Tuesday, 18 April 2017

ललिता पवार

खलनायिका -खाष्ट सासू अश्या भूमिकेत आपला ठसा उमटविणाऱ्या ललिता पवारयांची  आज जयंती  .आपल्या चतुरस्त्र अभिनयाने पन्नास वर्षांहून अधिक काळ रुपेरी पडदा गाजवणारी एकमेव अभिनेत्री म्हणजे ललिता पवार. अंबिका लक्ष्मण सगुण हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म नाशिक शेजारील येवले या गावी १८ एप्रिल १९१६ रोजी झाला.
**********त्या अशिक्षित असल्याने पोटार्थी बनून पुणे येथे आल्या व आर्यन फिल्म कंपनीचे मालक नानासाहेब सरपोतदार यांच्या घरी धुणीभांडी असली हलकी कामे करु लागल्या. पण नानासाहेबांनी त्यांना १९२८ साली पतितोद्धार या चित्रपटात भूमिका दिली व त्यांचे नाव मिस अंबू ठेवले. पुढे अनेक वर्षे त्या मूकपटात भूमिका करीत. मुकपटात काम करीत असतानाच त्यांचा परिचय दिग्दर्शक जी. जी. पवार यांच्याशी झाला व १९३८ साली ते दोघे विवाहबद्ध झाले. त्याच वेळेपासून त्या ललिता पवार या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.
**********मा. भगवान यांच्या स्टंटपटात काम करत असताना भगवान हे ललिता पवार यांना थोबाडीत मारतात असं दृश्य होतं. ती थोबाडीत इतक्या जोरात बसली की त्यांच्या कानातून रक्त येऊ लागले व त्यांच्या चेह-याच्या डाव्या बाजूला अर्धांगवायू झाला. त्यातून त्या ब-या झाल्या. पण दुखणे त्यांच्या डोळ्यावर गेलं. बोलता बोलता डोळा आपोआपच उघडला मिटला जाऊ लागला. त्यामुळे त्यांना नायिकेच्या भूमिका करायला त्रास होऊ लागला. पण याच डोळ्याचा उपयोग त्यांनी आपला अभिनय परिणामकारक करण्यासाठी करुन घेतला.
ललिता पवार या मराठी चित्रपटापेक्षा हिंदी चित्रपटांमधून अधिक चमकल्या. हिंदीत त्या काळातील राज कपूर , जयराज , शम्मी कपूर , नुतन , मीनाकुमारी अशा आघाडीच्या सर्वच नामवंत कलाकारांसह त्यांनी केली. दाग , श्री ४२० , परवरीश , सुजाता , अनाडी , ससुराल , जंगली , सेहरा , भरोसा , संगम , लव इन टोकियो , सूरज आदी हिंदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका त्यांच्या चाहत्यांच्या स्मरणात सदैव राहणा-या आहेत. १९३८ साली दुनिया क्या है या हिंदी चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली होती. गुजराती , भोजपुरी चित्रपटांमधूनही त्यांनी भूमिका केल्या. हिंदी चित्रपटांत व्यस्त असूनही मराठी चित्रपटात काम करणे त्यांनी सोडले नाही. घरचा भेदी , सतीचं वाण , कुलस्वामिनी अंबाबाई हे त्यांचे चित्रपट लोकप्रिय झाले. सुनेला छळणारी कजाग सासू , त्यांनी काही मराठी चित्रपटांतून इतक्या सुरेखरित्या साकारली की , चित्रपट पाहतानाही बायका त्यांचा धसका घेत.
वयाची सरासरी उलटल्यावर ललिता पवार एकाकी झाल्या व त्यांनी मुंबई सोडून पुण्याला स्थानिक होण्याचा निर्णय घेतला. पुण्यात एकाकी जीवन जगत असताना त्यांनी एक दोन मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. फेब्रुवारी १९९८ मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूसमयी त्याच्या जवळपास कुणीही नव्हते. मृत्युनंतर दोन एक दिवसांनी घराचा दरवाजा फोडल्यानंतर त्यांचा निःचेष्ट मृतदेह आढळला. चारशेहून अधिक चित्रपटांत आपल्या कामाचा दरारा निर्माण करणारी अभिनेत्री , काळाच्या पडद्याआड अगदी शांतपणे गेल्या.
"

No comments:

Post a Comment