⭐ *तार्यांचा मृत्यू कसा होतो ?* ⭐
************************************
हायड्रोजन वायूचा इंधन म्हणून वापर करणाऱ्या अणुसंमीलन प्रक्रियेतून जन्माला आलेला तारा जोवर त्याच्या अंतरंगातल्या त्या अणुभट्ट्या धडधडत आहेत तोवर जिवंत असतो; पण त्याच्याकडे असलेलं हायड्रोजनचं इंधन अमर्यादित नसतं. त्याच्या सुरुवातीच्या आकारमानावर ते किती काळ पुरेल हे अवलंबून असलं तरी काही वर्षांनंतर का होईना हे संपुष्टात येतंच. तसं झालं की त्या अणुभट्ट्या विझतात. गुरुत्वाकर्षणाच्या ओढीवर मात करणार्या ऊर्जा उत्सर्जित करणारी प्रक्रिया बंद पडते. तारा केवळ वायूचा गोळाच राहतो. त्याच्या केंद्राची बाहेरच्या भागावरची ओढ परत उसळी घेते. त्याला आतल्या दिशेनं खेचत राहते. त्या गोळ्यावर परत प्रचंड दाब पडतो. त्याचं आकारमान घटतं. त्याचं श्वेत बटूत रूपांतर होतं. दाब आणखी वाढला की त्याचा रंग बदलत जात जात तांबडा होतो. त्याहुनही दाब वाढला की त्याचं कृष्ण बटूत रूपांतर होतं. त्यातून कोणताही प्रकाश बाहेर पडत नाही. आपल्या सूर्याची हीच अवस्था होणार आहे.
पण सूर्याहूनही मोठ्या असलेल्या ताऱ्यांची मृत्यूनंतरची अवस्था निराळी होते. त्यांची कृष्ण बटुसारखी अवस्था होताना त्याच्या गाभ्याची घनता वाढत जाते. तो जास्तच तापतो. त्याचं तापमान वाढत वाढत अशा सीमेवर पोहोचतं की आता हेलियमच्या अणुचं मीलन होऊ लागतं. विझू पाहणाऱ्या अणुभट्ट्या हेलियमचा इंधन म्हणून वापर करत परत धडधडू लागतात. परत एकदा त्यांच्यातून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडते. तारा आकुंचन पावला तरी परत प्रकाशमान होतो. बाहेर पडणारा तो ऊर्जेचा रेटा आतल्या दिशेनं खेचणाऱ्या गुरुत्वाकर्षणावर परत मात करतो. तारा स्थिर होतो आणि प्रकाश देत राहतो.
पण हेलियमचा साठाही मर्यादितच असतो. तो संपला की त्यातून तयार झालेल्या कार्बनचा इंधन म्हणून वापर होतो. ही प्रक्रिया वाढत्या वस्तुमानाच्या इंधनाचा वापर करत सुरूच राहते; पण त्या सर्व इंधनाचं लोहात रूपांतर झालं की त्याचा इंधन म्हणून वापर करणं अशक्य होतं. आता केंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या ओढीवर मात करणारी कोणतीही प्रक्रिया होत नाही. तार्याला जिवंत ठेवणाऱ्या अणुभट्ट्या कायमच्या विझून जातात.
गुरुत्वाकर्षणाची आपल्या दिशेनं असणारी ओढ मात्र कायमच असते. तिच्यापायी तो गोळा आता इतका दाबला जातो की तो दाब असह्य होऊन त्याचा स्फोट होतो. यालाच सुपरनोव्हा असे म्हणतात. त्या क्षणी तो मृत्युपंथाला लागलेला तारा इतका प्रकाशमान होतो की त्या एका ताऱ्याचा प्रकाश अख्ख्या आकाशगंगेच्या प्रकाशाहूनही जास्त होतो. काही वेळा त्या ताऱ्याचं कृष्णविवरात रूपांतर होतं.
*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून