Saturday, 10 March 2018

🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔭
**************************
*फलज्योतिष विज्ञानाच्या कसोटीवर*
__________________________________

*बार्मन इफेक्ट*

'बार्मन आणि बेली' या सर्कसचा मालक पी.टी. बार्मन म्हणत असे की आमची सर्कस लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना आवडते. कारण आमच्या सर्कसमधील कोणता ना कोणता खेळ प्रत्येकाच्या आवडीचा असतो. फलज्योतिषाचे निदान सर्कशी सारखे असते. त्यात पुरेसा मोघमपणा असे असतो. भाषेमध्ये संदिग्धता असते आणि मांडणी व्यापक, सर्वस्पर्शी असते, म्हणून प्रत्येकाला ती पटते. प्रसंगी आपलेच कसे बरोबर होते, हे गोलमाल भाषा वापरून पटवून देता येते.

बार्मनची पद्धत वापरून तयार केलेले व्यक्तिचित्र कसे असते त्याचा नमुना पाहा.

'तुम्हाला असे फार वाटते की, लोकांना आपण आवडावे, लोक आपली प्रशंसा करोत. आपल्या गुणांची कदर करोत. तुम्ही स्वतःच कडक परीक्षण करता. तुमचा उत्कर्ष होईल. तो घडवून आणण्याची क्षमता असलेले पण पूर्ण वाव न मिळालेले गुण तुमच्यात आहेत. तुम्ही काही बाबतीत कमी पडत असाल, पण त्यावर तुमच्याकडे तोडगे आहेत. बाहेरून जरी तुम्ही शिस्तबद्ध आणि स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत असला, तरी आतून तुम्हाला कधी कधी चिंता भेडसावतात आणि असुरक्षितता जाणवते. कधी कधी तुम्हाला शंका वाटते की आपण योग्य निर्णय घेतला का ? मधूनमधून तुम्हाला बदल हवा असतो. जीवनात विविधता हवी असते. चाकोरीबद्ध जीवनाचा कधी कधी तुम्हाला उबग येतो. तुम्हाला अभिमान आहे कि तुम्ही स्वतंत्रपणे विचार करता आणि दुसऱ्यांची विधाने परीक्षणाशिवाय मानीत नाही. तुम्ही पूर्णपणे कोणाजवळही मन मोकळे करत नाही. कधी कधी तुम्ही खुशीत, बहिर्मुख, मनमिळावू असता; तर कधी विमनस्क आणि अंतर्मुख. तुमच्या काही आकांक्षा अवास्तव असतील, पण एकंदरीत आयुष्यात सुरक्षितता तुम्हाला हवी असते.'

पत्रिका पाहून वरीलप्रमाणे निदान जर केले, तर ते कोणालाही पटण्याजोगे आणि लागू पडणारे असते. कारण खरोखर त्यात विशेष काहीच म्हटलेले नसते, हे जरा विचार केल्यावर ध्यानात येते. जर फलज्योतिषात खरोखरच बिनचूक भाकीत करायची यंत्रणा असेल तर एखाद्या व्यक्तीचे त्याची पत्रिका पाहून रेखाटलेले व्यक्तिचित्र बार्मन इफेक्ट पेक्षा अधिक बिनचूकपणे त्या व्यक्तीला लागू पडायला पाहिजे.

वास्तविक मंगळ, गुरु, शनी अादी ग्रह खनिजे, पाषाणे अथवा वायूपासून बनलेले अचेतन निर्जीव ग्रह आहेत. मंगळ पृथ्वीपासून सुमारे आठ कोटी किलोमीटर दूर आहे, गुरु त्रेसष्ट कोटी किलोमीटर तर शनी १२८ कोटी किलोमीटर इतका प्रचंड दूर आहे. आठ कोटी किलोमीटर दूर व अंतराळात लाखो वर्षे सूर्याभोवती फिरत असलेला मंगळ पत्रिकेत १, ४, ७, ८, १२ या स्थानांवर येऊन पृथ्वीवरील पाचशे कोटी लोकांपैकी केवळ ज्योतिष मानणाऱ्या भारतातल्या काही मुलींच्या मार्गात 'रास्ता रोको' आंदोलन काय करतो, ६३ कोटी किलोमीटर वरचा प्रचंड परंतु अचेतन गुरु वक्री होऊन पृथ्वीवरल्या काही ठराविक विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे काय आणतो आणि तो सव्वाशे कोटी किलोमीटर दूरचा शनी, त्याच्या ३० वर्षांच्या प्रदक्षिणा काळात, भारतातल्या काही लोकांच्या मानगुटीवर बसून फक्त साडेसात वर्षेच धिंगाणा काय घालतो, साराच बनवाबनवीचा मामला !

वरील सर्व विस्तृत मांडणीचा मतितार्थ एवढाच की, फलज्योतिष हे असेलच तर स्वप्न विकण्याची कला आहे. स्वप्ने विकत घेणे हे प्रत्येकाला आवडते आणि 'मी स्वप्ने विकत आहे' असे प्रामाणिकपणे कोणी म्हणाला, तर त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहताही येते; परंतु फलज्योतिष ज्यावेळी विज्ञानाचा दावा करते आणि प्रत्यक्षात दैववादी विचारांच्या साखळदंडाने व्यक्तीला जेरबंद करते, त्यावेळी त्याचा प्रतिवाद आणि प्रतिकार दोन्हीही करावयालाच हवा.

या देशात अाधिच दैववादी असलेल्या माणसांना आणखी दैववादी बनवणे आणि वर त्याला विज्ञानाचा मुलामा देणे या गुन्ह्याला प्रबोधनाच्या क्षेत्रात तरी कधीही क्षमा करता कामा नये.

*क्रमश:*

*तिमिरातूनी तेजाकडे* या पुस्तक

No comments:

Post a Comment