Saturday, 10 March 2018

🕊 *कबुतर नेमकी घराकडे कशी परततात ?* 🕊
************************************

सर्वच जातीच्या कबुतरांकडे क्षमता नसली, तरी रॉक पिजन्स या नावानं ओळखल्या जाणाऱ्या एका जातीच्या पक्षांमध्ये दूर दूर अंतरावरुनही नेमका आपल्या घरट्याचा वेध घेण्याची विलक्षण क्षमता असते. म्हणूनच पोस्टाचा उदय होण्यापूर्वीच्या काळात दूर अंतरावर काही संदेश पाठविण्यासाठी दूत म्हणून कबुतरांचा वापर केला जात होता. चंगीझ खानानं यांचा वापर केल्याचे उल्लेख सापडले आहेत. अठराव्या, एकोणीसाव्या शतकांमध्ये तर त्यांचा वापर युद्धामध्येही केला गेला होता. न्यूझीलंडमध्ये १८९८ पासून पंधरा वर्ष कबुतरांमार्फत हवाई टपालही पाठवलं जात होतं. राॅयटर्स या वार्तासंस्थेचा प्रणेता पॉल राॅयटर यानं १८६० मध्ये ब्रसेल्स आणि आखन बेल्जियममधील दोन शहरांमध्ये बातम्या आणि शेअरच्या किमतीविषयीची माहिती पुरवण्यासाठी ४५ कबुतरांची फाैज बाळगली होती. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातही लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल काही कबुतरांना मानाची पदकंही बहाल करण्यात आली होती. एवढंच काय पण एकविसाव्या शतकातही त्यांचा उपयोग झाला आहे. २००२ साली वादळ आणि पूर यानं त्रस्त झालेल्या ओरिसा राज्यात महत्त्वाचे संदेश वेळेवर पोहोचवण्यासाठी कबुतरांना कामाला लावण्यात आलं होतं.

पण ही कामगिरी हे पक्षी नेमकी कशी पार पाडतात याविषयी निर्णायक माहिती मिळालेली नाही. नकाशा आणि होकायंत्र यांचा वापर करून जसे नाविक भर समुद्रातून नौका चालवतात, तशाच तंत्राचा वापर हे पक्षी करतात असंच समजलं जात आहे. आजवरच्या संशोधनातून नकाशासाठी हे पक्षी काही ठळक ठिकाणांचा म्हणजे लँडमार्कचा वापर करताना हे दिसून आलं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांची उंची व त्यांचं एकमेकांशी असलेलं अंतर यांचं भान पक्ष्यांना असतं हे दिसून आलं आहे. मात्र होकायंत्र म्हणून ते कशाचा वापर करतात याविषयी मतभिन्नता आहे. काहींच्या मते ते सूर्यप्रकाशाचा वापर करतात त्यांच्या डोळ्यांच्या खास रचनेमुळे सूर्यकिरणांची दिशा निरनिराळ्या ठिकाणांची त्यांचा होणारा कोन याचं भान या पक्ष्यांना होतं. तर इतर काहींच्या मते पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर या पक्ष्यांकडून होत असतो. त्यांच्या मस्तकातील एका खास मज्जातंतूंमध्ये चुंबकीय क्षेत्राला प्रतिसाद देण्याची क्षमता आहे आणि त्याचा वापर करून ते आपली वाट शोधत असतात.

पण प्रत्यक्ष प्रयोग केले गेले तेव्हा या पक्ष्यांच्या एका जातीला या चुंबकीय क्षेत्रातील काही विसंवाद ओळखता आले, कारण त्यानुसार त्यांनी आपला मार्ग बदलल्याचं दिसलं; पण दुसऱ्या जातीच्या पक्ष्यांना त्या विसंवादाचा थांगपत्ताही लागला नाही. त्यामुळे दोन्ही प्रक्रियेचा अवलंब हे पक्षी वाट शोधण्यासाठी करत असावेत असा अंदाज वर्तवला गेला आहे.

*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*


No comments:

Post a Comment