Saturday, 10 March 2018

😯 *खोकला का येतो ?* 😯
**************************
कधी कधी खोकला आपल्याला बेजार करतो. वर्गात सर शिकवत असताना आला तर मग आणखीच अपराधीपणा वाटायला लागतो. सर्व मुलेही त्रासिकपणे पाहतात. तेव्हा वाटते हा खोकला कायमचा बंदच झाला तर किती बरे होईल; पण थांबा, घाई करू नका. खोकला आला नाही तर आपलेच खूप नुकसान होईल. ते कसे हे समजण्यासाठी एकदा खोकून पाहा. खोकण्याच्या प्रक्रियेत आपण सुरुवातीला खोल श्वास घेतो नंतर थोडे थांबून श्वासनलिकेवर झाकणासारखे पडलेल्या एपिग्लाॅटिस या पडद्यावर दाबाखाली हवा सोडतो. हा पडदा उघडतो व दाबाने हवा बाहेर येते. त्याबरोबर थोडासा बेडकाही बाहेर येतो. धुळीचे कण जंतू (आपल्याला दिसत नसले तरी) बाहेर येतात. यावरून लक्षात येते की खोकला हे शरीराचे एक संरक्षण शस्त्र आहे. श्वासनलिकेत काही अपायकारक पदार्थ गेल्यास तेथील चेतातंतूद्वारे हा संदेश मेंदूपर्यंत पोहोचवला जातो. तेथे खोकल्याच्या केंद्रात उत्तेजना पोहोचते. तेथून संबंधित स्नायूंना आदेश येऊन खोकल्याची क्रिया होते. खोकल्याचा उद्देश हा श्वासनलिकेत शिरलेली घाण (जंतू, धुलीकण) बेडका बाहेर टाकणे हा असतो.

खोकला ही श्वसनसंस्थेच्या बर्‍याचशा आजारांमध्ये एक महत्त्वाची तक्रार असते. खोकला कोरडा आहे वा बेडक्यासहित, खोकला कसा येतो, किती वेळा येतो, बेडक्यासोबत रक्त पडते का, खोकताना छातीत दुखते का, खोकला कश्यामुळे वाढतो वा कमी होतो; अशा पूरक माहितीमुळे रोगाचे निदान करणे सोयीचे जाते.

खोकला बंद करणारी औषधे आहेत. नोस्कॅपीन, कोडेनसारख्या औषधांनी खोकला नियंत्रणात येतो; पण आजार बरा न करता फक्त खोकला बरा करणे म्हणजे, कोंबडे झाकून सूर्याला उगवू न देण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. त्यामुळे रोगाचे निदान करून त्यावर प्रभावी उपचार केल्यास आजार तर बरा होईलच, पण खोकलाही पलायन करेल आणि विनाकारण निर्माण होणाऱ्या खोकल्यावरील असंख्य औषधांच्या वापराला तरी आळा बसेल.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०

No comments:

Post a Comment