरद बेडेकर*


🌺 *फुलं रंगीबेरंगी का असतात ?* 🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖
अनेक झाडांची फुलं तर्‍हेतर्‍हेचे मनोहारी रंग धारण करतात. ते रंग बघायलाही आपल्याला आवडतं. अशा रंगेबिरंगी फुलांनी नटलेली आपली बाग सुंदर दिसते. कित्येक फुलांना अतिशय चांगला सुगंधही असतो. तोही आपला आनंद द्विगुणित करतो. तरीही आपल्या आनंदासाठी फुलांना रंग आणि सुगंध असतो, असं आपल्याला म्हणता येईल का ? कारण जिथं मानववस्ती नाही अशा ठिकाणच्या झाडांनाही रंगेबेरंगी व सुगंधी फुलं असतात. रानावनात वाढणाऱ्या झाडांची शोभाही अशा फुलांनी बहरून येते. याचा अर्थ निसर्गानं दुसऱ्याच कोणत्या तरी कारणांसाठी रंग आणि गंध बहाल केला असणार.

ती कारणं समजून घेण्यासाठी फुलांचं मुख्य निसर्गदत्त काम काय असतं, याचा विचार करायला हवा. प्रत्येक सजीवाच्या अंगी आपलं पुनरुत्पादन करण्याची यंत्रणा असते. पुनरुत्पादनाशिवाय तो सजीव तगून राहू शकत नाही. एवढेच काय पण पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेशिवाय नवनव्या प्रजातींचा उगमही अशक्य झाला असता. त्यामुळे प्रत्येक सजीव पुनरुत्पादनाला अतिशय महत्त्व देतो. वनस्पतींच्या पुनरुत्पादनात फुलं कळीची भूमिका बजावतात.

फुलांच्या अंतर्गत रचनेकडे लक्ष दिल्यास त्यातील दोन अवयव आपलं लक्ष वेधून घेतात. स्टॅमेन किंवा पुबीजांडातून पुंकेसर बाहेर पडतात. ते पिस्टिल किंवा स्त्रीबीजांडातील स्त्रीकेसरांवर पडले की त्यांच्या समागमातून पुढील पिढीची नांदी म्हटली जाते. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचं मिलन होणं त्या वनस्पतीच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक असतं. कित्येक फुलांमध्ये हे मीलन स्वयंपूर्णरित्या होत असलं, तरी बहुतांश वनस्पतींच्या फुलांमध्ये या प्रक्रियेसाठी दुसर्‍या कोणीतरी मध्यस्थाच्या मदतीची आवश्यकता भासते. वारा ही कामगिरी पार पाडत असला तरी तो पूर्णांशाने हे काम करू शकत नाही. त्यासाठी मग पक्षी किंवा मधमाश्यांसारख्या कीटकांची गरज भासते. ते काम करावं म्हणून मग पक्षी आणि मधमाशा यांना उद्युक्त करणं जरुरीचं असतं. त्यांना काहीतरी मधाचं बोट लावल्याशिवाय ते तरी या कामगिरीसाठी का तयार व्हावेत ? मधमाशांना तर अक्षरश: मधाचं बोट लावलं जातं. फुलांमध्ये असलेला मधुरस शोषून घेऊन मधमाशा त्याचं मधात रूपांतर करतात. तरीही आपल्याकडे अशा मधुरसाचे कोण आहेत, हे मधमाश्यांना कळावं कसं ? त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी मग ही फुलं रंगीबेरंगी परिवेष धारण करतात.
त्यातही मध्यस्थ कोण आहे यावर फुलांचा रंग निर्धारित केला जातो. मधमाशांना निळा रंग आवडतो, तर हमिंगबर्डसारख्या पक्ष्यांना लाल, गुलाबी किंवा जांभळ्या रंगांचं आकर्षण असतं. फुलपाखरं पिवळ्या, नारिंगी रंगांकडे ओढली जातात.
काही फुलं दिवसाउजेडी फुलत असली तरी काही सूर्यास्तानंतरच फुलतात. त्या वेळी मग त्यांचा रंग पक्षांना वा कीटकांना दिसावा कसा ? त्यासाठी मग रंगांशिवाय या फुलांना सुगंधही दिला जातो. त्याच्या दरवळापायी मग हे फलनाला मदत करणारे मध्यस्थ त्याच्याकडे खेचून आणले जातात. त्यांना मधुरस मिळता मिळता त्यांच्याकडून पुंकेसराचा शिडकावा स्त्रीकेसरांवर होतो. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेला चालना मिळते.

*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*


🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔭
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*२१ व्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोन*(२)
_________________________________


वैज्ञानिक दृष्टिकोनाने ही परिस्थिती बदलता यावयास हवी. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजजीवनाचे मार्ग देखील ठरवतो हे समजून घेणे अगत्याचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व असे की तो आकलनाची परिपक्वता निर्माण करतो. या समाजातील अनेक प्रश्न आकलनाच्या परिपक्वतेअभावी निर्माण झाले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या साहाय्याने सामान्य माणसाच्या जीवनात जर आकलनाची परिपक्वता वाढवता आली तर स्वतःच्या जीवनाशी संबंधित निर्णय लोकशाहीत अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतील. २०२० साली भारत महासत्ता होणार, असे सांगितले जाते. मात्र बहुतेकांना या महासत्तेचे रूप असे वाटते, की भारताचा अवकाशयात्री चंद्रावर पोहोचलेला असेल, शास्त्रीयदृष्ट्या विकसित मनुष्यबळ तंत्रज्ञानात भारत जगात पहिल्या दोन चार राष्ट्रात असेल. तो सर्वांगाने शस्त्रसज्ज असेल. आता दुसरीकडे असा प्रश्न उपस्थित करावयास हवा की विकास निर्देशांकात जगात भारताचा नंबर १२७ वा आहे. हा निर्देशांक साक्षरता, गरोदरपणातील मृत्यू, नवजात अर्भकांचे मृत्यू, पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक सोय इत्यादींच्या आधारे काढला जातो. या दोन्ही बाबींची तुलना आकलनाच्या परिपक्वतेने केली; तर स्वाभाविकच असा प्रश्न उपस्थित होतो की चंद्रावर पाऊल ठेवण्याएवढे प्रगत तंत्रज्ञान भारताकडे आहे, मग देशातील आया बहिणी गरोदरपणात मरू नयेत आणि त्यांना नळाने घरी पाणी मिळावे ही अत्यंत साधी बाब या देशात अजूनही इतकी अवघड का ? प्रश्नाचे हे आकलन, प्राधान्यक्रम, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने जर सामान्यांच्या मनात तयार झाले, तर देशापुढे विकासाचे प्राधान्यक्रम बदलतात. अनेक सामाजिक प्रश्नांचे असे भान विसाव्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोन जनसामान्यांच्यात निर्माण करू शकेल, नव्हे त्याने ते करावे अशी अपेक्षा आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचे सर्वाधिक महत्त्वाचे कार्य म्हणजे तो माणसाची जाणीव मुक्त करण्यास मदत करतो आणि ती सदैव मुक्तच राहावी यासाठी आधार पुरवतो. माणूस असणे याचा अर्थच जाणीव असणे आणि खरे तर मुक्त जाणीव असणे. ही जाणीव एका बाजूला सामाजिक व्यवस्था ठरवीत असते, परंतु या भौतिक परिस्थितीच्या दबावाखालीही व्यक्ती स्वतःची जाणीव मुक्त करू शकते. हे फक्त माणसाचेच वैशिष्टय़ आहे. म्हणूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी *गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या; म्हणजे तो बंड करून उठेल.* असे सांगितले आणि राजकीय क्रांतीआधी व वैचारिक क्रांतीची आवश्यकता प्रतिपादन केली. राजकीय दडपशाही, आर्थिक पिळवणूक, अनेकविध कारणांनी निर्माण झालेली मानसिक गुलामगिरी या सर्वांतून मुक्त होण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाबरोबरच एक मुक्त जाणीव लागते, जी कोणत्याही दबावाखाली येत नाही. ती जाणीव निर्माण करण्यात वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाची कामगिरी बजावतो. म्हणजेच माणसाला सर्वात मौल्यवान असलेल्या जाणिवेच्या स्वातंत्र्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा गाभा आहे.

या स्वतंत्र जाणिवांचाच एक भाग म्हणजे मन वासनाविकारांपासून मुक्त होणे आणि दया, क्षमा, शांती, करुणा या जाणिवांच्या परिपोषाने अधिक समृद्ध होणे. वैज्ञानिक दृष्टीकोणाचा शोध लागण्या आधीच्या शेकडो हजारो वर्षांपासून माणसाचा हा शोध चालू आहे. ज्यांना आपण सत्पुरुष, संत अथवा महामानव म्हणतो. त्यांनी आपापल्या परीने हा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रदीर्घ वाटचालीत धर्मांनी अथवा पंथांनी त्या मार्गाला आत्मसात करून त्यावर आपली मोहर उठवली. असे अनेक मार्ग आज सांगितले जातात मात्र त्यांची परिणामकारकता ही बऱ्याच प्रमाणात प्रश्नचिन्हांकित आहे. तसेच हा मार्ग चोखाळणारे बहुतेक जण व्यवस्था परिवर्तनाबाबत ब्र उच्चारत नाहीत. काही हजार वर्षे चालू असलेला हा शोध वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने आधुनिक मानसशास्त्रज्ञ व मनोविज्ञानशास्त्र एकविसाव्या शतकात घेतील अशी अपेक्षा आहे. एकविसाव्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाटचाल ही या अर्थाने मानवमुक्तीची वाटचाल ठरू शकेल.

*क्रमशः*

*तिमिरातूनी तेजाकडे या पुस्तकातून*
*जेम्स वॅट*

*वाफेवर चालणाऱ्या आगगाडीचा जनक*

*जन्मदिन - १९ जानेवारी १७३६*

वाफेवर चालणाऱ्या आगगाडीचा जनक म्हणून जेम्स वॅट यांना ओळखले जाते. जेम्स वॅट लहानपणी अतिशय आळशी होता, असे त्याच्या न बोलण्यामुळे तरी वाटत होते. तो स्वयंपाकघरात त्याच्या आत्याबरोबर बसलेला असताना, विस्तवावर एका किटलीमध्ये पाणी उकळत होते. त्या पाण्याची वाफ किटलीच्या तोंडातून बाहेर पडत होती.जेम्स त्या वाफेवर एकदा कप व एकदा चमचा धरत होता व तो कप व चमचा वाफेच्या जोराने कसा खालीवर होतो, याचे निरीक्षण करत होता. त्याच्या आळशीपणाबद्दल त्याची आत्या नेहमीच कानउघाडणी करत असे. एकदा योगायोगाने जेम्सच्या कॉलेजच्या प्रयोगशाळेतील न्यूमनचे मॉडेल इंजिन जेम्सकडे दुरुस्तीला आले. इंजिन दुरुस्त करताना जेम्सच्या लक्षात आले, की हे इंजिन फक्त थोडाच वेळ काम देण्याच्या योग्यतेचे आहे. विचार केल्यावर त्याच्या लक्षात आले, की न्यूमनचा बॉयलर फार लहान आहे. त्यामुळे वाफ निर्माण होत नाही. न्यूमनच्या इंजिनमधील खाली-वर होणारा दांडा जेव्हा खाली ओढला जाई, तेव्हा त्या सिलिंडरमधील पंपरॉड (दांडा) वर उचलला जाई. जेम्सने एका सिलिंडरमधील वाफ पंपाने दुसऱ्या सिलिंडरमध्ये नेऊन त्या सिलिंडरवर गार पाण्याचा मारा केला व त्या वाफेचे बाष्पीभवन करून, पोकळी निर्माण करायची असे ठरवले. त्यामुळे खर्च व वेळ वाचला. दोन सिलिंडरमध्ये त्याने एअरपंप बसवला. पुढे जेम्सने इंजिनमध्ये पुष्कळ सुधारणा केल्या.

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

📙 *सूर्यास्ताचा रंग लाल शेंदरी का असतो ?* 📙

चौपाटीच्या वाळूत मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून प्रेमाच्या आणाभाका घेण्याचा आपल्या कथा कादंबरीतील नायक नायिकांचा प्रघात आहे. अशा वेळी त्यासंध्यासमयीचा लालिमा आपल्या प्रेयसीच्या गालावर पसरलेला नायकानं पाहिला, असंही ललितलेखक आपल्याला सांगत असतात. यातल्या संध्यासमयीच्या लालिम्याचं त्यांचं वर्णन शंभर टक्के सत्य असतं, यात शंका नाही. आपणही मावळत्या सूर्याकडे पाहत असताना आकाश लाल, शेंदरी, पिवळ्या रंगाने उजळून गेलेलं पाहतो. सूर्योदयाच्या वेळीही असेच रंग दिसत असतात.

हे असंच का समजून घ्यायचं तर, इतर वेळी आकाश निळं दिसतं, याचा विचार करायला हवा. त्याचं उत्तर नोबेल पुरस्कारविजेते सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी देऊन ठेवलेलं आहे. त्यांच्या भाषेत सांगायचं तर याला 'रॅले स्कॅटरिंग' हा नैसर्गिक आविष्कार कारणीभूत आहे.

आपल्या धरतीच्या वातावरणात अनेक वायू आहेत. त्या वायूंचे रेणू प्रकाशकिरणांना विखुरत असतात. कारण जेव्हा प्रकाशकिरण हा या रेणूंवर पडतात तेव्हा त्यांच्यातील काही ऊर्जा या रेणुंकडुन शोषली जाते. त्यामुळे ते रेनो उत्तेजित होतात; पण काही काळ गेला की ते रेणू ती वाढीव ऊर्जा बाहेर फेकून परत मूळपदावर येतात. तसं करताना ते परत प्रकाशकिरणच बाहेर टाकत असतात. मात्र या किरणांची ऊर्जा मूळ ऊर्जेपेक्षा कमी असते. कारण मूळ ऊर्जेतल्या काहीचं उष्णतेत रूपांतर झालेलं असतं. हे होताना अर्थात ते प्रकाशकिरण मूळ दिशेपेक्षा वेगळ्याच दिशेला फेकले जातात. ते विखुरले जातात.

सूर्यप्रकाशात सात निरनिराळ्या रंगांचा प्रकाश असतो. त्यातल्या जांभळ्या किंवा निळ्या रंगाच्या प्रकाशात जास्त उष्णता असते. साहजिकच जास्त ऊर्जा असलेले किरण जास्त प्रमाणात विखुरले जातात. त्यामुळे आकाश निळं दिसतं. पण इतर रंगांचे किरणही विखुरले जात असतात, फक्त त्यांचं प्रमाण कमी असतं. ज्यावेळी सूर्य आपल्या डोक्यावर असतो तेव्हा त्याला वातावरणातून धरतीपर्यंतचा प्रवास करताना कमी अंतर पार करावं लागतं. त्यामुळे निळ्या रंगाचे किरणच जास्त विखुरलेले दिसतात; पण सूर्यास्ताच्या किंवा सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणांना वातावरणातून अधिक अंतर पार करावं लागतं. साहजिकच ते अंतर पार करेपर्यंत निळ्या किंवा हिरव्या रंगाचे किरण विखरून गेलेले असतात. लाल किंवा शेंदरी रंगाच्या किरणांचं विखुरणंच जास्त दिसतं. आकाश त्याच रंगांनी न्हाऊन निघतं.

*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*


🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔭
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*२१ व्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोन* (१)
_________________________________

१९ वे, २० वे शतक यांमध्ये भौतिक ज्ञानाच्या क्षेत्रात वैज्ञानिक  दृष्टिकोनाच्या सहाय्याने अभूतपूर्व विकास झाला. २१ व्या शतकात सामाजिक विज्ञान व मनोविज्ञान या क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभावी कामगिरी बजावेल अशी अपेक्षा आहे. १९५३ साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाचे विज्ञानविषयक धोरण लोकसभेत मांडले. त्यावेळेला वैज्ञानिक दृष्टिकोनाचे अनन्य साधारण महत्त्व सांगत असताना त्यांचे उद्गार आहेत -
*"scientific temperament is a process of thinking, method of action, search of truth, way of life, spirit of a free man."*

*वैज्ञानिक दृष्टिकोन ही विचार व कृती करण्याची पद्धत आहे, सत्यशोधनाचा मार्ग आहे. जीवनाचे दिशादर्शन वैज्ञानिक दृष्टिकोनानेच होते आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने व्यक्तीला जाणिवांचे स्वातंत्र्य प्राप्त होते.*

यापैकी वैज्ञानिक दृष्टिकोन हा विचार व कृती करण्याचा मार्ग आहे याबाबत सविस्तर विवेचन आधी केलेच आहे. परंतु सत्य शोधणे व जीवनाचा मार्ग ठरवणे यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन परिणामकारक कसा ठरतो हे समजून घ्यावयास हवे. आजच्या गतिमान समाजात 'वेळ' या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. हे महत्त्व पैशापेक्षाही अधिक आहे असे मानले जाते, ते बरोबरच आहे. अशा समाजात आजही मृत व्यक्तीच्या निधनानंतर १० व्या दिवशी पिंडदानाचा कार्यक्रम होतो. शेकडो लोक त्यासाठी स्वतःच्या घरून स्मशानात येणे व जाणे यासाठी असंख्य तास वाया घालवतात. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे स्मशानात पिंडाला कावळा कधी शिवेल यांची वाट पाहत तासनतास समुदाय खोळंबून राहतो.
*आता पिंडाला कावळा शिवणे या रूढीचा तपास घेतला तर कोणते सत्य आढळते ?*
ते सत्य असे असे मानण्यात येते की, मृत व्यक्तीचा आत्मा १० व्या दिवशी पिंडदानाच्या वेळी स्मशानात पिंडाच्या बाजूला येतो. कावळ्याला हा आत्मा दिसतो. एवढेच नव्हे तर त्या आत्म्यामार्फत मृत व्यक्तीचा त्याला चेहरा दिसतो. त्यावरून आत्मा सुखी आहे का दु:खी आहे हे का कावळ्याला कळते. आत्मा सुखी असल्यास कावळा पटकन पिंडाला शिवतो. मात्र आत्मा दुःखी दिसल्यास कावळा पिंडाला स्पर्श करणे टाळतो. त्याद्वारे मृताच्या नातेवाईकांना असा संकेत प्राप्त होतो की, मृत व्यक्तीचा आत्मा काळजात आहे; दुःखी आहे. नातेवाईक आपल्या समजुतीनुसार त्या दुःखाचे कारण शोधून काढतात. मग त्या कारणाचे निराकरण करणारे संकल्प उच्चारतात. उदा. लग्नाला आलेल्या मुलीचे लग्न करून देऊ, बेकार मुलाला नोकरी लावून देऊ. ही मानवी भाषा आत्म्याला समजते. त्याचा चेहरा आनंदी होतो. तो आनंदी चेहरा कावळ्याला दिसतो. मग कावळा पिंडाला शिवतो. मगच स्मशानात आलेले मृताचे नातेवाईक समाधानाने परत फिरतात. आता या सर्व कथनात सत्यशोधनाचा मागमूसही नाही. पिंडाला कावळा शिवणे यांचा साधा संबंध स्मशानातील कावळ्याचे पोट भरलेले आहे की नाही याच्याशी आहे, याची जाणीवही नाही. सत्य मानली गेलेली बाब ही बहुधा धार्मिकदृष्ट्या सत्यच आहे असे मानलेले असते. स्वाभाविकच त्याबाबतच्या व्यक्तीच्या, समूहाच्या भावना संवेदनशील व तीव्र असतात. म्हणूनच त्या सत्याबाबतचे वास्तव तपासणे टाळले जाते.

*क्रमश:*

*तिमिरातुनि तेजाकडे* या पुस्तकातुन


📙 *माणूस कोणकोणते अवयव दुसऱ्याला दान करू शकतो ?* 📙
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
दानाचे महात्म्य फारच मोठे आहे. अन्नदान, वस्त्रदान, तसेच आर्थिक मदत इत्यादींना आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. दानशूर कर्णाच्या गोष्टी तुम्ही वाचल्या असतीलच; परंतु या सर्व दानापेक्षाही मौल्यवान असे दान सामान्यातला सामान्य माणूस देऊ शकतो. आश्चर्य वाटले ना ? पण हे अगदी खरे आहे.
हृदय, नेत्र, यकृत, मूत्रपिंड, अस्थिमज्जा, त्वचा इत्यादी अवयवांचे माणूस दुसऱ्याला दान करू शकतो. मेंदूचे कार्य थांबल्यास व्यक्तीला मृत समजावे, असा कायदा भारतीय संसदेने मंजूर केल्यामुळे इंद्रियदान करणे वा इंद्रियारोपण करणे शक्य झाले आहे.
डोळ्यात फुल पडल्याने वा जखम झाल्याने नेत्रपटल निकामी झालेल्या लोकांना मृत व्यक्तीचे नेत्रपटल बसवतात. त्यामुळे त्यांना दृष्टी प्राप्त होते. यालाच नेत्रदान असे म्हणतात. मूत्रपिंड खराब झालेल्या व्यक्तीचे जवळचे रक्ताचे नातेवाईक त्याला स्वतःचे मूत्रपिंड दान करू शकतात. सामान्यपणे सर्व व्यक्तींना दोन मूत्रपिंडे असल्याने त्यापैकी एक दान केले तरी एका मुत्रपिंडाच्या द्वारे आयुष्यभर कार्य केले जाते. साहजिकच एका रुग्णाचे प्राण वाचतात.
अपघातांमध्ये मेंदूला जबर दुखापत झाल्याने मेंदू निकामी झालेल्या रुग्णांचे हृदय नेत्र, यकृत, मूत्रपिंड असे अवयव काढून घेऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचवता येतात.
मरणोत्तर काही व्यक्ती देहदानही करू शकतात. यासाठी मरणोत्तर पोस्टमार्टेम झालेले नसावे. तसेच शरीरातील अवयव शस्त्रक्रियेने काढलेले नसावे. वैयक्तिक विद्यार्थ्यांना शरीररचना शास्त्राच्या अभ्यासासाठी त्याची मदत होते. अस्थिमज्जा नष्ट झालेल्या व्यक्तींना अस्थिमज्जा दुसर्‍या निरोगी व्यक्तीने दान करावी लागते.
अशा प्रकारे माणूस अनेक अवयवांचे दान करू शकतो. काही जिवंतपणी तर काही मरणोत्तर. "मरावे परि कीर्तीरुपी उरावे" या उक्तीची प्रचिती या दानामुळे येऊ शकते.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०


💊 *अँटीबायोटिक्स म्हणजे काय ?* 💊

अँटिबायोटिक्स अर्थात प्रतिजैविकांचे आजकालच्या औषध उपचारात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कोणताही डॉक्टर प्रतिजैविकांचा उपयोग केल्याखेरीज वैद्यक व्यवसाय करू शकणार नाही. अशी आजची परिस्थिती आहे.

*अलेक्झांडर फ्लेमिंगने* अपघाताने पेनिसिलीनचा शोध लावला व तेव्हापासून आजतागायत अनेक प्रतिजैविके विकसित करण्यात आली आहेत. बुरशीपासून ही प्रतिजैविके मिळतात. काही प्रतिजैविकांचे कृत्रिमरित्या तयार होणारे पर्यायही उपलब्ध झाले आहेत. प्रतिजैविके विविध मार्गांनी जंतूंचा नायनाट करतात. काही वेळा ती जीवाणूंचे पोषण त्याला मिळू देत नाहीत, कधी त्याच्या पेशीतील केंद्रकावर हल्ला चढवतात, तर कधी त्याला हानिकारक ठरणारे पदार्थ निर्माण करतात.

जिवाणूही हुशार असतात. प्रतिजैविक योग्य प्रमाणात दिले नाही वा कमी दिवस दिले तर जीवाणूंमध्ये त्या प्रतिजैविकांविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होते. ही प्रतिकारशक्ती त्यांच्या पुढील पिढय़ांनाही आपोआप मिळू शकते. त्यामुळे त्या प्रतिजैविकांचा उपयोग त्या जीवाणूला मारण्यासाठी करता येत नाही. असे होऊ नये यासाठी प्रतिजैविके पुरेशा डोसमध्ये निदान ५ दिवस तरी द्यायला हवे. पेनिसिलिन, अॅंपीसिलीन, स्ट्रेप्टोमायसिन, निअोमायसीन, सेफॅलोस्पोरीन अशी प्रतिजैविके आजकाल औषध उपचारात वापरली जातात. रोगी अत्यवस्थ असेल तर वा पचनसंस्थेतून प्रतिजैविकांचे शोषण होत नसेल तर ही प्रतिजैविके शिरेतून वा स्नायूमध्येही देता येतात. अशावेळी वावडे वा अॅलर्जीची विशेष काळजी घ्यावी लागते.

प्रतिजैविके म्हणजे रुग्णांसाठी जणू वरदानच होय. क्षयरोग, कुष्ठरोग यांसारख्या असाध्य समजल्या जाणाऱ्या रोगांपासून कॉलरा, विषमज्वर, घटसर्प, डांग्या खोकला, अशा सर्वच रोगांवर प्रतिजैविकांमुळे हुकुमी उपचार करता येतात.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०
🔬 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔭
""""""""""""""""""""""""""""""""""""""
🌎 *पृथ्वीची निर्मिती (७)* 🌎
_________________________

*गॅलिलिओच्या शोधामुळे, संशोधनामुळे आणि त्याला रोकडा आधार देणाऱ्या, त्याने शोधून काढलेल्या दुर्बिणीमुळे युरोपचे विचारविश्व आवर्तात सापडले. गॅलिलिओ कोपर्निकसच्या मतांना सज्जड पुष्टी देत होता. धर्मग्रंथांचे प्रामाण्य प्रश्नचिन्हांकित करत होता. अॅरिस्टॉटलचे सांगणे प्रयोगाच्या कसोटीवर तपासून पाहत होता. दुर्बिणीचा शोध लावून त्याने जणू उत्पातच घडवला होता. शुक्राला चंद्रासारख्या कला असतात, ही गोष्ट आपल्या सिद्धांताच्या सत्यतेसाठी आवश्यक आहे, हे कोपर्निकसला माहित होते. ते सिद्ध करता न आल्याने युक्तिवाद त्याच्या विरोधी जात होता. गॅलिलियोने दुर्बिणीनेच हे दाखवून दिले. चंद्रावर पर्वत आणि सूर्यावर डाग असल्याचे दाखवले. लोकांना हे धक्कादायक वाटू लागले आणि धर्ममार्तंडांच्या छातीत धडकी भरली. हे मान्य करणे म्हणजे जगन्नियंत्याच्या कार्यात दोष आहे असा अर्थ होऊ लागला. कॅथाॅलिक विद्यापीठातील शिक्षकांना सूर्यावरील डागांचा उल्लेख करण्यास बंदी घालण्यात आली. ही बंदी काही विद्यापीठांत कित्येक शतके चालू होती. 'भूमिती' हे सैतानाचे शास्त्र आहे आणि गणित शास्त्रज्ञ हे सर्व प्रकारच्या पाखंडी मताचे प्रणेते असल्याने त्यांना हद्दपार केले पाहिजे, असे उद्गार काढणार्‍या धर्मोपदेशकाला बढती देण्यात आली होती. शेवटी निर्णय करण्यासाठी ख्रिस्ती धर्माच्या न्यायसभेने खगोलशास्त्र हा विषय चर्चेला घेतला आणि बायबलमधील काही वचनांच्या आधारे अनुमान पद्धतीने दोन महत्त्वाचे निष्कर्ष काढले.*

*'सूर्य हा अगदी मध्यावर असून तो पृथ्वीभोवती फिरत नाही' हा शास्त्रज्ञांचा पहिला सिद्धांत मूर्खपणाचा, अविचाराचा, धर्मशास्त्राच्या दृष्टीने खोटा आणि पाखंडी मताचा आहे, कारण तो पवित्र धर्मशास्त्राच्या उघड उघड विरुद्ध आहे. 'पृथ्वी मध्यावर नसून ती सूर्याभोवती फिरते' हा दुसरा सिद्धांत तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने खोटा आणि धर्मश्रद्धेच्या विरुद्ध आहे.*

*त्यानंतर पोपने गॅलिलिओला धार्मिक न्यायसभेसमोर हजर राहण्याची आज्ञा केली. न्याय सभेने त्याला त्याने केलेल्या प्रमादाचा त्याग करण्याचा आदेश दिला. इ.स. २६ फेब्रुवारी १६१६ रोजी गॅलिलियोने 'कोपर्निकसची मते स्वीकारणार नाही, त्याचा लेखी व तोंडी प्रचार करणार नाही', असे शपथपूर्वक सांगून सुटका करून घेतली.*

*त्यानंतर पोपच्या आदेशाने 'पृथ्वी फिरते' असे सांगणारी सर्व पुस्तके 'निषिद्ध' ग्रंथांच्या यादीत टाकण्यात आली.*

*तरीही गॅलिलिओ आशावादी होता. १६२३ साली त्याचा मित्र कार्डिनल बेबेरीनी हा 'आठवा अर्बन' ही बिरुदावली धारण करून पोप पदावर आरूढ झाला. त्यामुळे थोडी सुरक्षितता वाढून 'जगातील दोन महान सिद्धांतांवर चर्चा' हे पुस्तक गॅलिलिओने लिहले. तो उत्कृष्ट ग्रंथ युरोपमध्ये मोठय़ा औत्सुक्याने वाचला गेला.*

*धर्ममार्तंड पुन्हा खळवळले. गॅलिलिअोवर सक्तीचे मौन लादले गेले. "पृथ्वी फिरत असल्याचे मत हे सर्व प्रकारच्या पाखंडी मतांत अत्यंत तिरस्करणीय, अत्यंत दुष्टप्रवृत्त आणि गर्हणीय आहे. पृथ्वीच्या अचलत्वाची कल्पना तिप्पट पवित्र आहे. एकवेळ आत्म्याच्या अमरत्वाविरुद्ध, परमेश्वराच्या अस्तित्वाविरुद्ध व त्याच्या मानवी अवताराविरुद्ध केलेले युक्तिवाद क्षम्य ठरतील; पण पृथ्वी फिरते हे सिद्ध करणारा युक्तिवाद क्षम्य ठरणार नाही." अशी जोरदार मोहीम गॅलिलिओच्या प्रतिपादनाविरोधात उघडली गेली.*

*क्रमश:*

*तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन


📙 *शिंका का येतात ?* 📙

हिवाळ्यात किंवा गार वाऱ्यात फिरून आल्यावर तुम्हाला फटाफट शिंका आल्या असतील. काहीतरी बोलायला तोंड उघडावे आणि तेवढ्यात शिंका येऊन बोलता येऊ नये, असेही कधी झाले असेल. सर्दी पडसे झाल्यावर शिंका येतात. विशेषत: वावड्यामुळे सर्दी आली असेल, तर शिंका जास्तच येतात. धुळीत गेल्यास, विशिष्ट फूल हुंगल्यास, किंवा अत्तराचा, उदबत्तीचा वास आल्यास वावडे असलेल्या लोकांना शिंका येतात आणि सर्दी होते. काय म्हणता तुम्हाला शिंका येत नाहीत ? मग एक काम करा. आजोबांच्या कोटाच्या खिशातली तपकिरीची डबी घ्या आणि एक चिमूटभर नाकात सोडा! काय आता आल्या का शिंका ? शिंका येणे शुभ की अशुभ ? काहीजण म्हणतात एक शिंक येणे वाईट, पण दोन शिंका येणे चांगले. अर्थात या सर्व अंधश्रद्धा बरं का ! पण शिंका का येतात, ते पाहू.
खोकला आणि शिंका यात बरेच साधर्म्य आहे. आपल्या श्वसन नलिकेत काही त्रासदायक पदार्थ आला तर खोकला येतो. आपण खोकतो म्हणजे काय करतो ? सर्वात आधी आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर एपिग्लाॅटीस नावाचा पडदा श्वासनलिकेवर दाबला जातो. त्यानंतर आपण जोराने श्वास सोडतो. सहाजिकच खोकताना हवा दाबाखाली बाहेर पडते व श्वास नलिकेतील घाण, जिवाणू बेडक्याच्या रूपाने बाहेर टाकले जातात. आता शिंकेविषयी नाकातील हवा जाण्याच्या मार्गात जर काही अपायकारक, त्रासदायक असे पदार्थ आले तर शरीर खोकल्याप्रमाणेच प्रतिसाद देते. नाकातील ही संवेदना मेंदूपासून निघणाऱ्या पाचव्या नसेमार्फत मेंदुच्या मेड्युला या भागात जाते. येथील पेशींमध्ये संवेदनेचे विश्लेषण होऊन शिंक येण्याची प्रक्रिया होण्याचा आदेश दिला जातो. यात सुरुवातीचे दीर्घ श्वास, नंतर एपिग्लाॅटीसचे श्वासनलिकेवर येणे व नंतर जोरात उच्छवास हे खोकल्याप्रमाणेच असते, मात्र जोरात श्वास सोडताना पडजीभ खाली पडते व त्यामुळे हवा तोंडातून बाहेर न पडता नाकातून बाहेर पडते. नाकातील अपायकारक पदार्थ यामुळे बाहेर पडतो.
वावड्यामुळे वा जंतूसंसर्गामुळे नाकातील आवरण हुळहुळे होते व त्यामुळे वारंवार शिंका येतात. एव्हीलसारखी गोळी देऊन वावड्यामुळे येणाऱ्या शिंका कमी करता येतात. तसेच ज्या पदार्थांमध्ये आपल्याला वावडे आहे त्यापासून दूर राहून स्वतःचे संरक्षण करणे जास्त योग्य होय.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०


*श्रीनिवास रामानुजन*

*भारतीय गणितज्ञ*

*जन्मदिन - डिसेंबर २२, १८८७*

श्रीनिवास रामानुजन (डिसेंबर २२, १८८७:तंजावर - एप्रिल २६, १९२०) भारतीय गणितज्ञ होते.
रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.
या महान गणितज्ञाचा जन्म डिसेंबर २२, १८८७ रोजी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यवृत्तीही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.
रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजमनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.
१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरूणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – एप्रिल 27, १९२० रोजी – हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणिती विश्वाचीच अपरिमित हानी झाली.

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/


📙 *आपण झोपतो म्हणजे काय ?* 📙

झोप झाल्यावर माणूस ताजातवाना होतो. रोज आपण दिवसभराच्या परिश्रमानंतर झोपी जातो व सकाळी उठून परत कामाला लागतो.
झोप न मिळाल्यास काय होते हे तुम्ही आहे अनुभवले असेल. आपण चिडचिडे होतो, कामात लक्ष लागत नाही, डुलक्या येतात, कधी कधी चक्कर येते यावरून झोप घेणे ही अपरिहार्य गोष्ट आहे हे आपल्या लक्षात येईल. लहान मुले १६ ते १८ तास झोपतात या काळात अपचयाचा दर कमी असतो व मुलांची वाढ होते. हळूहळू झोप कमी होते. तरुण व्यक्तींना सात ते आठ तास झोप आवश्यक असते. वृद्धावस्थेत मात्र पाच ते सहा तास झोपही पुरते. सहसा दुपारी झोपू नये.
नुसते पडून राहणे म्हणजे झोप नव्हे हे तुम्हाला माहित आहे. झोपेचे इलेक्ट्रो एनकेफॅलोग्रॅम वा मेंदूच्या कार्याच्या आलेखाद्वारे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की या काळात मेंदूच्या येणाऱ्या लहरी कमी होतात; पण त्यांची उंची वाढते. नंतरच्या अवस्थेत डोळ्यांच्या जलद हालचाली होतात व मेंदूतून येणाऱ्या लहरींची संख्या वाढते. या लहरींची उंची कमी असते. झोपेच्या एका चक्रात डोळ्यांची जलद हालचाल न होणारी झोप व डोळ्यांची जलद हालचाल होणारी झोप अशा दोन अवस्था असतात. एकदा प्रौढ माणूस झोपल्यावर अशी चार ते पाच चक्र त्यात असतात. या प्रत्येक चक्राचा कालावधी दीड तासांचा असतो. झोप ही लंबमज्जेतील चेतातंतूंवर अवलंबून असते. त्यामुळे या भागाला इजा झाल्यास वा त्यावर परिणाम झाल्यास खूप झोप येते वा येतच नाही. हे जरी खरे असले तरी सामान्यतः जास्त झोप हा सवयीचा परिणाम असतो. त्यामुळे योग्य सवय लागल्यास झोप कमी होते.
झोप ही जीवनासाठी आवश्यक असते कारण या काळात शरीराला विश्रांती मिळते. श्वसन व रक्ताभिसरणाचे कार्य मंदावते.  अशी ही झोप जास्त झाली तर मात्र झोपाळूपणाचा आरोप येतो आणि खूप कमी झाली तरी चिंता वाटते.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०


*आर्मस्ट्राँग, एडविन हॉवर्ड*

*एफ एम (FM) रेडिओचा शोध*

*जन्मदिन - ‍१८ डिसेंबर १८९०*

 अमेरिकन विद्युत् अभियंता आणि उच्च कंप्रतेच्या (दर सेंकदास होणाऱ्या कंपन संख्येच्या) रेडिओ तरंगांच्या विरूपण [एखाद्या तरंगाच्या काही विशिष्ट लक्षणामध्ये दुसऱ्या तरंगाच्या काही विशिष्ट लक्षणानुसार बदल करणे, → विरूपण] पद्धतीचे मूळ शोधक.  यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. रेडिओचा शोध जेव्हा लागला तेव्हा ते वयाने लहान होते.  तरीही त्या शोधाकडे त्यांचे विशेष लक्ष वेधले गेले. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्यांनी स्वतःचे रेडिओप्रेषण केंद्र उभारले.



ते १९०९ मध्ये कोलंबिया विद्यापीठात दाखल झाले.  मायकेल पूपीन यांच्या हाताखाली त्यांनी तेथे अध्ययन केले व १९१३ मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळविली. तेथे त्यांनी द फॉरेस्ट यांच्या श्राव्य कंप्रता विवर्धकाचा [→ इलेक्ट्रानीय विवर्धक] विशेष अभ्यास केला. १९३५ पर्यंत त्यांनी विद्यापीठाच्या मार्सेलस हार्टली संशोधन शाळेत काम केले.  त्यांच्या संशोधनाने रेडिओतंत्रात क्रांती घडून आली.  त्यांनी पहिल्या महायुद्धात (१९१७–१९) सैन्याच्या संदेशवहन विभागात काम केले.



आर्मस्ट्राँग यांनी प्रसिद्ध केलेल्या निर्वात नलिकेसंबंधीच्या शोधाबद्दल द फॉरेस्ट यांनी त्यांच्यावर हक्कभंगाची फिर्याद लावली व तिचा निकाल द फॉरेस्ट यांच्या बाजूने लागला. तेव्हा आर्मस्ट्राँग यांनी कोलंबिया विद्यापीठाला ५०,००० डॉलरांची देणगी देऊन अशा शोधांच्या हक्कांच्या वादांसंबंधी विचार करण्यासाठी एक समिती नेमून घेतली.



उच्च कंप्रता आंदोलनाकरिता लागणारे प्रतिसंभरक (प्रदानातील काही ऊर्जा आदानास देत रहाणारे) मंडल आणि परासंकरण (ग्राहीत येणाऱ्या  संदेशामध्ये तेथेच निर्माण केलेला संदेश मिसळून त्यांच्या दरम्यान असलेली कंप्रता तयार करणे)  पद्धती यांच्या शोधांचे त्यांना विशेष श्रेय दिले जाते. हे शोध पोलिस खात्याने व लष्कराने लगेच स्वीकारले. १९२५ मध्ये त्यांनी रेडिओ तरंगांच्या वहनात येणाऱ्या वातावरणीय अडथळ्यांच्या निराकरणासंबंधी संशोधन केले. एकाच वाहक कंप्रतेच्या साहाय्याने वेगवेगळ्या कंप्रतेचे अनेक संदेश एकाच वेळी पाठविण्याच्या पद्धतीचा शोध त्यांनी लावला. रेडिओ क्लब ऑफ अमेरिका या संस्थेने त्यांच्या सन्मानार्थ प्रतिवर्षी नव्या संशोधकांना आर्मस्ट्राँग पदक देण्याचा उपक्रम सुरू केला.  त्यांनी न्यूयॉर्क येथे आत्महत्या केली.

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

📙 *गुणसूत्रे (DNA) म्हणजे काय ?* 📙

मानवाच्या पेशीत केंद्रक वा भोवतीचा द्रव असे दोन घटक असतात. पेशीतील केंद्रकात डीऑक्सिरायबो, न्यूक्लेइक आम्ल हा कार्बनी रेणू असतो. या रेणूची रचना खालीलप्रमाणे असते.
त्यात दोन साखळ्या एकमेकींत गुंतलेल्या असतात. या द्रव्यात अॅडेनीन, ग्वानीन, सायटोसिन व थायमिन तसेच डीऑक्सीरायबोज ही शर्करा असते. एका साखळीत अॅडेनीन, ग्वानिन, असल्यास तिच्या विरुद्ध साखळीत या घटकांशी दुवा साधणारे थायमिन व सायटोसिन असतात. पेशींचे सर्व संदेश या द्रवांच्या विशिष्ट रचनेच्या सांकेतिक भाषेत असतात. प्रथिने तयार करणे, रंग ठरवणे, डोळ्यांचा रंग ठरवणे, केसांचा प्रकार ठरवणे हे सर्व या द्रव्यांच्या तीन तीन अशा विशिष्ट रचनेवर अवलंबून असते. या विशिष्ट रचनांना गुणसूत्रे वा जनुक असे म्हणतात. अनेक गुणसूत्रांच्या समुच्चयाला रंगसूत्रे असे म्हणतात.
 गुणसूत्रांवर आपला रंग, नाकाचा आकार (चाफेकळी वैगरे) उंची, डोळ्यांचा रंग, केसांचा रंग इत्यादी ठरत असते. साहजिकच काही रोगांमुळे म्हणा वा अन्य कारणांमुळे या गुणसूत्रांवर विपरीत परिणाम झाला, तर जन्मजात वैगुण्ये निर्माण होतात. अनुवांशिक आजार देखील या गुणसूत्रातील गुणांमुळेच होतात. मधुमेह, रक्तदाब, मनोविकार असे अनुवांशिक रोग गुणसूत्रांमुळेच एका पिढीतून दुसऱ्या पिढीला होतात.
लिंग ठरविणाऱ्या गुणसूत्रांच्या समुच्चयाला लिंगसूत्रे असे म्हणतात. मानवी शरीरातील सर्व पेशीत ४६ रंगसूत्रे असतात. त्यापैकी दोन लिंग सूत्रे असतात. पुरुषांत X, Y ही लिंगसूत्रे तर स्त्रीत X, X ही लिंगसूत्रे असतात. फलनाच्या क्रियेत शुक्राणू व स्त्रीबीजाचे मीलन होताना पुरुषांकडून २२X वा २२Y अशी रंगसूत्रे स्त्रीला मिळतात. स्त्रीकडून २२X हीच रंगसूत्रे येतात व त्यांच्या संयोगाने अनुक्रमे ४४XX म्हणजे मुलगी किंवा ४४XY म्हणजे मुलगा जन्माला येतो. यावरून मुलगा होणार की मुलगी यासाठी पुरुषाची लिंगसुत्रेच जबाबदार असतात. अशी ही गुणसूत्रे मानवी शरीराच्या वाढीचा विकासाचा जणू साठवून ठेवलेला गोषवाराच !

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०


📙 *केळी खाल्ल्याने सर्दी होते का ?* 📙

अजूनही केळे खाताना मला विचार पडतो सर्दी तर होणार नाही ? लहानपणापासून आजी, मावशी, आई या सर्वांनी केळे खाऊ नको सर्दी होईल असे वारंवार सांगितल्याने ती भीती आज देखील वाटते. पण शास्त्रीय सत्य काय आहे ?
सर्दी होण्याची दोन मुख्य कारणे म्हणजे विषाणूंचा संसर्ग व अॅलर्जी किंवा वावडे. वातावरणात बदल झाला की बर्‍याच जणांना ही सर्दी होते. म्हणूनच इंग्रजीत याला 'कॉमन कोल्ड' असे म्हणतात.
ही सर्दी ६४ प्रकारच्या विषाणूंमुळे होऊ शकत असल्याने अनेक वेळा सर्दी होते व शरीर या विषाणूंच्या विरुद्ध परिणामकारक अशी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करू शकत नाही. सर्दीवर उपाय नाही कारण विषाणूंना आपण मारू शकत नाही. गमतीने असे म्हणतात की औषध न घेतल्यास सर्दी बरी व्हायला सात दिवस लागतात पण उपचार घेतल्यावर ती एक आठवड्यात बरी होते. वाऱ्यामुळे होणारी सर्दी काही विशिष्ट काळातच होते. काही जणांना धूळ, पराग कण, एखादे विशिष्ट अत्तर इत्यादी संपर्कात आल्यावर सर्दी होते.
 केळ्यामुळे विषाणूसंसर्ग तर होत नाहीच पण काही जणांना वावडे असू शकेल. ज्यांना केळे खाल्ल्याने सर्दी होत असल्याचा अनुभव वारंवार आला असेल त्यांनी केळे न खाणे चांगले. पण केळी खाल्ल्याने सगळ्यांनाच सर्दी होईल हे मात्र चुकीचे आहे. अशा गैरसमजाने सर्वत्र उपलब्ध असलेले स्वस्त असे हे फळ लोक खाणार नाहीत व कार्बोदके प्राप्त करण्याचा हा सोपा मार्ग सोडून देतील. केळे खाल्ल्याने तुम्हाला सर्दी होते वा नाही हे तुम्हीच तपासू शकाल.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०


📙 *'इ' जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घ्याव्या का ?* 📙

अशक्तपणात वाटतो या कारणासाठी अनेक लोक टॉनिकच्या बाटल्या फस्त करत असतात. बी कॉम्प्लेक्सची इंजेक्शने, तर खेडय़ापाडय़ातील प्रशिक्षण न झालेल्या गावठी डॉक्टरांकडेही असतात. टॉनिक, व्हिटॅमिन्स घेण्याचे हे वेड शहरी भागातील सुशिक्षित लोकांमध्येही आढळते. मागणी तसा पुरवठा हे जरी खरे असले तरी बर्‍याचदा फायदा उकळणारी मंडळी इतरांची दिशाभूल करून निरुपयोगी असे पदार्थ बाजारात आणतात व त्याची गरजही निर्माण करतात. लोकांचे अज्ञान डॉक्टरांची धंदेवाईक वृत्ती व औषधी कंपन्यांनी अधिक नफा मिळवण्याची वृत्ती या सर्वांमुळे टॉनिकचा खप वाढतोच आहे.
या व्हिटॅमिन्स / टॉनिकच्या स्पर्धेत गेल्या काही वर्षांत 'इ' जीवनसत्त्वाचा प्रवेश झाला आहे. अनेक जाहिरातीत जीवनसत्त्व 'इ' दररोज वापरल्याने सुदृढपणा येतो शक्ती येते. असे लिहिलेले असते. हे खरे आहे काय ते आता पाहू.
जीवनसत्त्व 'इ' म्हणजेच टोकोफेराॅल, वनस्पतीज तेले, सरकी, सूर्यफुलाच्या बिया, अंड्याचे बलक तसेच लोणी या पदार्थांमध्ये जीवनसत्त्व 'इ' विपुल प्रमाणात आढळते. प्रौढ व्यक्तीला दर दिवशी दहा मिलिग्रॅम इतके जीवनसत्त्व 'इ' लागते. प्रत्येकाला जीवनसत्त्व 'इ' ची नितांत गरज असते हे जरी खरे असले तरी या जीवनसत्त्वाची कमतरता कोणाच्याही शरीरात निर्माण झाल्याचा पुरावा आजतागायत आढळलेला नाही. त्यामुळे जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घेण्याची काही गरज नाही असे म्हणता येते. शिवाय जीवनसत्त्व 'इ' चे प्रमाण खूप जास्त झाल्यास मानवी लिम्फोसाइट या पांढर्‍या रक्तपेशींवर विपरीत परिणाम होतो असे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये सिद्ध झालेले अाहे. या सर्व बाबींचा विचार करता इ जीवनसत्व दररोज घेऊ नये, हे तुम्हाला पटलेच असेल.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून

📙 *उलटी का होते ?* 📙

 उलटी होण्याची अनेक कारणे आहेत. कधी जास्त खाल्ल्याने अजीर्ण होऊन उलटी होते; तर काही जणांना बस, बोट लागून उलटी होते. हे तुम्ही अनुभवले असेल.
पोटाला नको असलेला पदार्थ जठरात आला की मळमळ व्हावयास लागून उलटी होते. विषारी पदार्थ, काही औषधी, जास्तीचे जेवण, अति तेलकट पदार्थ, दारू यामुळे जठरातून हे पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू होते व हे पदार्थ तोंडावाटे बाहेर टाकले जातात. म्हणजे उलटी होते.
खराब अन्नातून विषबाधा झाल्यामुळे उलट्या व जुलाब होतात. आंबट पाणी पडण्याची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उलटी होते. पचनसंस्थेच्या आजारांव्यतिरिक्त मेंदूच्या आवरणाच्या सुजेतही उलट्या होतात. या सुजेमुळे मस्तिष्क जलाचा दाब वाढून मज्जातंतूवर दाब येऊन उलट्या होतात. ती उलटी खूप जोरात होते.
पोटात नको असलेला पदार्थ गेलेला असल्यास उलटीचे बाहेर पडतो. अशा वेळेस उलटी होण्यास मदत करावी. उलटी जुलाब होतच राहिले तर मीठ, साखर, पाणी थोडे थोडे सारखे देत राहावे. आम्लपित्तामुळे उलटी होत असल्यास ती अँटासिड गोळ्यांनी थांबते. गरोदर स्त्रियांमध्ये उलटी कोरडे पदार्थ खाल्ल्याने थांबते. थांबत नसल्यास अधिक तपासणी करावी लागते. तसेच जंतूसंसर्गामुळे उलट्या जुलाब होत असतील तर त्याची चिकित्सा करावी लागते.
उलटी थांबत नसल्यास उलटीत रक्त किंवा लाल काळा करडा रंग दिसल्यास उलटीसोबत ताप, कावीळ, बेशुद्धी, मानतात ताठरणे अशी लक्षणे असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे न्यावे.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
📙 *पेसमेकर काय करतो ?* 📙
*******************************

खरं तर हा प्रश्न कृत्रिम किंवा यांत्रिक पेसमेकर काय करतो ? असा विचारायला हवा. कारण आपल्या शरीरात एक नैसर्गिक पेसमेकरही असतो. तो हृदयाचा ताल नियंत्रित ठेवतो. हृदयाचा हा तब्बलजी सायनो अॅंट्रियल नोड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पेशींच्या एका गुच्छात असतो. जेव्हा हृदयाचा ठोका पडतो तेव्हा या पेशी एक विद्युतस्पंद म्हणजेच विजेचा लोळ हृदयाच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकाकडे पाठवतात. जसजसा हा विद्युतस्पंद हृदयाच्या निरनिराळ्या भागांवरून प्रवास करतो तसतसा तो त्या भागाचं आकुंचन आणि प्रसरण नियंत्रित करतो. प्रथम हृदयाचे दोन्ही वरचे कप्पे आकुंचन पावतात. ते जेव्हा प्रसरण पावतात त्या वेळी त्या कप्प्यांमधील रक्त खालच्या कप्प्यांमध्ये उतरतं आणि जेव्हा ते खालचे कप्पे प्रसरण पावतात तेव्हा ते रक्त शरीरभर जोरानं पाठवलं जातं. परत एकदा हृदयाच्या वरच्या भागात विद्युतस्पंद उभा राहतो आणि हे चक्र अविरत चालू राहतं. हृदय नियमित वेगानं आणि इमानेइतबारे आकुंचन प्रसरण पावत रक्त शुद्ध करून घेत ते शरीरभर खेळवत राहील अशी योजना राबवत राहतं.

पण काही जणांच्या हृदयाचा हा ताल बिघडतो. ते हृदय एकदम जलद गतीने तरी धडधडू लागतं. या अवस्थेला टॅकीकार्डिया म्हणतात. किंवा उलट ते मंदगतीने दुडक्या चालीने चालत राहतं. या स्थितीला ब्रॅडीकार्डिया म्हणतात. किंवा अशा कोणत्याही नियमांनं न चालता ते अनियमितरित्या धडधडतं. अशावेळी नैसर्गिक पेसमेकरच्या मदतीला किंवा त्याचं काम करण्यासाठी बदली म्हणून पेसमेकर नावाचं यंत्र पोटाच्या किंवा छातीच्या पोकळीत बसवलं जातं. या यंत्रात विद्युतस्पंद तयार करणारा एक जनरेटर असतो; आणि हा जनरेटर हृदयाच्या कप्प्यांना जोडणाऱ्या तारा असतात. या तारा निलेमधून नेऊन थेट हृदयाच्या कप्प्यात सोडलेल्या असतात. साधारण अधेलीच्या आकाराचा हा पेसमेकर टायटॅनियम या धातूचा बनवलेला असतो. त्याच्यावर शरीरातील द्रवांचा कोणताही परिणाम होत नाही. तीच बाब तो पेसमेकर हृदयाच्या कप्प्यांना जोडणाऱ्या तारांची. पेसमेकरमधला जनरेटर चालविण्यासाठी दीर्घकाळ चालू राहणाऱ्या आण्विक बॅटरी वापरतात. त्यामुळे वरचेवर बॅटरी बदलण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागत नाही. हा पेसमेकर विवक्षित तालावर विद्युतस्पंदानं हृदयाला टोचणी देत त्याला आपला ताल नियमित राखायला मदत करतो. त्यामुळं मग त्या रुग्णाला सर्वसामान्य निरोगी जीवनशैली अंगीकारणे सोपं जातं.

*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*


*विलबर राइट*

*हवाई जहाज का आविष्कारक*

*जन्मदिन - १६ एप्रिल १८६७*

राइट बंधु (अंग्रेजी: Wright brothers), ऑरविल (अंग्रेजी: Orville, १९ अगस्त, १८७१ – ३० जनवरी १९४८) और विलबर (अंग्रेजी: Wilbur, १६ अप्रैल, १८६७ – ३० मई, १९१२), दो अमरीकन बंधु थे जिन्हें हवाई जहाज का आविष्कारक माना जाता है।इन्होंने १७ दिसंबर १९०३ को संसार की सबसे पहली सफल मानवीय हवाई उड़ान भरी जिसमें हवा से भारी विमान को नियंत्रित रूप से निर्धारित समय तक संचालित किया गया। इसके बाद के दो वर्षों में अनेक प्रयोगों के बाद इन्होंने विश्व का प्रथम उपयोगी दृढ़-पक्षी विमान तैयार किया। ये प्रायोगिक विमान बनाने और उड़ाने वाले पहले आविष्कारक तो नहीं थे, लेकिन इन्होंने हवाई जहाज को नियंत्रित करने की जो विधियाँ खोजीं, उनके बिना आज का वायुयान संभव नहीं था।
इस आविष्कार के लिए आवश्यक यांत्रिक कौशल इन्हें कई वर्षों तक प्रिंटिंग प्रेस, बाइसिकल, मोटर और अन्य कई मशीनों के साथ काम करते करते मिला। बाइसिकल के साथ काम करते करते इन्हें विश्वास हो गया कि वायुयान जैसे असंतुलित वाहन को भी अभ्यास के साथ संतुलित और नियंत्रित किया जा सकता है। १९०० से १९०३ तक इन्होंने ग्लाइडरों पर बहुत प्रयोग किये जिससे इनका पायलट कौशल विकसित हुआ। इनके बाइसिकल की दुकान के कर्मचारी चार्ली टेलर ने भी इनके साथ बहुत काम किया और इनके पहले यान का इंजन बनाया। जहाँ अन्य आविष्कारक इंजन की शक्ति बढ़ाने पर लगे रहे, वहीं राइट बंधुओं ने आरंभ से ही नियंत्रण का सूत्र खोजने पर अपना ध्यान लगाया। इन्होंने वायु-सुरंग में बहुत से प्रयोग किए और सावधानी से जानकारी एकत्रित की, जिसका प्रयोग कर इन्होंने पहले से कहीं अधिक प्रभावशाली पंख और प्रोपेलर खोजे। इनके पेटेंट (अमरीकन पेटेंट सं. ८२१, ३९३) में दावा किया गया है कि इन्होंने वायुगतिकीय नियंत्रण की नई प्रणाली विकसित की है जो विमान की सतहों में बदलाव करती है।
अनेक अन्य आविष्कारकों ने भी हवाई जहाज के आविष्कार का दावा किया है, लेकिन इसमें कोई दो राय नहीं कि राइट बंधुओं की सबसे बड़ी उपलब्धि थी तीन-ध्रुवीय नियंत्रण का आविष्कार, जिसकी सहायता से ही पायलट विमान को संतुलित रख सकता है और दिशा-परिवर्तन कर सकता है। नियंत्रण का यह तरीका सभी विमानों के लिये मानक बन गया और आज भी सब तरह के दृढ़-पक्षी विमानों के लिए यही तरीका उपयुक्त होता है।


📙 *बारकोड काय करतं ?* 📙
******************************

विक्रीसाठी असलेल्या कोणत्याही वस्तूंची किंमत त्या वस्तूवरच छापण्याचं बंधन आता कायद्यानंच उत्पादकांवर घातलेलं आहे. त्यामुळे पॅक केलेल्या प्रत्येक पदार्थांवर त्याची किंमत छापलेली असते. ग्राहकाच्या हिताच्या दृष्टीने हे योग्य असंच पाऊल आहे. तरीही छापलेल्या किमतीवर वेगळंच लेबल चिटकवून ग्राहकाला जास्त किंमत द्यावी लागण्याची फसवणूकही केली जाते. त्यामुळेच आता बहुतांश पदार्थांवर काळ्या पांढऱ्या उभ्या रेषा असलेलं एक चित्र छापलेलं असतं. त्यालाच बारकोड म्हणतात. हे बारकोड म्हणजे त्या पदार्थाची निर्विवाद ओळख पटवणारी सांकेतिक भाषाच असते. जसा एखाद्या व्यक्तीचा पासपोर्ट किंवा काही दिवसांनी प्रत्येकाला मिळणारा नॅशनल युनिक आयडेन्टिफिकेशन नंबर त्याची आणि त्याचीच निर्विवाद ओळख पटवतो, तसाच बारकोड त्या पदार्थाची निर्विवाद ओळख पटवतो. त्या पदार्थाची सर्व माहिती संगणकात साठवलेली असते. त्यामुळे एकदा का त्या पदार्थाची ओळख पटली, की त्या माहितीचा उपयोग करून त्याची निर्धारित केलेली किंमतही समजते आणि तीही संगणकामार्फत तयार होणाऱ्या बिलात समाविष्ट केली जाते. किंवा संगणकाच्या पडद्यावर वाचता येते. ही ओळख पटवणारं बारकोड उत्पादक कंपनीनंच तयार केलेलं असल्यामुळे त्यात हेराफेरी करण्याची शक्यता नगण्यच असते.

बारकोडमध्ये उभ्या काळ्या आणि पांढऱ्या रेषा तसंच काही आकडे असतात. या रेषांची जाडी व लांबी यावरून सांकेतिक भाषेत त्या पदार्थाची ओळख पटवणारं कोडं तयार होतं. त्यात त्या आकड्यांचाही सहभाग असतो. ते कोडं वाचण्यासाठीही खास रिडरचा वापर करावा लागतो. लेझर प्रकाशाचा वापर करणाऱ्या या रीडरमधून प्रकाशाचा एक ठिपका या रेषांवरून फिरवला जातो. तो त्या रेषांची लांबी, जाडी आणि त्यांच्यामधलं अंतर वगैरे सर्वांची नोंद करून ती संगणकाकडे पाठवतो. त्याबरोबर संगणकाकडून त्या पदार्थाची माहिती व किंमत पडद्यावर दाखवली जाते. एकाच वेळी अनेक पदार्थ विकत घेतले गेले असतील, तर तयार केल्या जाणाऱ्या बिलावर त्या किंमतीची नोंद होते. केवळ खाद्यपदार्थांसाठीच नाही तर औषधं, साबू, टूथपेस्ट यासारख्या नेहमीच्या उपयोगातील वस्तूंसाठी आता बारकोडचा वापर केला जातो. पुस्तकांसाठीही तो केला जातो. त्यामुळे पुस्तकाच्या मलपृष्ठांवर आता किमतीऐवजी त्या पुस्तकाची ओळख पटवणारा बारकोड छापलेला असतो. भाज्या, फळफळावळ, मांस, मासे यासारख्या ताज्या पदार्थांसाठी त्याचा वापर होत नाही. पण हेच पदार्थ जर वजन करून प्लास्टिकच्या पिशव्यांत पॅक केलेले असतील, तर त्यांच्यावरही बारकोड छापलेला आढळतो.

बारकोड निर्माण करणाऱ्या दोनशे प्रणाली आज उपलब्ध आहेत. त्यातल्या दोन तीनचाच वापर जास्त होतो. या प्रणालीतील सॉफ्टवेअरचा वापर करू बारकोड तयार केला जातो. बारकोड तयार करणाऱ्या सॉफ्टवेअरमध्येच त्याची छपाई करणाऱ्या सॉफ्टवेअरचा समावेश असतो. त्यामुळे सहजगत्या त्याची निर्मिती आणि छपाई करणं शक्य झालं आहे. ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार जवळजवळ टाळले गेले आहेत.

*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*


*चार्ल्स डार्विन*

*उत्क्रांतिवादाचा जनक*

*स्मृतिदिन - १९ एप्रिल, १८८२*

चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले.
इंग्लंडमधील श्रॉपशायर परगण्यात फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ रोजी चार्ल्सचा जन्म झाला. १८१८ मध्ये तो शाळेत जाऊ लागला. त्याला रसायनशास्त्राची फार आवड होती म्हणून आपल्या भावाच्या मदतीने त्याने आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यात छप्पर घालून एक छोटीशी प्रयोगशाळा उभारली होती व तेथे तो प्रयोग करत बसे. त्याचे शाळकरी सोबती त्याच्या या नादाची टर उडवत. कालांतराने त्याची डॉ. ग्रॅट या जीवशास्त्रज्ञाची ओळख झाली. डार्विनने १८२५ मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या क्राइस्ट महाविद्यालयात नाव नोंदवून पदवी मिळवली. तेथे त्याला जीवजिवाणू व कीटक निरीक्षणाचा नाद लागला.
१८२६ मध्ये कॅप्टन किंगने दक्षिण अमेरिकेच्या संशोधनाची मोहीम काढली. त्याच्या हेन्स्लो नावाच्या मित्राच्या निमंत्रणावरून डार्विन मोहिमेत सामील झाला. त्या मोहिमेवर तो पाच वर्षे होता. निरनिराळे पक्षी-प्राणी एकमेकांशी कसे वागतात, कसे एकमेकांशी जुळवून घेतात, याचे निरीक्षण व अभ्यास त्याने केला व तेथे उत्क्रांतिवाद, सहजीवन, 'बळी तो कान पिळी', ही मूलभूत नैसर्गिक तत्त्वे तो शिकला. माणसाचा मूळ पुरुष, चारपायी पायाच्या माकडापासून झाला असला पाहिजे असे विचार त्याच्या डोक्यात घुमू लागले. वेगवेगळे प्राणी कसे निर्माण झाले या विषयावरच्या त्याच्या Origin of Species या नोव्हेंबर २४ रोजी प्रकाशित झालेल्या शोधप्रबंधाच्या १२५० प्रति एका दिवसात खपल्या. हा सिद्धांत बायबलच्या विरुद्ध जात होता. त्याचा निषेध करण्यासाठी १८६० मध्ये ऑक्‍सफर्डमध्ये विल्बर फोर्स या बिशपने सभा बोलावली. डार्विन आपल्या प्रयोगशाळेत शांतपणे प्रयोग करत बसला होता. हक्सले डी हूकर या शास्त्रज्ञाने डार्विनची बाजू सडेतोड व सोदाहरण मांडली. बिशपला डार्विनचा सिद्धांत मान्य करावाच लागला. डार्विनला त्या यशाची ना खंत ना खेद. तो कार्यातच मग्न राहिला.

*चार्ल्स डार्विनचे मराठीतील पुस्तके*
- उत्क्रांति
- डार्विनचि आत्मकथा
- डार्विनचा सिद्धांत


☀ *उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहिल्यास काय होईल ?* ☀
***********************************

थोडक्यात सांगायचं तर, ते डोळे कायमचे मिटतील. कारण सूर्यकिरणांची तीव्रता इतकी असते, की त्यापायी डोळ्यांच्या पडद्याला कायमस्वरूपी इजा होऊ शकते. त्यांची तशी कारणंही आहेत. सामान्यत: अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून दिवसाच्या तळपत्या सूर्याकडे पाहवणार नाही आशीच योजना निसर्गानं करून ठेवली आहे. त्यापायी सूर्याकडे नजर वळवली की त्याचं तेज डोळ्यांना सहन न होऊन ते टाळण्यासाठी डोळ्यातली बाहुली कमालीची आकुंचन पावते. ते करण्यासाठी डोळ्यांभोवती स्नायूंना कमाल क्षमतेबाहेर काम करावं लागतं. सहाजिकच त्याचा ताण पडून स्नायु दुखू लागतात. ती वेदना सहन न झाल्यामुळेच मग नजर आपोआप सूर्यापासून दूर वळते.

 पण सूर्यग्रहणाच्या वेळेस चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य काजळल्यासारखा दिसतो. सहाजिकच त्याच्या किरणांची तीव्रता कमी झाल्याची भावना होते. पण ही चुकीची कल्पना असते. साधारणपणे सूर्यकिरणांमध्ये जंबुपार विकीरणांपासून ते रेडिओलहरीपर्यंतची प्रारणं अस्तित्वात असतात. यापैकी जंबुपार किरणं जास्त धोकादायक असतात. शिवाय डोळ्यातील भिंग या किरणांचं डोळ्याच्या पडद्याच्या पेशींवर केंद्रीकरण करतं. या पेशी दोन प्रकारच्या असतात. दंडपेशी आणि शंकूपेशी. यांच्यावर प्रकाश पडताच तो शोषला जातो व विशिष्ट रासायनिक अभिक्रिया होऊन एक विद्युतरासायनिक संदेश मेंदूकडे पाठवला जातो. आपण एखाद्या वस्तूकडे पाहातो तेव्हा त्या वस्तूवरुन परावर्तित झालेला सूर्याचा प्रकाश या पेशींवर पडतो. तो सौम्य असतो. शिवाय या रासायनिक अभिक्रियेचा प्रभाव कायमस्वरूपी नसतो. त्यामुळं या पेशी पूर्वपदावर येतात. पण जेव्हा आपण थेट सूर्याकडे पाहतो तेव्हा त्या प्रखरता कितीतरी पट अधिक असते. त्यामुळे होणारी रासायनिक अभिक्रिया अपरिवर्तनीय स्वरूपाची ठरून पेशी कायमच्या निकामी होण्याची शक्यता असते.

जेव्हा आपण एखाद्या भिंगातून सूर्यकिरण कागदावर केंद्रीत करतो तेव्हा काही वेळाने तो कागद जळू लागतो. आपल्या डोळ्यातल्या भिंगातून केंद्रीकरण झालेले सूर्याचे प्रखर किरणही अशाच तर्‍हेने या पडद्याच्या पेशी जाळून टाकू शकतात. त्यामुळे पडद्याचा तेवढा भाग जळून जातो. असे अनेक ठिपके पडद्यावर जमा झाल्यास संपूर्ण पडदाही जळून जाऊन कायमस्वरूपाचं आंधळेपण येऊ शकतं.

 खंडग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्याची लहानशी कोर जरी दिसत राहिली, तरी तिची प्रखरताही अशा प्रकारचं अंशिक किंवा संपूर्ण आंधळेपण आणण्यास पुरेसं ठरतं. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेसही संपूर्ण खग्रास अवस्था काही सेकंद किंवा मिनिटंच राहते. त्या वेळी कदाचित सूर्याकडे पाहणे शक्य होतं. पण या खग्रास अवस्थेच्या अलीकडच्या पलीकडच्या स्थितीतली सूर्यकोरही दाहक ठरू शकते. म्हणूनच कोणत्याही सूर्यग्रहणाच्या वेळेस डोळ्यांवर काळ्या काचेचं किंवा खास चष्म्याचं संरक्षण असल्याशिवाय सूर्याकडे पाहणे अतिशय धोकादायक असतं.

*बाळ फोंडके यांचा 'काय ?' या पुस्तकातून*


🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔬
""""""""""""""""""""""""""""""""""""

 🌎 *पृथ्वीची निर्मिती (६)* 🌎

 इंग्रजीमधील 'सायन्स' या शब्दाला मराठी प्रतिशब्द 'विज्ञान' असा आहे. 'सायन्स' हा शब्द लॅटिन भाषेतील 'सायेन्सिया' या शब्दापासून तयार झाला आहे. 'सायेन्सिया' या शब्दाचा अर्थ 'ज्ञान' असा आहे. ज्ञानाबद्दल अगदी शुद्ध स्वरूपात कुतूहल (खरे तर प्रेम) हीच विज्ञानाची प्रेरक शक्ती आहे. सृष्टीबद्दल कधीही न संपणाऱ्या कुतुहलातून विज्ञानाचा जन्म झाला. फुलपाखरांच्या अंगावर इतके रंग कुठून येतात ? नुसत्या डोळ्यांनी आकाशातील किती तारे मोजता येतील ? सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी सूर्यबिंब इतर वेळेपेक्षा मोठे का दिसते ? डास का गुणगुणतात ? असे अगणित प्रश्न माणसाच्या मनात सतत उभे राहतात. विश्वातील या नाना क्रिया, त्यांचे आविष्कार, यांचा पाठपुरावा करण्याची अंगभूत जिज्ञासा माणसाला असते. ती तृप्त होताच त्याला मनस्वी आनंद होतो. आनंदप्राप्तीसाठीची धडपड ही माणसाची एक सहज प्रवृत्ती असते. ज्ञानाच्या क्षेत्रात त्याचा पाठपुरावा झाल्याने विज्ञानाची वाटचाल होते. विज्ञानाचे मूळ ऐतिहासिकदृष्ट्या माणसाला लाभलेली भौतिक देणगी व मनुष्याच्या अंगातील पारंपरिक कारागिरी किंवा कौशल्य यांमध्ये स्पष्ट होते. हा व्यावहारिक अनुभव व निसर्गदत्त कसब यांची साठवण एका पिढीतून दुसऱ्या पीढीत होत असते आणि त्यांचा विकासही होत असतो. ही सारी माणसाची कमाई आधुनिक विज्ञानाचा उदय होण्यापूर्वीची आहे. आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनात निरीक्षण तर्कशुद्ध विचार व प्रयोग यांचा समावेश असतो. या आधुनिक दृष्टिकोनाचा वापर होण्यासाठी सुरुवातीच्या काळात दोन प्रमुख अडथळे होते. पहिली अडचण अशी की कुशल कारागीर असलेल्या व्यक्तींमध्येही तर्कशुद्ध विचार व त्यासाठीची सम्यक दृष्टी यांचा अभाव होता. दुसरी अधिक महत्त्वाची अडचण म्हणजे नैसर्गिक घटनांबद्दलच्या माणसांच्या कल्पना त्या काळात बहुधा स्पष्ट होत्या किंवा पूर्व ग्रह दूषित तरी होत्या. विज्ञानाची रचना बुद्धिगम्य असते त्याचा गाभा इंद्रियांद्वारे येणारी वस्तुनिष्ठ प्रचिती हा असतो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात व त्याआधी (म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती होण्याआधी) युरोपात राजा व धर्म यांना संमत असणाऱ्या मतावर सत्य असत्य ठरवले जात होते. यामुळे विज्ञानाची प्रगती खुंटली होती. निसर्गाबद्दल कित्तेक चुकीच्या कल्पना समाजात रूढ झाल्या होत्या. उदाहरणार्थ पृथ्वी ही विश्वाच्या मध्यभागी आहे, देवाकडून मानवाची निर्मिती झाली इत्यादी. त्या काळातले विज्ञान हे श्रद्धाधिष्ठित होते. विज्ञानाचा समन्वय एका बाजूला चर्चची मान्यता असलेले बायबलमधील ज्ञान आणि दुसरीकडे सर्वश्रेष्ठ ज्ञानी म्हणून गौरविलेल्या ॲरिस्टॉटलचे मत याद्वारे केले जाई, त्यामुळे विज्ञानाला काहीसे बाैद्धिक कसरतीचे स्वरूप प्राप्त झाले होते. उदा. ॲरिस्टॉटलच्या मताप्रमाणे एखाद्या नैसर्गिक आविष्कारामागे दोन महत्त्वाची कारणे असतात. एकाचे नाव कार्यक्षम कारण (एफिशियंट काॅज) दुसरे अखेरचे कारण (फायनल काॅज). कार्यक्षम कारण म्हणजे ज्याला आपण कार्यकारणभाव म्हणतो त्यांच्याशी सुसंगत असण्याचा प्रयत्न आणि अखेरचे कारण म्हणजे त्या मागचा 'हेतू'. हा हेतू धर्मग्रंथांच्या मांडणीशी सुसंगत असावा, अशी दक्षता घेतली जात असे.

 जगातील देशांचा इतिहास हेच दाखवतो की, स्वतंत्र चिंतन अवलोकन अनुभूती व त्याआधारे ज्ञान यांना ज्या प्रमाणात ज्या क्षेत्रात अवसर मिळतो; त्या प्रमाणात त्या क्षेत्रात समाजाचा उत्कर्ष होतो. हे स्वतंत्र चिंतन, संशोधन थबकलेला काळ हे तमोयुग असते. चौथ्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत युरोपमध्ये ही स्थिती होती.

 *क्रमश:*

 *तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन


🌎 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🌎

 *पृथ्वीची निर्मिती (५)*

 आदिम अवस्थेतील माणूस 'निसर्गलीला' विस्मयचकित होऊन पाहत होता. कानठळ्या बसवणारा मेघांचा गडगडाट, थरकाप उडविणारा विजांचा चमचमाट, धुवाधार कोसळणारा पाऊस, जंगल बेचिराख करत जाणारे वणवे हे सारे आदिम मानवांच्या आकलनाच्या पलीकडे होते. म्हणून या सर्व निसर्गशक्तींना त्यांनी पंचमहाभूते अथवा महादेवता मानले. त्यांच्या कृपा प्रसादावर आपले जगणे अवलंबून आहे, असे त्यांना पदोपदी जाणवत होते आणि म्हणून स्वतःला सुचेल त्याप्रमाणे ते त्या शक्तींशी करुणा भाकत होते. त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होते. उत्क्रांतीमध्ये माणूस सगळ्यात अलीकडे व सर्वात दुबळा प्राणी म्हणून निर्माण झाला. माणूस माशाप्रमाणे सदैव पाण्यात राहू शकत नाही किंवा साध्या चिमणी प्रमाणे त्याला उडता येत नाही. हरणाचे पाय माणसापेक्षा कितीतरी बळकट आहेत आणि म्हणून हरीण माणसापेक्षा प्रचंड वेगाने पळते. गेंडा आणि हत्तीला निसर्गाने माणसाच्या तुलनेत प्रचंड ताकद दिली. वाघ आणि सिंह यांना निसर्गाकडून तीक्ष्ण नखे आणि दात यांची देणगी मिळाली. हिमप्रदेशात सुखाने जगणे अस्वलाला निसर्गाने दिलेल्या केसाळ कोटाच्या कातड्याने शक्य झाले. साधे मांजराचे पिल्लू अंधारात पाहू शकते. मात्र माणसाचे पाय अडखळतात. माकडाचे पिल्लू या झाडावरून त्या झाडावर सहज उडी मारते जे माणसाला शक्य होत नाही. जन्माला आल्यावर एका दिवसाच्या आत पाय झाडत वासरू उभे राहते पण माणसाच्या बाळाला मात्र मान धरावयास तीन महिने लागतात. इतका दुबळा असणारा हा माणूस प्राणी जगाचा स्वामी बनला ही किमया झाली तरी कशी ?
ज्ञान हे माणसाचे खास वैशिष्ट्य आहे. इतर प्राण्यांनी पर्यावरणाप्रमाणे स्वतःला जुळवुन घेतले. पर्यावरणसुसंगत बदल त्यांच्यात झाले. माणसाने मात्र स्वतःच पर्यावरणाला बदलले. पर्यावरणावर स्वामित्व मिळवले. सर्व प्राण्यात फक्त मनुष्यप्राण्याच्या हाताला बाकीच्या बोटावर टेकवता येणारा अंगठा लाभला. माणसाने प्रथम दहा बोटांचे अवजार केले आणि आजूबाजूच्या निसर्गावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. नंतर त्याने दगडाची अवजारे केली. पुढच्या टप्प्यावर दगडाला धार लावली. त्याला झाडाची फांदी जोडली आणि कुऱ्हाड तयार केली. मग धातूचा शोध लागला. धातूंच्या आधारे हत्यारे अथवा अवजारे यांची वैविध्यपूर्णता वाढली. या साऱ्या अवजारांच्या सहाय्याने आजूबाजूच्या निसर्गावर प्रक्रिया करता करता माणसाचा मेंदू विकसित झाला. माणसाला एक उत्क्रांत स्वरयंत्र व मूख पोकळी लाभली. त्या आधारे माणसाने 'भाषा' निर्माण केली, जोपासली, वाढवली. माणसाने केवळ ज्ञानार्जन केले नाही तर भाषेच्या आधारे ज्ञानसंक्रमण केले. एका अर्थाने प्राणीच असलेल्या मानवाचे 'ज्ञान आणि भाषा' हे अभूतपूर्व वैशिष्टय़ मानावे लागेल.

 *क्रमश :*

 *तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन

🌎 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🌎

 *पृथ्वीची निर्मिती* (४)

 अत्यंत प्राथमिक स्वरूपातील जीव सुमारे चारशे कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले असावेत. आज बॅक्टेरिया सारखे जे अनेक अतिसूक्ष्म एकपेशी जीव अस्तित्वात आहेत, त्यांच्या मानाने हे पहिले जीव पुष्कळच साधे होते. त्यांना 'सजीव पदार्थ' असेही म्हणता येईल. हे प्राथमिक जीव जलाशयातील पाणी व त्यात विरघळलेली कार्बनची साधी मिश्र द्रव्य यांवर जगत होते. पण जलाशयात या मिश्र द्रव्यांचा साठा मर्यादित होता. शिवाय सूक्ष्म जीवांच्या जगण्यामुळे या मिश्र द्रव्यातील कार्बनचे रूपांतर कार्बनडायऑक्साईड वायू होत होते. म्हणजे अन्नाचा पुरवठा कमी होत होता आणि वातावरणात कार्बनडायऑक्साईडचा भरणा मात्र होत होता. परिस्थिती अशीच राहिली असती तर जीवनाचा विकासच खुंटला असता. परंतु कालांतराने काही जीवांमध्ये एका नव्या शक्तीचा विकास झाला. प्रकाशाच्या लहरींचा उपयोग करून त्यायोगे कार्बनडायऑक्साईड मधील कार्बनचे रूपांतर ते स्वत:ला हव्या त्या अन्नकणात करू लागले. वनस्पतींच्या अंगी ही शक्ती आहे. त्या हवेतून कार्बनडायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. प्रकाशाच्या सहाय्याने आपले अन्न तयार करण्याची ही शक्ती जीवन विकासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर जीवन सृष्टी दोनशे कोटी वर्षांपूर्वी पोचली असावी. जे जुन्या पद्धतीने आपला निर्वाह करू लागले त्यांचा अंतर्भाव वनस्पतीत होतो, जे जीव भोवतालचे अन्नकण घेण्याच्या पद्धतीला धरून राहिले ते प्राणी होत. वनस्पतींनी बाहेर टाकलेला ऑक्सिजन जीवनक्रियेला उपयोगी पडू लागला. पृथ्वीच्या वातावरणात प्रथमत: शुद्ध ऑक्सिजन मुळीच नव्हता. कारण ऑक्सिजन हे अत्यंत क्रियाशील मूलद्रव्य आहे. ते लगेच इतर पदार्थांशी संयोग पावते आणि म्हणून शुद्ध स्थितीत राहत नाही. आपल्या वातावरणात शुद्ध ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असतो याचे संपूर्ण श्रेय वनस्पतींना आहे. या सर्व घटनाक्रमानंतर प्राथमिक जीवांचा पुढचा विकास होत गेला. एक पेशी जीवातून बहुपेशी जीव निर्माण झाले त्यांचा नानाविध विकास होत अखेर मानव निर्माण झाला.

 *क्रमश:*

 *तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन

🌎 *उत्क्रांती* 🌎
*****************

*प्रास्ताविक (३)*

नवीन शोध लागले, तरी या निर्मितीवादाने युरोपमध्ये चांगलेच मूळ धरले होते. जैवविज्ञानाप्रमाणेच भौतिकीविज्ञानातही बायबलमध्ये सांगितलेल्या कल्पना प्रमाणभूत मानण्याची युरोपमध्ये प्रथा होती. जग पृथ्वीकेंद्रित आहे, असे बायबलमध्ये सांगितले होते; परंतु हा विचार चुकीचा आहे, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे, असे कोपर्निकसने सांगितले. इटलीमध्ये गॅलिलिओने कोपर्निकसचे म्हणणे बरोबर आहे असे ठासून सांगितले. धर्माच्या विरुद्ध भाष्य केल्यामुळे गॅलिलिओला नजरकैदेत राहण्याची शिक्षा भोगावी लागली. इतर ग्रहांवरही सजीवसृष्टी असण्याची शक्यता आहे, असे म्हणणाऱ्या ब्रुनोला जाळण्यात आले. धार्मिक विचारांविरुद्ध मत मांडले, तर ते ऐकून घेण्याची सोशिकता तत्कालीन समाजामध्ये अजिबात नव्हती - हे उदाहरणांवरून स्पष्ट होते. डार्विनचे उत्क्रांतीचे विचारही धार्मिक विचारांच्या विरोधात जाणारे होते. आपण हे विचार प्रकट केले; तर तत्कालीन धर्ममार्तंडांच्या आणि समाजाच्या रागाला सामोरे जावे लागेल, आपले विचार वाचल्यावर समाजाच्या त्यावरील प्रतिक्रिया तीव्र स्वरुपाच्या असतील, धर्माविरुद्ध पवित्रा घेतल्यामुळे कदाचित अमानूष शिक्षाही सोसावी लागेल - अशी डार्विनला भीती वाटत होती. म्हणून तर कितीतरी वर्षे डार्विनने आपले विचार भाषणात गुंडाळून ठेवले होते.

*क्रमशः*

*उत्क्रांती* या पुस्तकातून


🌎 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🌎

*पृथ्वीची निर्मिती* (२)

पृथ्वी निर्माण झाली त्यावेळी त्यावर जीवनाचे अस्तित्व नव्हते. नंतर केव्हातरी त्याची उत्पत्ती झाली. जिवाची ही जन्मकथा थोडक्यात समजून घ्यावयास हवी. पृथ्वीवर एका पेशीचे जंतू ते झाडे, जनावरे, माणसे असे असंख्य जीव आहेत. या सर्व सजीव पेशींचे मूलभूत जीवनद्रव्य एकच आहे व ते म्हणजे प्रोटीन. प्रोटीन हे अतिशय गुंतागुंतीचे संमिश्र द्रव्य आहे. पाणी हे हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा एक अणू यांच्या संयोगातून बनलेले मिश्र द्रव्य आहे. सोडियमचा एक अणू व क्लोरिनचा एक अणू यांच्या संयोगाने मिठाचा रेणू बनतो. पण प्रोटीनच्या एका रेणूत हजारो लाखो अणूंची गुंतागुंत आहे. हे सर्व अणू नियमबद्ध रितीने एकमेकांशी संलग्न आहेत. प्रोटीन मधील अणूंत प्रामुख्याने कार्बन, हायड्रोजन, आॅक्सिजन आणि नायट्रोजन या मूलद्रव्यांचे अणूच मोठ्या संख्येने असतात. सजीव प्रोटीनचा खास गुणधर्म असा आहे की ते कधीही एका स्थितीत स्थिर नसतात. त्यांची चळवळ अखंड चालते. या जीवनाच्या क्रियेत सजीव प्रोटीनचा काही भाग निकामी होऊन बाहेर फेकला जातो. त्याच बरोबर बाहेरच्या परिसरातून ते सजीव प्रोटीन पोषक द्रव्य शोषून घेते व त्यांना आपल्या शरीरात आत्मसात करते. म्हणजे शरीरात नको त्या गोष्टी बाहेर टाकणे, अन्न मिळवणे या आधारे पुनर्घटन करणे अशी ही विघटन पुनर्घटनाची क्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या रासायनिक प्रक्रियेतून होते. या क्रियेतून सजीव शरीराचे अस्तित्व टिकून राहते. याचा अर्थ जीवन हा प्रोटीन द्रव्याच्या अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार आहे. विघटन पुनर्घटनाच्या क्रियेत बाहेरील निसर्गाशी अखंड देवघेव करणे हे त्याचे मुख्य लक्षण आहे आणि ही क्रिया थांबताच जीवनाचा अंत होऊन प्रोटीनचा नाश होतो. अलीकडच्या काळातील जीवशास्त्र व रसायनशास्त्र यातील प्रगती असे सांगते की जीवाचे पुनरुत्पादन, अनुवांशिक लक्षणांचे सातत्य आणि शरीरातील विभिन्न प्रोटिनची निर्मिती याबाबत मुख्य भूमिका न्यूक्लिक अॅसिड द्रव्याची आहे. त्यामुळे 'जीवन हा न्यूक्लिक अॅसिड आणि प्रोटीन द्रव्याच्या अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार आहे', असे म्हणता येईल.
जीवसृष्टीच्या निर्मितीत प्रथमतः कार्बन, हायड्रोजन यांचे साधे मिश्र द्रव्य (हायड्रो कार्बन) आणि पाणी निर्माण झाले. पुढे या हायड्रो कार्बन द्रव्याचा नायट्रोजन ऑक्सिजन आणि पाणी यांच्याशी संयोग होऊन चार मुलद्रव्यांची साधी मिश्रद्रव्ये तयार झाली. तिसर्‍या टप्प्यात त्यामधून न्यूक्लिक अॅसिड, प्रोटीन यासारखी संमिश्र द्रव्ये तयार झाली. चौथ्या पायरीत या द्रव्यांचा विकास होऊन त्यांच्या ठायी आधी उल्लेख केलेली विघटन पुनर्घटनाची विशेष लक्षणे आली आणि अखेरच्या पायरीत प्राथमिक सजीव द्रव्याचा विकास होऊन पहिले जीव अस्तित्वात आले. याच्या पुढचा इतिहास हा उत्क्रांतीचा इतिहास आहे.

 *तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन