Saturday, 10 March 2018

🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔭
**************************
*मन मनाचे आजार: भूताने झपाटने, देवीचे अंगात येणे*
__________________________________

*मनाचे स्वरूप*

माणसाची वागणूक म्हणजेच माणसाच्या भावना, विचार आणि आचार या तिघांचा अभ्यास म्हणजेच त्याच्या मनाचा अभ्यास. या गोष्टीचे नियमन मन या संस्थेद्वारे होते. एक उदाहरण घेऊ. सरकार म्हणजे काय, असा प्रश्न विचारला तर, लोकप्रतिनिधी, प्रशासन, न्याययंत्रणा, सैन्य अशी अनेक उत्तरे येतील. यांतील प्रत्येक उत्तर अंशत: बरोबर आहे. प्रत्यक्षात या आणि अशाच इतर अन्य बाबी मिळून सरकार बनते. त्याचप्रमाणे माणसाची बुद्धी, भावना, वासना, स्मरणशक्ती, कल्पना, जाणीव व या स्वरूपाच्या अन्य अनेक अभिव्यक्ती यांमधून व्यक्तीचे मन मन बनते. माणसाच्या मेंदूत सुमारे एक हजार कोटी मज्जापेशी असतात. विद्युत रासायनिक स्पंदनांनी त्या एकमेकींशी जोडलेल्या असतात. माणसाचे मन मेंदूतच, म्हणजेच या मज्जापेशी, त्यांच्यातील विद्युत रासायनिक स्पंदने यांमध्ये असते. मेंदू हा माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळा बनवणारा अवयव आहे. त्याची रचना पद्धती आणि कार्यपद्धती अतिशय गुंतागुंतीची आहे. उत्क्रांतीत अगदी खालच्या स्तरावरील प्राण्याचा मेंदू हा फक्त जीवनाला अतिशय आवश्यक असे श्वसन, हृदयाची स्पंदने यांचे नियंत्रण करतो. उत्क्रांतीत प्राणी जसजसा वरच्या स्तरावर पोचतो, तसतसे मेंदूचे कार्य अधिक गुंतागुंतीचे आणि प्रगत होत जाते. पुढच्या टप्प्यावर हा मेंदू श्वास घेणे व हृदयाची स्पंदने यानंतर स्वरक्षण, क्रोध, प्रतिक्षिप्त क्रियांचे नियंत्रण आदी करत कार्य करू लागतो. मानवाच्या स्तरावर पोहोचलेल्या मेंदूच्या दृष्टीने मात्र ही कार्ये अगदीच प्राथमिक म्हणावी लागतील. माणसात अधिक प्रगत विचार, भावना, सद्सदविवेकबुद्धी ही त्याच्यातील मेंदूच्या प्रगतीमुळेच निर्माण झालेली असते. नैसर्गिक उर्मींवर नियंत्रण ठेवता येण्याची क्षमता केवळ प्रगत मेंदूत असते. सर्व प्राण्यांच्या मेंदूच्या रचनेचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की अप्रगत अवस्थेतील प्राण्यांचा मेंदू हा मनुष्याच्या मेंदूत जो ब्रेनस्टेम नावाचा भाग असतो, त्यासारखाच असतो. मानवाच्या मेंदूतही श्वसन व हृदयाची स्पंदने यांचे केंद्र असते. पण हा भाग मानवाच्या मेंदूत थोड्या प्रमाणात असतो. प्राण्याच्या भावना आणि विचार जसजसे विकसित होत गेले, तसतसे मेंदूचा इतर भाग, फ्राँटललोब, प्री-फ्राँटललोब, लिंबिक सिस्टीम हा भाग, मेंदूची जास्तीत जास्त जागा व्यापू लागतो आणि त्यामुळे 'मनुष्य प्राण्याचा' मेंदू तयार होतो. म्हणजे माणसाच्या भावना, विचार व आचार यांचे नियंत्रण करणारा हा भाग माणसाच्या मेंदूत इतर प्राण्यांच्या मानाने सगळ्यात मोठा असतो. मनाच्या प्रक्रिया जास्तीत जास्त या 'नूतन मेंदू'च्या द्वारेच नियंत्रण होत असतात. मेंदूतील असंख्य पेशी एकमेकींना जोडलेल्या असतात. त्यांना सायनाप्सेस म्हणतात. याआधारे जोडल्या गेलेल्या चेतासंस्थेच्या पेशींचे एक महाप्रचंड जाळे मेंदूत असते. त्याच जाळ्यावाटे संपूर्ण शरीरभर संदेश पाठवणे चालते व त्याद्वारेच सर्व ग्रंथी, अवयव, स्नायू यांच्यावर नियंत्रण ठेवले जाते. या नियंत्रणात पेशींच्या परस्परजोडाचा म्हणजेच सायनाप्सेसचा फार मोठा वाटा असतो. या सायनाप्सेसमध्ये सिरोटोनीन, इपीनेफ्रिन, नाॅरइपीनेफ्रीन, गॅबा अशी विविध प्रकारची रसायने असतात. अंतर्जोडामध्ये ही रसायने किती प्रमाणात असतात, यावर संदेशवहनाचे कार्य अवलंबून असते. या रसायनांचा समतोल बिघडला की संदेशवहनाचे काम विस्कळीत होते. मेंदूच्या त्या भागाकडून नियंत्रित होणाऱ्या भावना व विचार यात दोष निर्माण होतो. उदाहरणार्थ सिरोटोनीनमुळे मनाला शांत वाटते, पण ते ज्यादा झाल्यास भ्रम तयार होतात. डोपामाईन शारीरिक हालचाल मेंदूच्यामार्फत नियंत्रित करते, त्याची पातळी कमी झाली तर पार्किन्सन्स हा रोग होतो.

*क्रमशः*

*तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातून


No comments:

Post a Comment