Saturday, 10 March 2018

🌲 *उंच झाडांच्या शेंड्यांपर्यंत पाणी कसं पोहोचतं ?* 🌲
************************************

साधं पाच दहा मीटर खोल असलेल्या विहिरीतून पाणी काढायचं तर विजेचा पंप बसवावा लागतो. दोन तीन मजल्यांच्या इमारतीच्या गच्चीवरची टाकी भरायची तरी पंपाच्या मदतीविना ते शक्य होत नाही. मग ताडमाड उंच असलेल्या माडाच्या शेंड्यापर्यंत त्याच्या मुळांशी घातलेलं पाणी कसं पोहोचतं ? जंगलांमध्ये देवदारसारखे वृक्ष तर सहज शंभर मीटर उंची गाठतात. त्यांनाही मुळाजवळचं पाणी पुरतं.

हे शक्य व्हावं अशी व्यवस्था निसर्गानेच करून ठेवली आहे. निसर्गाच्या दोन करामतींचा यात वाटा आहे. पहिला म्हणजे या झाडांमध्ये झायलेम या नावानं ओळखल्या जाणाऱ्या द्रववाहिन्याच असतात. आपल्या शरीरात कशा रक्तवाहिन्या असतात तशा या झाडांच्या जीवनवाहिन्याच असतात. त्यांचा घेर साधारण एका मिलिमीटरच्या एक दशांश इतकाच असतो. मुळांची घातलेलं पाणी या नलिकांमधून वर चढत जातं. पाण्याने भरलेल्या ग्लासामध्ये एखादी स्ट्राॅ किंवा काचेची बारीकशी नवी ठेवली तर तिच्यातही असं पाणी वर चढत जाताना दिसतं. यालाच केशाकर्षण किंवा कॅपिलरी अॅक्शन असं म्हणतात. त्यात झाडांच्या पानांमधून पाण्याचं बाष्पीभवन होत असल्यानं भरच पडते. आपल्याला जसा घाम येतो तर आणि अंगातल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन ते हवेत उडून जातं, तसच झाडांच्या पानांमधून पाणी बाहेर पडून ते उडून जात असतं त्यामुळे पानांजवळ पाण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं. उलट मुळांपाशी ते कितीतरी जास्त असतं. त्यामुळे एकप्रकाराचा पंप तयार होऊन मुळांपासून पानांपर्यंत असा पाण्याचा एक प्रवाहच तयार होतो. त्यापायी त्या नलिकांमधून पाणी वर ओढलं जातं. पार शेंड्यापर्यंत पोहोचतं.

तसं व्हायला पाण्याच्या आणखी एका गुणधर्माचीही मदत होते. पाण्यात रेणू एकमेकांना घट्ट धरून राहणारे असतात. इतर कोणत्याही रेणूंपेक्षा ते आपल्याच रेणूंची जवळीक सांधणं, घसट ठेवणं पसंत करतात. त्यामुळे या नलिकांच्या आतल्या अंगाला चिकटलेले पाण्याचे रेणू इतरांना आपल्या जवळ करण्याचे प्रयत्न करतात. त्यांना खेचून घेतात. त्यामुळेही पाणी वर वर चढत जातं. त्याचा जो एक प्रवाह तयार होतो त्यामुळे पाण्याचा एक खांबच जणू तिथं उभा राहतो. त्या पाण्यात विरघळलेले इतर पदार्थही मग त्या पाण्याबरोबर वरवर चढत राहतात. झाडाचं पोषण करणारं अन्नही त्याला भरवतात.

पावसाचं पाणी त्या झाडाच्या शेंड्यावर पडतं; पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. कारण पानं ते पाणी शोषून घेऊन आतवर ओढून घेऊ शकत नाहीत. मुळांजवळ साठलेलं पाणीच वरवर चढत राहतं.

*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*


No comments:

Post a Comment