Thursday, 19 April 2018

☀ *उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहिल्यास काय होईल ?* ☀
***********************************

थोडक्यात सांगायचं तर, ते डोळे कायमचे मिटतील. कारण सूर्यकिरणांची तीव्रता इतकी असते, की त्यापायी डोळ्यांच्या पडद्याला कायमस्वरूपी इजा होऊ शकते. त्यांची तशी कारणंही आहेत. सामान्यत: अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून दिवसाच्या तळपत्या सूर्याकडे पाहवणार नाही आशीच योजना निसर्गानं करून ठेवली आहे. त्यापायी सूर्याकडे नजर वळवली की त्याचं तेज डोळ्यांना सहन न होऊन ते टाळण्यासाठी डोळ्यातली बाहुली कमालीची आकुंचन पावते. ते करण्यासाठी डोळ्यांभोवती स्नायूंना कमाल क्षमतेबाहेर काम करावं लागतं. सहाजिकच त्याचा ताण पडून स्नायु दुखू लागतात. ती वेदना सहन न झाल्यामुळेच मग नजर आपोआप सूर्यापासून दूर वळते.

 पण सूर्यग्रहणाच्या वेळेस चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य काजळल्यासारखा दिसतो. सहाजिकच त्याच्या किरणांची तीव्रता कमी झाल्याची भावना होते. पण ही चुकीची कल्पना असते. साधारणपणे सूर्यकिरणांमध्ये जंबुपार विकीरणांपासून ते रेडिओलहरीपर्यंतची प्रारणं अस्तित्वात असतात. यापैकी जंबुपार किरणं जास्त धोकादायक असतात. शिवाय डोळ्यातील भिंग या किरणांचं डोळ्याच्या पडद्याच्या पेशींवर केंद्रीकरण करतं. या पेशी दोन प्रकारच्या असतात. दंडपेशी आणि शंकूपेशी. यांच्यावर प्रकाश पडताच तो शोषला जातो व विशिष्ट रासायनिक अभिक्रिया होऊन एक विद्युतरासायनिक संदेश मेंदूकडे पाठवला जातो. आपण एखाद्या वस्तूकडे पाहातो तेव्हा त्या वस्तूवरुन परावर्तित झालेला सूर्याचा प्रकाश या पेशींवर पडतो. तो सौम्य असतो. शिवाय या रासायनिक अभिक्रियेचा प्रभाव कायमस्वरूपी नसतो. त्यामुळं या पेशी पूर्वपदावर येतात. पण जेव्हा आपण थेट सूर्याकडे पाहतो तेव्हा त्या प्रखरता कितीतरी पट अधिक असते. त्यामुळे होणारी रासायनिक अभिक्रिया अपरिवर्तनीय स्वरूपाची ठरून पेशी कायमच्या निकामी होण्याची शक्यता असते.

जेव्हा आपण एखाद्या भिंगातून सूर्यकिरण कागदावर केंद्रीत करतो तेव्हा काही वेळाने तो कागद जळू लागतो. आपल्या डोळ्यातल्या भिंगातून केंद्रीकरण झालेले सूर्याचे प्रखर किरणही अशाच तर्‍हेने या पडद्याच्या पेशी जाळून टाकू शकतात. त्यामुळे पडद्याचा तेवढा भाग जळून जातो. असे अनेक ठिपके पडद्यावर जमा झाल्यास संपूर्ण पडदाही जळून जाऊन कायमस्वरूपाचं आंधळेपण येऊ शकतं.

 खंडग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्याची लहानशी कोर जरी दिसत राहिली, तरी तिची प्रखरताही अशा प्रकारचं अंशिक किंवा संपूर्ण आंधळेपण आणण्यास पुरेसं ठरतं. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेसही संपूर्ण खग्रास अवस्था काही सेकंद किंवा मिनिटंच राहते. त्या वेळी कदाचित सूर्याकडे पाहणे शक्य होतं. पण या खग्रास अवस्थेच्या अलीकडच्या पलीकडच्या स्थितीतली सूर्यकोरही दाहक ठरू शकते. म्हणूनच कोणत्याही सूर्यग्रहणाच्या वेळेस डोळ्यांवर काळ्या काचेचं किंवा खास चष्म्याचं संरक्षण असल्याशिवाय सूर्याकडे पाहणे अतिशय धोकादायक असतं.

*बाळ फोंडके यांचा 'काय ?' या पुस्तकातून*


🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔬
""""""""""""""""""""""""""""""""""""

 🌎 *पृथ्वीची निर्मिती (६)* 🌎

 इंग्रजीमधील 'सायन्स' या शब्दाला मराठी प्रतिशब्द 'विज्ञान' असा आहे. 'सायन्स' हा शब्द लॅटिन भाषेतील 'सायेन्सिया' या शब्दापासून तयार झाला आहे. 'सायेन्सिया' या शब्दाचा अर्थ 'ज्ञान' असा आहे. ज्ञानाबद्दल अगदी शुद्ध स्वरूपात कुतूहल (खरे तर प्रेम) हीच विज्ञानाची प्रेरक शक्ती आहे. सृष्टीबद्दल कधीही न संपणाऱ्या कुतुहलातून विज्ञानाचा जन्म झाला. फुलपाखरांच्या अंगावर इतके रंग कुठून येतात ? नुसत्या डोळ्यांनी आकाशातील किती तारे मोजता येतील ? सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी सूर्यबिंब इतर वेळेपेक्षा मोठे का दिसते ? डास का गुणगुणतात ? असे अगणित प्रश्न माणसाच्या मनात सतत उभे राहतात. विश्वातील या नाना क्रिया, त्यांचे आविष्कार, यांचा पाठपुरावा करण्याची अंगभूत जिज्ञासा माणसाला असते. ती तृप्त होताच त्याला मनस्वी आनंद होतो. आनंदप्राप्तीसाठीची धडपड ही माणसाची एक सहज प्रवृत्ती असते. ज्ञानाच्या क्षेत्रात त्याचा पाठपुरावा झाल्याने विज्ञानाची वाटचाल होते. विज्ञानाचे मूळ ऐतिहासिकदृष्ट्या माणसाला लाभलेली भौतिक देणगी व मनुष्याच्या अंगातील पारंपरिक कारागिरी किंवा कौशल्य यांमध्ये स्पष्ट होते. हा व्यावहारिक अनुभव व निसर्गदत्त कसब यांची साठवण एका पिढीतून दुसऱ्या पीढीत होत असते आणि त्यांचा विकासही होत असतो. ही सारी माणसाची कमाई आधुनिक विज्ञानाचा उदय होण्यापूर्वीची आहे. आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनात निरीक्षण तर्कशुद्ध विचार व प्रयोग यांचा समावेश असतो. या आधुनिक दृष्टिकोनाचा वापर होण्यासाठी सुरुवातीच्या काळात दोन प्रमुख अडथळे होते. पहिली अडचण अशी की कुशल कारागीर असलेल्या व्यक्तींमध्येही तर्कशुद्ध विचार व त्यासाठीची सम्यक दृष्टी यांचा अभाव होता. दुसरी अधिक महत्त्वाची अडचण म्हणजे नैसर्गिक घटनांबद्दलच्या माणसांच्या कल्पना त्या काळात बहुधा स्पष्ट होत्या किंवा पूर्व ग्रह दूषित तरी होत्या. विज्ञानाची रचना बुद्धिगम्य असते त्याचा गाभा इंद्रियांद्वारे येणारी वस्तुनिष्ठ प्रचिती हा असतो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात व त्याआधी (म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती होण्याआधी) युरोपात राजा व धर्म यांना संमत असणाऱ्या मतावर सत्य असत्य ठरवले जात होते. यामुळे विज्ञानाची प्रगती खुंटली होती. निसर्गाबद्दल कित्तेक चुकीच्या कल्पना समाजात रूढ झाल्या होत्या. उदाहरणार्थ पृथ्वी ही विश्वाच्या मध्यभागी आहे, देवाकडून मानवाची निर्मिती झाली इत्यादी. त्या काळातले विज्ञान हे श्रद्धाधिष्ठित होते. विज्ञानाचा समन्वय एका बाजूला चर्चची मान्यता असलेले बायबलमधील ज्ञान आणि दुसरीकडे सर्वश्रेष्ठ ज्ञानी म्हणून गौरविलेल्या ॲरिस्टॉटलचे मत याद्वारे केले जाई, त्यामुळे विज्ञानाला काहीसे बाैद्धिक कसरतीचे स्वरूप प्राप्त झाले होते. उदा. ॲरिस्टॉटलच्या मताप्रमाणे एखाद्या नैसर्गिक आविष्कारामागे दोन महत्त्वाची कारणे असतात. एकाचे नाव कार्यक्षम कारण (एफिशियंट काॅज) दुसरे अखेरचे कारण (फायनल काॅज). कार्यक्षम कारण म्हणजे ज्याला आपण कार्यकारणभाव म्हणतो त्यांच्याशी सुसंगत असण्याचा प्रयत्न आणि अखेरचे कारण म्हणजे त्या मागचा 'हेतू'. हा हेतू धर्मग्रंथांच्या मांडणीशी सुसंगत असावा, अशी दक्षता घेतली जात असे.

 जगातील देशांचा इतिहास हेच दाखवतो की, स्वतंत्र चिंतन अवलोकन अनुभूती व त्याआधारे ज्ञान यांना ज्या प्रमाणात ज्या क्षेत्रात अवसर मिळतो; त्या प्रमाणात त्या क्षेत्रात समाजाचा उत्कर्ष होतो. हे स्वतंत्र चिंतन, संशोधन थबकलेला काळ हे तमोयुग असते. चौथ्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत युरोपमध्ये ही स्थिती होती.

 *क्रमश:*

 *तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन


🌎 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🌎

 *पृथ्वीची निर्मिती (५)*

 आदिम अवस्थेतील माणूस 'निसर्गलीला' विस्मयचकित होऊन पाहत होता. कानठळ्या बसवणारा मेघांचा गडगडाट, थरकाप उडविणारा विजांचा चमचमाट, धुवाधार कोसळणारा पाऊस, जंगल बेचिराख करत जाणारे वणवे हे सारे आदिम मानवांच्या आकलनाच्या पलीकडे होते. म्हणून या सर्व निसर्गशक्तींना त्यांनी पंचमहाभूते अथवा महादेवता मानले. त्यांच्या कृपा प्रसादावर आपले जगणे अवलंबून आहे, असे त्यांना पदोपदी जाणवत होते आणि म्हणून स्वतःला सुचेल त्याप्रमाणे ते त्या शक्तींशी करुणा भाकत होते. त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होते. उत्क्रांतीमध्ये माणूस सगळ्यात अलीकडे व सर्वात दुबळा प्राणी म्हणून निर्माण झाला. माणूस माशाप्रमाणे सदैव पाण्यात राहू शकत नाही किंवा साध्या चिमणी प्रमाणे त्याला उडता येत नाही. हरणाचे पाय माणसापेक्षा कितीतरी बळकट आहेत आणि म्हणून हरीण माणसापेक्षा प्रचंड वेगाने पळते. गेंडा आणि हत्तीला निसर्गाने माणसाच्या तुलनेत प्रचंड ताकद दिली. वाघ आणि सिंह यांना निसर्गाकडून तीक्ष्ण नखे आणि दात यांची देणगी मिळाली. हिमप्रदेशात सुखाने जगणे अस्वलाला निसर्गाने दिलेल्या केसाळ कोटाच्या कातड्याने शक्य झाले. साधे मांजराचे पिल्लू अंधारात पाहू शकते. मात्र माणसाचे पाय अडखळतात. माकडाचे पिल्लू या झाडावरून त्या झाडावर सहज उडी मारते जे माणसाला शक्य होत नाही. जन्माला आल्यावर एका दिवसाच्या आत पाय झाडत वासरू उभे राहते पण माणसाच्या बाळाला मात्र मान धरावयास तीन महिने लागतात. इतका दुबळा असणारा हा माणूस प्राणी जगाचा स्वामी बनला ही किमया झाली तरी कशी ?
ज्ञान हे माणसाचे खास वैशिष्ट्य आहे. इतर प्राण्यांनी पर्यावरणाप्रमाणे स्वतःला जुळवुन घेतले. पर्यावरणसुसंगत बदल त्यांच्यात झाले. माणसाने मात्र स्वतःच पर्यावरणाला बदलले. पर्यावरणावर स्वामित्व मिळवले. सर्व प्राण्यात फक्त मनुष्यप्राण्याच्या हाताला बाकीच्या बोटावर टेकवता येणारा अंगठा लाभला. माणसाने प्रथम दहा बोटांचे अवजार केले आणि आजूबाजूच्या निसर्गावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. नंतर त्याने दगडाची अवजारे केली. पुढच्या टप्प्यावर दगडाला धार लावली. त्याला झाडाची फांदी जोडली आणि कुऱ्हाड तयार केली. मग धातूचा शोध लागला. धातूंच्या आधारे हत्यारे अथवा अवजारे यांची वैविध्यपूर्णता वाढली. या साऱ्या अवजारांच्या सहाय्याने आजूबाजूच्या निसर्गावर प्रक्रिया करता करता माणसाचा मेंदू विकसित झाला. माणसाला एक उत्क्रांत स्वरयंत्र व मूख पोकळी लाभली. त्या आधारे माणसाने 'भाषा' निर्माण केली, जोपासली, वाढवली. माणसाने केवळ ज्ञानार्जन केले नाही तर भाषेच्या आधारे ज्ञानसंक्रमण केले. एका अर्थाने प्राणीच असलेल्या मानवाचे 'ज्ञान आणि भाषा' हे अभूतपूर्व वैशिष्टय़ मानावे लागेल.

 *क्रमश :*

 *तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन

🌎 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🌎

 *पृथ्वीची निर्मिती* (४)

 अत्यंत प्राथमिक स्वरूपातील जीव सुमारे चारशे कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले असावेत. आज बॅक्टेरिया सारखे जे अनेक अतिसूक्ष्म एकपेशी जीव अस्तित्वात आहेत, त्यांच्या मानाने हे पहिले जीव पुष्कळच साधे होते. त्यांना 'सजीव पदार्थ' असेही म्हणता येईल. हे प्राथमिक जीव जलाशयातील पाणी व त्यात विरघळलेली कार्बनची साधी मिश्र द्रव्य यांवर जगत होते. पण जलाशयात या मिश्र द्रव्यांचा साठा मर्यादित होता. शिवाय सूक्ष्म जीवांच्या जगण्यामुळे या मिश्र द्रव्यातील कार्बनचे रूपांतर कार्बनडायऑक्साईड वायू होत होते. म्हणजे अन्नाचा पुरवठा कमी होत होता आणि वातावरणात कार्बनडायऑक्साईडचा भरणा मात्र होत होता. परिस्थिती अशीच राहिली असती तर जीवनाचा विकासच खुंटला असता. परंतु कालांतराने काही जीवांमध्ये एका नव्या शक्तीचा विकास झाला. प्रकाशाच्या लहरींचा उपयोग करून त्यायोगे कार्बनडायऑक्साईड मधील कार्बनचे रूपांतर ते स्वत:ला हव्या त्या अन्नकणात करू लागले. वनस्पतींच्या अंगी ही शक्ती आहे. त्या हवेतून कार्बनडायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. प्रकाशाच्या सहाय्याने आपले अन्न तयार करण्याची ही शक्ती जीवन विकासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावर जीवन सृष्टी दोनशे कोटी वर्षांपूर्वी पोचली असावी. जे जुन्या पद्धतीने आपला निर्वाह करू लागले त्यांचा अंतर्भाव वनस्पतीत होतो, जे जीव भोवतालचे अन्नकण घेण्याच्या पद्धतीला धरून राहिले ते प्राणी होत. वनस्पतींनी बाहेर टाकलेला ऑक्सिजन जीवनक्रियेला उपयोगी पडू लागला. पृथ्वीच्या वातावरणात प्रथमत: शुद्ध ऑक्सिजन मुळीच नव्हता. कारण ऑक्सिजन हे अत्यंत क्रियाशील मूलद्रव्य आहे. ते लगेच इतर पदार्थांशी संयोग पावते आणि म्हणून शुद्ध स्थितीत राहत नाही. आपल्या वातावरणात शुद्ध ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असतो याचे संपूर्ण श्रेय वनस्पतींना आहे. या सर्व घटनाक्रमानंतर प्राथमिक जीवांचा पुढचा विकास होत गेला. एक पेशी जीवातून बहुपेशी जीव निर्माण झाले त्यांचा नानाविध विकास होत अखेर मानव निर्माण झाला.

 *क्रमश:*

 *तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन

🌎 *उत्क्रांती* 🌎
*****************

*प्रास्ताविक (३)*

नवीन शोध लागले, तरी या निर्मितीवादाने युरोपमध्ये चांगलेच मूळ धरले होते. जैवविज्ञानाप्रमाणेच भौतिकीविज्ञानातही बायबलमध्ये सांगितलेल्या कल्पना प्रमाणभूत मानण्याची युरोपमध्ये प्रथा होती. जग पृथ्वीकेंद्रित आहे, असे बायबलमध्ये सांगितले होते; परंतु हा विचार चुकीचा आहे, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे, असे कोपर्निकसने सांगितले. इटलीमध्ये गॅलिलिओने कोपर्निकसचे म्हणणे बरोबर आहे असे ठासून सांगितले. धर्माच्या विरुद्ध भाष्य केल्यामुळे गॅलिलिओला नजरकैदेत राहण्याची शिक्षा भोगावी लागली. इतर ग्रहांवरही सजीवसृष्टी असण्याची शक्यता आहे, असे म्हणणाऱ्या ब्रुनोला जाळण्यात आले. धार्मिक विचारांविरुद्ध मत मांडले, तर ते ऐकून घेण्याची सोशिकता तत्कालीन समाजामध्ये अजिबात नव्हती - हे उदाहरणांवरून स्पष्ट होते. डार्विनचे उत्क्रांतीचे विचारही धार्मिक विचारांच्या विरोधात जाणारे होते. आपण हे विचार प्रकट केले; तर तत्कालीन धर्ममार्तंडांच्या आणि समाजाच्या रागाला सामोरे जावे लागेल, आपले विचार वाचल्यावर समाजाच्या त्यावरील प्रतिक्रिया तीव्र स्वरुपाच्या असतील, धर्माविरुद्ध पवित्रा घेतल्यामुळे कदाचित अमानूष शिक्षाही सोसावी लागेल - अशी डार्विनला भीती वाटत होती. म्हणून तर कितीतरी वर्षे डार्विनने आपले विचार भाषणात गुंडाळून ठेवले होते.

*क्रमशः*

*उत्क्रांती* या पुस्तकातून


🌎 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🌎

*पृथ्वीची निर्मिती* (२)

पृथ्वी निर्माण झाली त्यावेळी त्यावर जीवनाचे अस्तित्व नव्हते. नंतर केव्हातरी त्याची उत्पत्ती झाली. जिवाची ही जन्मकथा थोडक्यात समजून घ्यावयास हवी. पृथ्वीवर एका पेशीचे जंतू ते झाडे, जनावरे, माणसे असे असंख्य जीव आहेत. या सर्व सजीव पेशींचे मूलभूत जीवनद्रव्य एकच आहे व ते म्हणजे प्रोटीन. प्रोटीन हे अतिशय गुंतागुंतीचे संमिश्र द्रव्य आहे. पाणी हे हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा एक अणू यांच्या संयोगातून बनलेले मिश्र द्रव्य आहे. सोडियमचा एक अणू व क्लोरिनचा एक अणू यांच्या संयोगाने मिठाचा रेणू बनतो. पण प्रोटीनच्या एका रेणूत हजारो लाखो अणूंची गुंतागुंत आहे. हे सर्व अणू नियमबद्ध रितीने एकमेकांशी संलग्न आहेत. प्रोटीन मधील अणूंत प्रामुख्याने कार्बन, हायड्रोजन, आॅक्सिजन आणि नायट्रोजन या मूलद्रव्यांचे अणूच मोठ्या संख्येने असतात. सजीव प्रोटीनचा खास गुणधर्म असा आहे की ते कधीही एका स्थितीत स्थिर नसतात. त्यांची चळवळ अखंड चालते. या जीवनाच्या क्रियेत सजीव प्रोटीनचा काही भाग निकामी होऊन बाहेर फेकला जातो. त्याच बरोबर बाहेरच्या परिसरातून ते सजीव प्रोटीन पोषक द्रव्य शोषून घेते व त्यांना आपल्या शरीरात आत्मसात करते. म्हणजे शरीरात नको त्या गोष्टी बाहेर टाकणे, अन्न मिळवणे या आधारे पुनर्घटन करणे अशी ही विघटन पुनर्घटनाची क्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या रासायनिक प्रक्रियेतून होते. या क्रियेतून सजीव शरीराचे अस्तित्व टिकून राहते. याचा अर्थ जीवन हा प्रोटीन द्रव्याच्या अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार आहे. विघटन पुनर्घटनाच्या क्रियेत बाहेरील निसर्गाशी अखंड देवघेव करणे हे त्याचे मुख्य लक्षण आहे आणि ही क्रिया थांबताच जीवनाचा अंत होऊन प्रोटीनचा नाश होतो. अलीकडच्या काळातील जीवशास्त्र व रसायनशास्त्र यातील प्रगती असे सांगते की जीवाचे पुनरुत्पादन, अनुवांशिक लक्षणांचे सातत्य आणि शरीरातील विभिन्न प्रोटिनची निर्मिती याबाबत मुख्य भूमिका न्यूक्लिक अॅसिड द्रव्याची आहे. त्यामुळे 'जीवन हा न्यूक्लिक अॅसिड आणि प्रोटीन द्रव्याच्या अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार आहे', असे म्हणता येईल.
जीवसृष्टीच्या निर्मितीत प्रथमतः कार्बन, हायड्रोजन यांचे साधे मिश्र द्रव्य (हायड्रो कार्बन) आणि पाणी निर्माण झाले. पुढे या हायड्रो कार्बन द्रव्याचा नायट्रोजन ऑक्सिजन आणि पाणी यांच्याशी संयोग होऊन चार मुलद्रव्यांची साधी मिश्रद्रव्ये तयार झाली. तिसर्‍या टप्प्यात त्यामधून न्यूक्लिक अॅसिड, प्रोटीन यासारखी संमिश्र द्रव्ये तयार झाली. चौथ्या पायरीत या द्रव्यांचा विकास होऊन त्यांच्या ठायी आधी उल्लेख केलेली विघटन पुनर्घटनाची विशेष लक्षणे आली आणि अखेरच्या पायरीत प्राथमिक सजीव द्रव्याचा विकास होऊन पहिले जीव अस्तित्वात आले. याच्या पुढचा इतिहास हा उत्क्रांतीचा इतिहास आहे.

 *तिमिरातुनी तेजाकडे* या पुस्तकातुन

🌎 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🌎

*पृथ्वीची निर्मिती (१)*
 आधुनिक विज्ञानाच्या मते पृथ्वीचे वय कोटी वर्षे असावे आणि मानवाचा जन्म होऊन दहा लाख वर्षांहून अधिक काळ लोटलेला नाही म्हणजे पृथ्वीचे वय एक वर्षात धरले तर मानवाचा अवतार होऊन त्या एका वर्षातील अवघ्या एका दिवसातील फक्त सव्वा दोन तास झाले आहेत आणि सम्राट अशोका पासूनचा काळ तर अवघ्या सेकंदांचा आहे युरेनियम या मूलद्रव्याचे नाव सर्वांना माहित आहे युरेनियमच्या अणूमधून वेगवेगळे किरण बाहेर पडतात मग त्या अणूंचे रूपांतर रेडियम मध्ये होते त्यातून पुन्हा किरण बाहेर पडून त्याचा पुन्हा वेगळ्या धातूत रुपांतर होते अशी स्थितंतरे धडक गटात शेवटी एक स्थिर धातू उरतो तो म्हणजे रेडियम जान्या शिसे युरेनियम ते शिसे हे स्थित्यंतर आपोआप अखंड व अत्यंत नियमित करते एक हजार ग्रॅम युरेनियम मधून एक ग्रॅम शिसे तयार होण्यास जवळजवळ लाख वर्षांचा काळ लागतो युरेनियमच्या साठ्यापैकी पाव हिश्शाचे रुपांतर शिशात व्हायला २०० कोटी वर्षे लागतात. यामुळे कोणत्याही प्राचीन खडकात युरेनियम असल्यास त्यात रेडियमजन्य शिसेही असतेच आणि दोन्हींचे परस्परप्रमाण शोधुन काढले तर त्या खडकाचे वयही कळते. पृथ्वीवरील जुन्यात जुन्या खडकांचा काळ ३०० कोटी वर्षांचा आहे; याचा अर्थ पृथ्वीचा पृष्ठभाग ३०० कोटी वर्षांपुर्वी तयार होऊ लागला. अर्थात पृथ्वीची उत्पत्ती त्यापूर्वीची असणार. पृथ्वीवर अवकाशातून कोसळलेल्या उल्कांचे वय ४६० कोटी वर्षे असल्याचे आढळले आहे, यावरुनही पृथ्वीची उत्पत्ती ४६० कोटी वर्षापूर्वीची असावी असा अंदाज करता येतो.

*तिमिरातूनी तेजाकडे* या पुस्तकातुन