Saturday, 10 March 2018

🤢 *रोग का होतात ?* 🤢
*************************

रोग का होतात, हा एक मूलभूत प्रश्न आहे मानव जेव्हा जन्माला आला तेव्हापासून त्याचा पिच्छा पुरवणाऱ्या रोगांबद्दल त्याला कुतूहल वाटणे स्वाभाविकच आहे. हजारो वर्षांपूर्वी देवाच्या कोपामुळे, सैतानाच्या करणीमुळे, जादूटोण्यामुळे व भूताखेतांमुळे रोग होतात असे समजले जाई. त्यानंतर काही शतकांनंतर असा शोध लागला की नुसत्या डोळ्यांनी न दिसणारे सूक्ष्म असे जीव शरीरात आल्यामुळे रोग होतात. त्या काळात क्षयरोग, कुष्ठरोग अशा भयानक रोगाच्या जंतूंचे शोध लागले. ही समजूत नंतर शतकभर रूढ होती. कर्करोग हृदयविकार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे रोग का होतात; याचे कारण मात्र नक्की ठरवता येत नव्हते. तेव्हा रोग बहुविध कारणांमुळे होतो, अशी कल्पना पुढे आली. हीच कल्पना सध्याही रूढ आहे. या कल्पनेप्रमाणे रोग कसे होतात, ते आता पाहू. रोगकारक घटक, मनुष्य व त्याचे पर्यावरण या तिन्ही घटकांमध्ये समतोल राखला गेला तर माणूस निरोगी राहतो. या तिन्ही घटकांमधील समतोल बिघडल्यास रोग होतात. अशी सध्या संकल्पना गृहीत धरली जाते.

रोगकारक घटकात शरीरावर अयोग्य परिणाम घडवून आणणारे जीवाणू, विषाणू असे जीवजंतू, रासायनिक व विषारी पदार्थ यांचा संपर्क, उष्णता, थंडी, इजा, दुखापत, कुपोषण, अतिपोषण, मानसिक ताणतणाव, तसेच चुकीची औषधयोजना यांचा समावेश होतो. मानवी घटकांत वय, लिंग, जात, धर्म, शिक्षण, आनुवंशिक गुण, व्यसने, पोषण, त्याचे राहणीमान व रोगप्रतिकारक शक्ती आदींचा समावेश होतो. दारिद्र्य, दाटीवाटीने बांधलेली घरे, वायूवीजनचा अभाव, प्रकाशाचा अभाव मलमूत्र विसर्जन व विल्हेवाटीच्या व्यवस्थेचा अभाव, अज्ञान, हवा पाणी माती यांचे प्रदूषण आदी कारणांचा पर्यावरणातील घटकांमध्ये समावेश होतो. यामुळेच घरादारात, वातावरणात क्षयरोगाचे असंख्य जंतू असूनही धूम्रपान करणाऱ्या, रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या वा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या खालच्या थरात असणाऱ्या लोकांनाच क्षय होतो. रोग कसे होतात याबाबतच्या या नवीन संकल्पनेमुळे हृदयविकार, मधुमेह या रोगांची कारणमीमांसाही करता येते. रोगकारक घटक व पर्यावरण यांचा समतोल राखला तरच माणूस रोगमुक्त होऊ शकेल; हेही या कल्पनेतून प्रतिध्वनित होते.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०


No comments:

Post a Comment